मस्तानी.. मस्तानी इतकी अवांछिलेली, दुस्वास सहन केलेली स्त्री इतिहासात क्वचितच आढळेल. जिच्या सौंदर्याबद्दल लोकांनी बरंच काही लिहिलेलं आहे, चितारलेलं आहे अशी ही मस्तानी. यवनी गर्भात उमललेली हिंदुस्थानी गुलाबाची कळी. जिच्या सौंदर्याला आणि शौर्याला वास्तवाच्या काट्यांची वेढलेले आहे. राजकारणाच्या खेळात तिचा हात राऊंच्या हाती दिला गेला खरा पण राऊंना देखील याची कल्पना नव्हती की राजकारण म्हणून हातात घेतलेला हा मस्तानीचा हात त्यांच्या आयुष्याच्या जखमांचे कारण आणि निदान दोन्ही बनणार आहे. इतिहासाच्या पानांत ही मस्तानी काही न बोलता आली आणि काही न बोलता निघून गेली. कितीही शोधायचं म्हटलं तरीही तिच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसत नाहीत. त्या मस्तानी साठी या कवीचे चार शब्द.. सहानुभूती म्हणून नव्हे फक्त उन्हाळे सोसायला लागलेल्या एका निष्पाप फुलाचे सांत्वन!
माझ्या स्वरचित कविता इथे वाचायला मिळतील
मस्तानीबद्दल एक आख्यायिका अशी सांगतात की जेव्हा श्रीमंत बाजीराव पेशवा मस्तानीला घेऊन पुण्यात आले तेव्हा पुण्यातील लोकांनी या लग्नाचा आणि संबंधाचा विरोध केला होता. पण विशेष म्हणजे पेशव्यांच्या मातुःश्रींनी एकदा या लोकांना “तुम्हाला अशी सुंदर बायको मिळाली नाही म्हणून तुम्ही माझ्या राऊ वर जळत आहात” असे खडे बोल सुनावले होते. या आख्यायिकेची पुष्टी करणारा ठोस पुरावा नाही पण ही आख्यायिका प्रसिद्ध आहे. तसेच सिनेमात दाखवली गेलेली मस्तानी आणि इतिहासात सांगितली गेलेली मस्तानी यात खूप फरक आहे हे देखील समजून घेतले पाहिजे.