October 9, 2024
मनुस्मृति – दुर्ग आणि गिरिदुर्ग यांचे महत्व

मनुस्मृति – दुर्ग आणि गिरिदुर्ग यांचे महत्व

Spread the love

मनुस्मृति बद्दल कोणाच्या काय संकल्पना आहेत सांगता येत नाही. पण, त्या बहुतांशी स्वतः मनुस्मृति न वाचताच बनलेल्या असतात हा आमचा अनुभव आहे. सहसा मनुस्मृति किंवा मनुवाद इत्यादी विषयांवर हिरीरीने बोलणाऱ्या कोणाला एकदा “मनुस्मृति वाचली का?” हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते बहुदा विनोदीच असते. असो! एखादी वस्तू स्वतः वापरल्याशिवाय, तत्वज्ञान स्वतः चिंतन केल्याशिवाय किंवा ग्रंथ स्वतः वाचल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देणं किंवा त्याच्याबद्दल ग्रह निर्माण करणं आणि पसरवणं अडाणी असण्याचे लक्षण आहे.

मनुस्मृति “जर वाचली” तर त्यात नेहमीच्या चर्चेतले विषय सोडून इतर अनेक विषयांवर विचार मांडलेले आहेत हे अगदी स्पष्ट दिसेल. त्यांच्यापैकी एक विषय म्हणजे राजाचे कर्तव्य. सातव्या अध्यायात हे विचार मांडलेले आहेत. त्याचा एक भाग म्हणजे दुर्ग, त्यांचे प्रकार आणि गिरिदुर्ग याचे महत्व.

या ब्लॉगमध्ये आधी श्लोक देत आहोत आणि त्याचे सुलभ मराठी भाषांतर.

जाङ्गलं सस्यसंपन्नं आर्यप्रायं अनाविलम् ।
रम्यं आनतसामन्तं स्वाजीव्यं देशं आवसेत् । । ७.६९ । ।

जिथे जंगले असतील, शेती चांगली होत असेल, जिथे सभ्य आणि सुसंकृत लोक राहात असतील जे रोग वगैरे मुळे ग्रसित नाहीत, जेरममाण करतील अशा स्वभावाचे आहेत, आजूबाजूचे लोक सज्जन आणि शिष्टाचार पाळणारे असतील अशा स्वाधीन देशामध्ये राजाने राहावे. 

--

धन्वदुर्गं महीदुर्गं अब्दुर्गं वार्क्षं एव वा ।
नृदुर्गं गिरिदुर्गं वा समाश्रित्य वसेत्पुरम् । । ७.७० । ।

धनुदुर्ग (वाळूने वेढलेला दुर्ग), महिदुर्ग (मही - जमीन), जलदुर्ग, वृक्षदुर्ग, सेनादुर्ग आणि गिरिदुर्ग अशांपैकी एखाद्या दुर्गाच्या आश्रयाखाली नगर वसवून तिथे राजाने वास्तव्य करावे. 

--

सर्वेण तु प्रयत्नेन गिरिदुर्गं समाश्रयेत् ।
एषां हि बाहुगुण्येन गिरिदुर्गं विशिष्यते । । ७.७१ । ।

या सर्व प्रकारच्या दुर्गांमध्ये बहुगुणी गिरिदुर्ग सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे यत्न करून राजाने शक्यतो गिरिदुर्गात आश्रय घ्यावा.

--

त्रिण्याद्यान्याश्रितास्त्वेषां मृगगर्ताश्रयाप्चराः ।
त्रीण्युत्तराणि क्रमशः प्लवंगमनरामराः । । ७.७२ । ।

क्रमाने बघता पहिल्या तीन प्रकारच्या दुर्गांमध्ये क्रमाने मृग (हरीण), उंदीर आणि सर्प निवास करतात. बाकीच्या तीन दुर्गांमध्ये वानर, मनुष्य आणि देवता निवास करतात. 

