December 2, 2024
पहिला विमान प्रवास? Airport Travel Photo by Erik Odiin on Unsplash

पहिला विमान प्रवास?

Spread the love

घाबरू नका !

पहिला विमान प्रवास म्हटलं की आधी मनात विचार येतो तो म्हणजे..

“अरे बापरे !! आता कसं होणार ? आपल्याला हे जमणार का ?”

म्हणूनच मी यावर थोडं मार्गदर्शन करायचं ठरवलं आहे. त्यामुळे पुढे जायच्या आधी एकच गोष्ट सांगायची आहे “विमान प्रवास हा एक अत्यंत सोपा आणि सरळ प्रकार आहे. काही चुकीच्या कल्पनांमुळे त्याबद्दल भिती निर्माण झालेली आहे!”

या ब्लॉग मध्ये मी विमान प्रवासाच्या पूर्वतयारीबद्दल माहिती देणार आहे जेणे करून कोणालाही न विचारता तुम्ही तुमची तयारी करू शकाल आणि आत्मविश्वासाने प्रवास करू शकाल!


मुद्दा पहिला – कुठून कुठे जायचंय ?

कुठल्याही प्रवासाची सुरुवात याच प्रश्नाने होते. कुठून कुठे जायचंय ?

हा प्रश्न महत्वाचा आहे कारण कदाचित तुमच्या गावात/शहरात विमानतळ नसू शकतं, किंवा विमानतळ असले तरी तुम्हाला जायचंय तिथे विमान उपलब्ध नसू शकतं. सध्या इंटरनेटमुळे हे शोधणं अत्यंत सोपं झालेलं आहे.

अशी कल्पना करू की तुम्हाला सांगलीहून कोलकाता ला जायचंय. आता महत्वाचा मुद्दा असा की सांगलीला विमानतळ नाहीये त्यामुळे जवळचे विमानतळ शोधले पाहिजे. पुणे किंवा मुंबई ही सांगलीला जवळची विमानतळे आहेत. त्यामुळे “कुठून?” हा प्रश्न बऱ्यापैकी मिटला पण तरीही नक्की कुठलं विमानतळ गाठायचं? पुणे की मुंबई? हे अजून ठरायचं आहे. याचं उत्तर मिळेल “कुठे?” या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावर. आता जायचंय कोलकात्याला त्यामुळे हे पाहावं लागेल की पुणे आणि मुंबई वरून कोलकात्याला विमानसेवा उपलब्ध आहे का?

समजा पुणे-कोलकाता आणि मुंबई-कोलकाता दोन्ही मार्गांवर विमानसेवा उपलब्ध आहे तर यात निवड कशी करायची. या निवडीचे काही निकष आहेत, जे तंतोतंत सगळ्यांना लागू होतील असे नाहीत पण कुठल्या निकषाला किती महत्व आहे यावरून मार्ग निवडता येईल. ते निकष असे..

१. गंतव्याच्या वेळा
२. तिकिटाचे दर
३. तिकिटांची उपलब्धता
४. तुमचे ठिकाण ते विमानतळ हा प्रवास
५. ईष्टस्थळी पोहोचण्याचा वेळा
६. प्रवासाला लागणारा वेळ
७. ईकॉनॉमी (स्वस्त/साधे) की फर्स्ट क्लास (महाग)

या निकषांच्या आधारे तुम्ही जरूर तुमचा मार्ग निश्चित करू शकता.. (आणखी काही प्रश्न असल्यास या ब्लॉग वर जरूर विचारा)

मुद्दा दुसरा – कागदपत्रे

हा एक प्रश्न आहे जिथे जवळपास सगळ्यांना गोंधळायला होतं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर विमानतळावर तुमची ओळख करून देण्यासाठी असे सरकारमान्य ओळखपत्र लागते ज्यावर तुमचे छायाचित्र असेल. खाली यादी केलेल्या ओळखपत्रांपैकी कुठलेही एक ओळखपत्र तुम्हाला विमानतळावर प्रवेश मिळण्यासाठी पुरेसं आहे.
१. आधार कार्ड
२. पासपोर्ट
३. पॅन कार्ड
४. निवडणूक ओळखपत्र (कार्ड)
५. चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स, तुमचे छायाचित्र त्यावर असेल तरच)

वर नमूद केलेल्या ओळखपत्रांपैकी कुठलेही एक ओळखपत्र तुमची ओळख करून द्यायला पुरेसं आहे. विमानतळावर ओळखपत्राची “फक्त” मूळ प्रतच (Original) गृहीत धरली जाते. झेरॉक्स वगैरेचा काहीही उपयोग होणार नाही.

माझा सल्ला असा की ओळखपत्राची एक तरी झेरॉक्स बरोबर ठेवा म्हणजे प्रवासात ओळखपत्र हरवले तर ते शोधायला झेरॉक्सचा उपयोग होईल. पण झेरॉक्स दाखवून विमानतळात प्रवेश दिला जात नाही.

आता तिकीट काढताना घ्यायची काळजी..
१. तिकीट काढताना तुम्ही दिलेले नाव तुमच्या ओळखपत्राशी जुळले पाहिजे (सक्तीने)
२. तिकीट काढताना तुम्ही दिलेली जन्मतारीख तुमच्या ओळखपत्राशी जुळली पाहिजे (सक्तीने)

या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या. ओळखपत्रांबरोबर अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे इ-तिकीट. हल्ली विमानाची तिकिटे इंटरनेटवर होतात त्यामुळे तुम्हाला इ-तिकीट मिळते. हे तिकीट तुम्ही जपून ठेवले पाहिजे. विमानतळात प्रवेश मिळण्यासाठी रक्षकांना हे इ-तिकीट आणि तुमचे ओळखपत्र दाखवणे अनिवार्य आहे.

वर सांगितलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त आणखी कुठलीही कागदपत्रे विमानप्रवासाला लागत नाहीत.


मुद्दा तिसरा – स्वतः की एजंट? 

हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे. याला तितकंच सोपं उत्तर आहे “अनुभव आणि माहिती असेल तर स्वतः आणि नसेल तर एजंट”

स्वतःला माहिती असेल तर एकच मुख्य फायदा तो म्हणजे आपल्याला सगळे पर्याय डोळ्यांसमोर दिसतात. पण, ज्यांना विशेष माहिती नाहीये किंवा इंटरनेट वर तिकीट वगैरे काढायची भिती वाटते त्यांनी सरळ एजंट कडे जाणे उत्तम. एजंट स्वतःच कमिशन घेतात पण ते फार नसतं आणि ते आपल्या पैशातून जात नाही. मला अनुभव असला तरीही कधी कधी मीही एजंटकडून तिकीट काढून घेतो कारण ते कधी कधी स्वस्त पडतं.

पहिल्यांदा विमान प्रवास करणाऱ्यांसाठी एजंट हा उत्तम पर्याय आहे. मात्र एकच गोष्ट बघायची (जी खरं आयुष्यात सगळ्याच गोष्टींना लागू पडते), ती अशी की एजंट विश्वासार्ह असणे महत्वाचे आहे.

टीप:

तुमचे काही प्रश्न किंवा शंका असल्यास मला जरूर कळवा. तुम्ही ट्विट करू शकता https://twitter.com/ShabdyatriBlog किंवा फेसबुक पेज https://www.facebook.com/Shabdyatri वर

पुढच्या ब्लॉग मध्ये, प्रत्यक्ष इ-तिकीट बद्दल माहिती देणार आहे.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *