वृत्ताचे नाव – उपजाति
वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त)
वृत्त मात्रा संख्या – १६ + १५
वृत्त अक्षर संख्या – ११ + ११
गणांची विभागणी – त, त, ज, ग, ग (इंद्रवज्रा) + ज, त, ज, ग, ग (उपेंद्रवज्रा)
यति – इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा चे यतिचे नियम
नियम –
उपजाति वृत्तात पहिले चरण इंद्रवज्रा वृत्तात त, त, ज, ग, ग आणि दुसरे चरण उपेंद्रवज्रा वृत्तात ज, त, ज, ग, ग
उपजाति बद्दल माहिती
उपजाति एक मिश्रण जाति किंवा वृत्त आहे. पुराणे आणि स्तोत्रांमधे या जातीत अनंत रचना केलेल्या आहेत.
वृत्ताचे लक्षणसूत्र
१.
खालील लक्षणसूत्रात गोडबोलेंनी इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा यांना शिव – पार्वती चे किती सुंदर आणि समर्पक रूपक दिले आहे पाहा!
जेव्हां दिसे मिश्रण इंद्रवज्रा ॥ ह्यांचें पदीं आणि उपेंद्रवज्रा ॥
तेव्हां म्हणावें उपजाति तीला ॥ पतीच हें दैवत हो सतीला ॥
– (“वृत्तदर्पण”, परशुराम बल्लाळ गोडबोले)
२.
आनन्तरोदीरितलक्ष्मभाजौ ।
पादौ यदीयवुपजातयस्ता: ॥
– (“रत्नालंकार”, केदार भट्ट)
उपजाति वृत्ताची उदाहरणे
भा रा तांबे यांच्या “पुंगीवाला” कवितेतील काही वेचे उपजाति वृत्ताची उत्तम उदाहरणे आहेत
सुखी असोनी जन तेथ एकदा आली तयांच्या नशिबास आपदा,
तया पुरीं उंदिर फार माजले त्यांच्या अनर्थ जन सर्व पीडले.
भिती मनीं श्वान बघोनि त्यांना, लीलेंच ते मारिति मांजरांना,
फराफरा ओढिति तान्हुल्यांना, धावोनिया चावति बालकांना !
– (“पुंगीवाला”, भा रा तांबे)
उपजाति वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!
ती इंद्रवज्रा जरी हो कवींनी ।
उपेंद्रवज्रागतपाद यांनीं ॥
केली विमिश्रा उपजाति तीला ।
म्हणा तसें अन्यहि मिश्रणाला ॥
– (“छन्दोमंजिरी”)
कवी भर्तृहरी ने शृंगारशतकं मध्ये देखील या वृत्तात अनेक रचना दिल्या आहेत
विश्रम्य विश्रम्य वनद्रुमाणां
छायासु तन्वी विचचार काचित् ॥
स्तनोत्तरीयेण करोद्धृतेन
निवारयन्ती शशिनो मयूखान् ॥५६॥
अदर्शने दर्शनमात्रकामा
दृष्ट्वा परिष्वङ्गसुखैकलोलाः ॥
आलिङ्गितायां पुनरायताक्ष्यां
आशास्महे विग्रहयोरभेदम् ॥५८॥
महाकवी मोरोपंतांच्या “कुशलवोपाख्यान” मधील खालील उदाहरणे पाहा. ही उदाहरणे पाहून नक्कीच लक्षात येईल की हे वृत्त कीर्तन, स्तोत्रे यांसाठी का वापरली गेली! इतकी गेयता आणि नाट्य अन्यत्र क्वचितच दिसून येते. मोरोपंतांच्या करुणेच्या सागरात अनेक वृत्तांत रचना बांधलेल्या आहेत.
सीतामाई जेव्हा अयोध्या सोडून वनांत जाऊ लागली तेव्हा तिची दीनवाणी अवस्था पाहून लक्ष्मणाला झालेला शोक..
प्रजावतीची अशि दीन वाणी आणी दिराच्या नयनांसि पाणी,
असें वदे रावणपुत्रहंता, संतापसंतप्तमनोनियंता. ॥
आणि सांत्वन करण्याचा प्रयत्न
लोकप्रवादें त्यजिलें वनांतीं तुला जगद्वंद्यपदें वरानें. ’ ।
प्रशोकबाष्पाकुलकंधरानें, सांगीतलें हें तिस देवरानें
वाल्मिकी ऋषी सीतामाईला विचारतात..
समीप येऊनि कळेवराशी पाहे, तदा त्यासि कळे वरांशी. ।
जेणें न राहे श्रमभार तीचा, केला मृद्पक्रम भारतीचा ॥
सीतामाई उत्तरते..
महामुने ! मैथिल तात माझा; मन्नाम सीता; पति रामराजा; ।
भूवल्लभाज्ञाप्रियमंदिरानें आणूनि येथें, त्यजिलें दिरानें. ’ ॥ (अध्याय ५ वा)
तंजावरकडील कवी श्यामराज कृत “राजगोपालविलास” या काव्यातील एक शृंगाररसयुक्त कडवे, ज्यात श्रीकृष्ण सत्यभामेला वीणा वंदन करायला सांगत आहेत.
तूं सुंदरी सवकलाप्रवीणा
घेऊनी हातीं क्षणयेक वीणा
प्रभाव दावी निज भारतीचा
उत्साह कल्पी सखि या श्रुतीचा
कलाकारांना आणि रसिकांना नावे ठेवणाऱ्यांसाठी.. एक अत्यंत महत्त्वाचे उदाहरण खाली देत आहोत 🤗😊
साहित्यसङ्गीत कला-विहीनः साक्षात्पशुः पृच्छ-विषाणहीनः ।
तृणं न खादन्नपि जीवमानः तद्भागधेयं परमं पशुनाम्॥
(“नीतिशतकम्”,भर्तृहरि)
उपजाति वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!