--

यथा दुर्गाश्रितानेतान्नोपहिंसन्ति शत्रवः ।
तथारयो न हिंसन्ति नृपं दुर्गसमाश्रितम् । । ७.७३ । ।

ज्या प्रमाणे या दुर्गांमध्ये आश्रय घेतलेल्या मृगाला कोणीही श्वापद मारू शकत नाही, त्याचप्रमाणे गिरिदुर्गात आश्रय घेतलेल्या राजाला शत्रू मारू शकत नाही. 

--

एकः शतं योधयति प्राकारस्थो धनुर्धरः ।
शतं दशसहस्राणि तस्माद्दुर्गं विधीयते । । ७.७४ । ।

(दुर्गातील) एक धनुर्धर शंभर धनुर्धरांशी लढू शकतो आणि शंभर धनुर्धर दहा हजार धनुर्धरांशी लढू शकतो. त्यालाच दुर्ग म्हणावं (दुर्ग असा असायला हवा)

--

तत्स्यादायुधसंपन्नं धनधान्येन वाहनैः ।
ब्राह्मणैः शिल्पिभिर्यन्त्रैर्यवसेनोदकेन च । । ७.७५ । ।

हा दुर्ग शस्त्रे - अस्त्रे, धन, धान्य, वाहने, ब्राह्मण (विद्वान मंडळी), शिल्पविशारद, यंत्रे, गवत आणि इंधन यांनी युक्त आणि परिपूर्ण असला पाहिजे.

--

तस्य मध्ये सुपर्याप्तं कारयेद्गृहं आत्मनः ।
गुप्तं सर्वर्तुकं शुभ्रं जलवृक्षसमन्वितम् । । ७.७६ । ।

या दुर्गाच्या मध्ये एक सुपर्याप्त घर/महाल बनवावा, जो सर्व ऋतू आणि काळांत मिळणाऱ्या फळांनी आणि फुलांनी युक्त असेल, शुभ्र (स्वच्छ) असेल, जिथे पाणी आणि वृक्ष देखील असतील. 

तर वर दिलेल्या श्लोकांमधून मनुस्मृति ग्रंथाबद्दल असलेले काही भ्रम कमी व्हायला मदत होईल अशी आशा आहे. कोणताही विचार ज्या त्या काळात तोलून मापून घ्यायचा असतो. ज्याप्रमाणे काही आंबे नासके निघाले म्हणून आपण संबंध पेटी फेकून देत नाही, त्याचप्रमाणे काही भाग रुचला नाही म्हणून संबंध ग्रंथ नाकारणे हे तर्कशास्त्राच्या दृष्टीने गैर होईल. आधी वाचा मग जरूर टीका करा. ज्या त्या काळातले लोक ज्या त्या काळासाठी आणि काळासंदर्भात आपले विचार मांडत असतात. मनुस्मृति त्यांच्यापैकी एक. आजच्या काळातील नियम, कायदे आणि सर्वसामान्य शिष्टाचार यांच्यावर काही शेकडो वर्षांनंतरच्या पिढ्या देखील असेच ताशेरे ओढणार आहेत याबद्दल शंका बाळगू नका.

याच्याही पलीकडे सर्व दुर्गांमधील सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या गिरिदुर्गाचा भारतातील कोणत्या महान राजांनी उपयोग करून घेतला – आश्रय घेतला याबद्दल विचार करणे, हा अभ्यास / गृहपाठ आम्ही वाचकांना करण्यास देत आहोत.

आधी नमूद केल्याप्रमाणे स्वतः वाचल्याशिवाय कोणत्या ग्रंथाबद्दल बोलणे अज्ञानी असण्याचे लक्षण आहे इतके सांगून हा ब्लॉग थांबवतो. आवडल्यास नक्की शेअर करा, लोकांचे भ्रम दूर करण्यास मदत करा!


आमचे इतर blogs वाचण्यासाठी इथे क्लीक करा.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *