प्राणायाम आणि मनुस्मृति
प्राणायाम! भारतात (कदाचित आता जगात) प्राणायाम म्हणजे काय? हे माहित नसणारा माणूस क्वचितच सापडेल. आणि सापडल्यास आपणही त्याच्या ज्ञानात वृद्धी करू इतके प्राणायाम उपयुक्त आहे! अनेक योग गुरूंनी प्राणायामाबद्दल शिकवण दिलेली आहे. इतकेच काय, श्रीमद्भगवद्गीतेत देखील प्राणायाम आणि त्याचे योगातील महत्व सांगितलेले आहे. मनुस्मृति मध्ये देखील या इहपरलोकी उपयुक्त प्राणायामचे महत्त्व सांगितलेले आहे. होय खरंच मनुस्मृति मध्ये प्राणायामाचे महत्त्व सांगितलेले आहे! त्या अनुषंगाने ध्यान आणि त्याचे महत्त्व देखील सांगितलेले आहे.
तुम्हाला माहित नव्हतं ना?
समज – गैरसमज
मनुस्मृति हा शब्द जरी कानावर पडला तरीही अनेकांचे कान टवकारतात. याचे मुख्य कारण असे की ज्या गोष्टीबद्दल आपल्याला ज्ञान नसते त्याला आपण घाबरतो. मनुस्मृतिबद्दल भारतीय समाजात पसरलेले गैरसमज स्तिमित करणारे आहेत. याची बरीचशी करणे आहेत ज्यांच्याबद्दल चर्चा या ब्लॉगमधे केली जाणार नाही. बहुतांशी लोकांना मनुस्मृति मधील एखादा श्लोक सोडला तर काहीच माहित नसते. कोणताही मजकूर स्वतः न वाचता त्याच्याबद्दल ग्रह करून घेणे हे भारतीय समाजाचे राजकीय चारित्र्य बनलेले आहे. पूर्वीच्या ब्लॉग मध्ये नमूद केल्याप्रमाणे “सहसा मनुस्मृति किंवा मनुवाद इत्यादी विषयांवर हिरीरीने बोलणाऱ्या कोणाला एकदा “मनुस्मृति वाचली का?” हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते बहुदा विनोदीच असते.” असो! एकंदरीतच अज्ञानाने ग्रासलेल्या समाजाला सत्य सांगणे महत्कार्य आहे. जे करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू.
मनुस्मृतिच्या सहाव्या अध्यायातील, श्लोक क्रमांक ७१-७५ या श्लोकांमध्ये प्राणायाम, ध्यान आणि त्याचे माणसाच्या आयुष्यातील महत्त्व यांच्याबद्दल कथन केलेले आहे. हे श्लोक आणि त्यांचा मराठी अनुवाद खाली देत आहोत.
दह्यन्ते ध्मायमानानां धातूनां हि यथा मलाः ।
तथेन्द्रियाणां दह्यन्ते दोषाः प्राणस्य निग्रहात् ॥ ७१ ॥
ज्या प्रमाणे अग्नित टाकल्याने धातुंमधील अशुद्धी निघून जाते, त्याच प्रमाणे प्राणायाम केल्याने इंद्रियांमधील दोष भस्म होतात.
प्राणायामैर्दहेद् दोषान् धारणाभिश्च किल्बिषम् ।
प्रत्याहारेण संसर्गान् ध्यानेनानीश्वरान् गुणान् ॥ ७२ ॥
प्राणायाम करून देहातील दोषांचा नाश करावा. धारणेने (एकाग्रचित्त होऊन) पापांचा, मनातील किल्विषांचा नाश करावा. इंद्रियसंयमाने (प्रत्याहाराने, विविध प्रकारची प्रलोभने टाळून) विरक्त होऊन जड, भौतिक वस्तूंच्या मोहापासून मुक्त व्हावे. तसेच ईश्वराचे ध्यान करून गुण म्हणजेच ज्या ज्या प्रकारे पंचेंद्रियांच्या कक्षेत राहून वर्णन केले जाऊ शकेल अशा गोष्टींपासून, गुणधर्मांपासून मुक्त व्हावे (हीच निर्गुणभक्ती)
उच्चावचेषु भूतेषु दुर्ज्ञेयामकृतात्मभिः ।
ध्यानयोगेन सम्पश्येद् गतिमस्यान्तरात्मनः ॥ ७३ ॥
जीवनगती सामान्य लोकांना माहित नसते. अज्ञानामुळे सजीवांना आपल्या उत्पत्तीबद्दल (जन्मयोनी) माहिती मिळणे अशक्य असते. ध्यान करून माणसाने या करणाबद्दल विचार करावा आणि सर्व प्रकारच्या सजीवाचे मूळस्वरूप एक आहे, त्यांचा अंतरात्मा हाच परमात्मा आहे हे लक्षात घ्यावे.
(टीप: या श्लोकात उच्च योनी आणि नीच योनी असे शब्द वाचायला मिळतील. पण त्यांचा संबंध सामान्य जीवजंतू आणि अतिविकसित प्राणी यांच्या संबधी आहे. गैरसमज करून घेऊ नका.)
सम्यग्दर्शनसम्पन्नः कर्मभिर्न निबध्यते ।
दर्शनेन विहीनस्तु संसारं प्रतिपद्यते ॥ ७४ ॥
ज्याला सम्यक-दर्शन झालेले आहे (ज्याने ध्यान करून ब्रह्म आणि सत्य यांचे ज्ञान मिळवलेले आहे) तो माणूस कर्मबंधनात (भौतिक मोह मायेत) अडकून पडत नाही. आणि ज्याला हे ज्ञान झालेले नाही तो बिचारा संसारात (जन्म मृत्यूच्या चक्रात) अडकून पडतो.
अहिंसयेन्द्रियासङ्गैर्वैदिकैश्चैव कर्मभिः ।
तपसश्चरणैश्चौग्रैः साधयन्तीह तत्पदम् ॥ ७५ ॥
अहिंसा, इंद्रियनिग्रह, वैदिक कर्मानुष्ठान आणि कर्म यांची तपश्चर्या, या जगात (पृथ्वीलोकात) ते (ब्रह्मपद, मोक्षपद) प्राप्त करण्याचे साधन बनते.
आशा करतो की हे श्लोक आणि त्यांचे अनुवाद वाचल्यानंतर मनुस्मृतिबद्दल काही गैरसमज दूर होण्यास मदत झाली असेल. काही कारणांमुळे जर ही माहिती तुमच्यापर्यंत पूर्वी पोहोचली नसेल तर हा ब्लॉग इतरांपर्यंत पोहोचवण्यास मदत करा कारण असे असंख्य लोक आहेत ज्यांना मनुस्मृतिबद्दल काहीही माहिती नाही. त्यांचे देखील गैरसमज दूर करायला मदत होईल!
Very Nice Blog.
धन्यवाद 🙏