ही झेन कथा आहे एका योद्धाची, संयमी योद्धाची! पूर्वी जपानमध्ये एक उत्तम तलवारबाज होते. त्यांची ख्याती मोठी होती. याला आणखीन एकच कारण म्हणजे, ते झेन मास्टर देखील होते. झेन मास्टर आणि उत्तम तालवारबाज, वयाने ज्येष्ठ आणि प्रावीण्याने श्रेष्ठ त्यामुळे त्यांची चांगलीच ख्याती होती. त्याच काळात आणखीन एक तलवारबाज होता. उत्तम होता. त्याची एक सवय होती. तो ज्या गावात जाईल तिथल्या सर्वोत्तम तलवारबाजाला आव्हान देत असे आणि त्याला हरवत असे. त्यामुळे त्याचीही ख्याती झालेली होती.
एकदा हा तलवारबाज, झेन मास्टरांच्या गावी येतो आणि गर्वाने गावकऱ्यांना विचारतो
“तुमच्या गावात सर्वश्रेष्ठ तलवारबाज कोण आहे?”
अर्थातच लोक झेन मास्टरांचे नाव घेतात आणि म्हणतात “ते मास्टर इथले सर्वश्रेष्ठ तलवारबाज आहेत”
त्यावर हा नवा योद्धा चिडतो आणि म्हणतो
“मी कोणाला सर्वश्रेष्ठ वगैरे मानत नाही. जा बोलवा त्यांना आणि माझ्याशी युद्ध करायला सांगा”
गावकरी झेन गुरूंकडे जातात. पण, सुरुवातीला झेन गुरु हे विनाकारण दिलेले आव्हान नाकारतात. त्यांच्यामते तलवारबाजी श्रेष्ठत्त्व सिद्ध करण्याची गोष्ट नाही, दिखावेपणा करण्यासाठी नाही. त्यामुळे असले द्वंद्व करून काहीही फायदा होणार नाही. गावकरी हे उत्तर त्या गर्विष्ठ तलवारबाजाला जाऊन सांगतात. तेव्हा तो म्हणतो,
“ही नुसती कारणे आहेत. ते माझ्याशी द्वंद्व करायला घाबरतात”
हे ऐकून गावकरी पुन्हा झेन मास्टरांकडे जातात कारण त्यांना पूर्ण खात्री असते की हे मास्टरच सर्वश्रेष्ठ आहेत. शेवटी नाही – हो करत मास्टर लढायला तयार होतात.
द्वंद्वाचा दिवस आणि वेळ निश्चित होते. गावाच्या बाहेर एका पटांगणावर युद्ध करायचे ठरते. लोक जमा होतात. तिथे गेल्यावर, गर्विष्ठ योद्धा झेन मास्टरांना खूप शिव्या देतो, नावे ठेवतो, अश्लील बोलतो. लोक सुद्धा विचलित होतात. पण झेन गुरु मात्र स्थिर राहतात. द्वंद्व सुरु होते आणि थोड्याच वेळानंतर तो गर्विष्ठ तलवारबाज आपला पराभव मान्य करतो आणि तिथून निघून जातो. लोकांना भयंकर आश्चर्य वाटते.
लोक आणि शिष्य मास्टरांना विचारतात की
“इतका पराक्रमी योद्धा फार काही न लढता हार मान्य करून कसा काय निघून गेला? असं कसं झालं?”
मास्टर म्हणतात
“समोरचा माणूस तुमच्यासाठी काहीही आणून देऊ शकतात. पण, जर तुम्ही ती गोष्ट घ्यायचं मान्यच केलं नाही तर काय होईल? त्या माणसाला ती गोष्ट पार्ट घेऊन जावी लागेल. त्याच प्रमाणे तो गर्विष्ठ तलवारबाज माझ्यासाठी गर्व आणि क्रोध आणले होते. पण मी ते घेतले नाहीत, संयम राखला. त्यामुळे त्याला माझ्यावर विजय मिळवता आला नाही.”
इतर झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा