November 14, 2024
शहाण्यांसाठी इसापनीती – सिंह प्रेमात पडतो!

शहाण्यांसाठी इसापनीती – सिंह प्रेमात पडतो!

Spread the love

ही आणखी एक इसापनीतीची कथा ज्यात सिंह प्रेमात पडतो आणि प्रेमाच्या आवेगात, भावनेच्या भरात स्वतःचे नुकसान करून घेतो. या कथेचे तात्पर्य देखील हेच सांगितले जाते की “माणूस प्रेमात पडला किंवा भावनिक झाला की चुकीचे निर्णय घेतो”. पण हा उपदेश ज्यांना हे आधीच माहित आहे की “भावनेच्या भारत निर्णय घेतले की नुकसान होतं” त्यांना सांगून काय फायदा? मग आणखीन कुठला बोध आपण (जरासे) शहाणे या कथेतून घेऊ शकतो? आधी ही कथा सांगतो मग बोध पाहूया!

एका जंगलाच्या सीमेवर एक लाकूडतोड्या राहायचा. त्याला एक सुंदर तरुण मुलगी होती. त्या जंगलात एक उमदा सिंह देखील होता. एकदा लाकूडतोड्या स्वतःबरोबर मुलीला घेऊन जंगलात लाकडे तोडायला जातो. तेव्हा सिंह त्या लाकूडतोड्याच्या मुलीला लांबून बघतो. सिंह त्या तरुण मुलीच्या प्रेमात पडतो. तिच्याशी बोलण्यासाठी सिंह तिच्या जवळ जाऊ लागतो तर मुलगी आणि लाकूडतोड्या घाबरून पळायला लागतात. मुलगी आणि लाकूडतोड्या त्यांच्या घरात लपतात. लाकूडतोड्या घराचे दार घट्ट लावतो.

एका जंगलाच्या सीमेवर एक लाकूडतोड्या राहायचा. त्याला एक सुंदर तरुण मुलगी होती. त्या जंगलात एक उमदा सिंह देखील होता. एकदा लाकूडतोड्या स्वतःबरोबर मुलीला घेऊन जंगलात लाकडे तोडायला जातो. तेव्हा सिंह त्या लाकूडतोड्याच्या मुलीला लांबून बघतो. सिंह त्या तरुण मुलीच्या प्रेमात पडतो. तिच्याशी बोलण्यासाठी सिंह तिच्या जवळ जाऊ लागतो तर मुलगी आणि लाकूडतोड्या घाबरून पळायला लागतात. मुलगी आणि लाकूडतोड्या त्यांच्या घरात लपतात. लाकूडतोड्या घराचे दार घट्ट लावतो.

तेवढ्यात कोणीतरी दार वाजवतो. लाकूडतोड्या घाबरत घाबरत दार उघडतो. आणि बघतो तर काय समोर तो सिंह उभा असतो! लाकूडतोड्या घाबरतो. पण सिंह आश्वासक स्वरात बोलतो

“घाबरू नकोस मी तुम्हाला खाणार नाहीये. मला तुझ्या मुलीच्या प्रेमात पडलो आहे. मला तुझ्या मुलीशी लग्न करायचे आहे”

लाकूडतोड्या आधी घाबरतो, मग बुचकळ्यात पडतो आणि मग त्याला एक युक्ती सुचते. तो म्हणतो

“माझ्या मुलीचे लग्न मी तुझ्याबरोबर करून दिले असते पण तिला तुझ्या दातांची आणि सुळ्यांची भीती वाटते”

हे ऐकल्यावर सिंह मागे फिरतो.

दुसऱ्या दिवशी परत लाकूडतोड्याच्या घरी येतो. त्याने आपले सुळे काढून टाकलेले असतात, टोकदार दात गुळगुळीत केलेले असतात. लाकूडतोड्या दार उघडतो

“हे बघ मी दात आणि सुळे काढून आलो. आता माझे लग्न तुझ्या मुलीशी लावून दे” सिंह म्हणतो

“अरे पण तुझ्या नखांचे काय? माझी मुलगी फुलासारखी नाजूक आहे. तुझ्या नखांच्या स्पर्शाने तिला इजा होईल” लाकूडतोड्या उत्तर देतो

सिंह फिरत माघारी फिरतो.

परत दुसऱ्या दिवशी लाकूडतोड्याच्या घरी येतो. पण यावेळी त्याने स्वतःची नखे कापलेली असतात.

“बघ आता मी नखे सुद्धा कापलेली आहेत. आता तरी तुझ्या मुलीचं माझ्याशी लग्न लावून दे!” सिंह म्हणतो. दात आणि नखे काढलेला सिंह फारच केविलवाणा दिसत होता. पण याचे सिंहाला काहीही नसते.

“असं.. आलोच” असं म्हणून लाकूडतोड्या घरात जातो. एक सोटा घेऊन येतो आणि सिंहाला मारून मारून पिटाळून लावतो!

इथे कथा संपली. आणि तात्पर्य देखील हे सांगितलं गेलं की माणूस प्रेमात पडला की चुकीचे निर्णय घेतो. पण या सगळ्या प्रकरणात जो खरा शहाणा ठरला त्या लाकूडतोड्याचं काय? आपण सिंहाकडे तर बघूच पण लाकूडतोड्याने कठीण प्रसंगात जो शहाणपणा दाखवला तो आपण का दाखवू नये? माझ्यामते शहाण्यांसाठी खरा बोध हा आहे..

प्रसंग कितीही अवघड असला तरीही जर आपण प्रतिस्पर्ध्याची बलस्थाने निकामी करण्यासाठी युक्तीचा वापर केला तर आपण विजयी होऊ शकतो. प्रतिस्पर्ध्याची बलस्थाने ओळख आणि त्यांना निष्प्रभावी करा.. विजय निश्चित आहे!

कसा वाटला हा बोध??

आमचे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *