३ डिसेंबरला सगळ्यांनी इंग्रजांनी सती प्रथा कायदा करून शिक्षापात्र गुन्हा बनवला हे वाचलेलं आहे. त्यावरून इंग्रजांची बरीच वाहवा केली जाते. अनेक प्रश्न मनात येतात भारतात फक्त ही एकच कुप्रथा होती का? फक्त हिंदूंमध्येच कुप्रथा होत्या का? आहेत का? इंग्रज सोडून बाकी कोणी राज्यकर्त्याने काही विशेष केले नाही का? पण फारसे चांगले उत्तर मिळाले नाही. तेव्हा केवळ देवाची कृपा म्हणून बडोदे संस्थानातील अमरेली प्रांताचे दिवाण, विठ्ठलराव देवाजी दिघे म्हणजे काठियावाड दिवाणजी यांचे नाव वाचनात आले.
स्त्रीभ्रूणहत्या नावाच्या पाशवी, आणि क्रूर प्रथेबद्दल आपण सगळेच ऐकून आहोत. दुर्दैवाने या अमानवी प्रथेची पाळेमुळे आपल्या देशात भूतकाळात दूर जातात. त्यांच्यामागच्या कारणांबद्दल कधी नंतर बोलू. पण हा प्रकार पूर्णपणे थांबणं मानवतेच्या दृष्टीने देखील थांबणे आणि थांबवणे अत्यंत गरजेचे होते.. आजही आहे! पण विठ्ठलराव देवाजी दिघे म्हणजेच काठियावाड दिवाणजी यांच्याबद्दल वाचल्यावर मनाला थोडा धीर आला.
गोविंद गणेश भागवत, धावडशीकर यांच्या “मराठ्यांच्या आपसांतील लढाया” या पुस्तकात विठ्ठलराव देवाजी दिघे यांचा उल्लेख खालीलप्रमाणे आला
“हिंदुस्थानांतील सतीची चाल बंद केल्याबद्दल लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या कर्तबगारीची फार मोठी वाहवा झाली. तितक्याच योग्यतेचे काम बडोदे संस्थानात विठ्ठलराव देवाजी दिघे ऊर्फ काठेवाड दिवाणजी यांनीं करून दाखविलें. त्यांची योग्यता बेंटिंकच्या इतकीच मानिली पाहिजे. काठेवाडांतील रजपूत जातीमध्ये मुलगी जन्माला आल्याबरोबर तिचे नरडें दाबून प्राण घ्यावयाचा अशा प्रकारे वाईट चाल होती. परंतु विठ्ठलराव दिघे यांनी असामान्य मनोधैर्य दाखवून ही चाल सक्तीने बंद केली. आणि हा गुन्हा करणारांना तुरुंगवासाची शिक्षा देण्याला सुरुवात केली. ह्या विठ्ठलरावाचे वर्तन इतके निष्पाप होतें की, आणि काठेवाडातील लोकांवर त्यांची तकी जरब होती कीं, ब्राह्मण लोक जशी गायत्रीची शपथ पूज्य मानतात तशी काठेवाडांतील लोक ह्या विठ्ठलरावांची नांवाची शपथ मोडण्याला धजत नसत.”
“मराठ्यांच्या आपसांतील लढाया” ~ गोविंद गणेश भागवत, धावडशीकर
खरं सांगायचं तर अभिमान वाटला आणि आदरभाव सुद्धा जागृत झाला. सिनेमांत दाखवतात तसे सगळे दिवाण रक्तपिपासू आणि क्रूर नसतात. सत्य सांगायचं तर सिनेमांमध्ये विनाकारण काही समाजाला वाईट दाखवतात. असो, तो मुद्दा वेगळा. पण विठ्ठलराव देवाजी दिघे ऊर्फ काठियावाड दिवाणजी यांनी स्त्रियांसाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जे कार्य केलं त्याला कोटी कोटी नमन. नेहमीच्या दुःखप्रमाणे इथेही दुःख याचेच वाटते की, इतिहासाच्या पुस्तकात समाजसुधारणेच्या दृष्टीने कार्य करणाऱ्या लोकांमध्ये विठ्ठलरावांचा कुठेही उल्लेख आलेला आढळत नाही. इतकेच काय कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याला त्यांचे नाव माहित नसेल याची खात्री आहे. म्हणूनच हे कार्य आम्ही शब्दयात्री तर्फे करत आहोत.
आशा आहे हा ब्लॉग शेअर करून या पुण्यशील व्यक्तीबद्दल दिलेली माहिती तुम्ही इतरांपर्यंत देखील पोहोचवलं. 🙏🏻