Albatross आणि ग्रेस
Albatross एक समुद्री पक्षी आहे ज्याच्याबद्दल मी केवळ ऐकून होतो. पण जेव्हापासून कवी ग्रेस ने या पक्ष्याच्या नावाने फ्रेंच कवी Charles Baudelaire यांनी लिहिलेल्या कवितेचा उल्लेख केलेला वाचला तेव्हापासून जणू ही कविताच Albatross बनून माझ्या डोक्यात घिरट्या घालत होती. आज योग्य आलेला आहे त्या कवितेबद्दल आणि त्या कवितेतील अर्थाबद्दल माझे विचार मांडायचा.

ही कविता वाचल्यावर कवी ग्रेस यांच्या खालील वाक्याची प्रकर्षाने आठवण झाली,
Every man is a special kind of artist हे लोकांना फार सुखावणारं वाक्य आहे.. पण ते खोटं आहे. Every artist is a special kind of man!
कवी ग्रेस यांनी कलावंत आणि कलावंताचे समाजात जगणे व त्याचे समाजात असलेले स्थान यांच्याबद्दल विचार मांडताना या कवितेचा आधार घेतला. या कवितेत खलाशी विनाकारण एका पक्षाला त्रास देतात, त्याला हिणवतात आणि तो पक्षी जगात जगण्याकरता कसा नालायक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. ग्रेस यांना ही कविता खूप भावली आणि कलावंताच्या जगण्याचे वास्तवदर्शी दर्शन म्हणून त्यांनी संदर्भ म्हणून मांडली. पुढे या कवितेचा उल्लेख कवी ग्रेस यांच्या कवितांवर आधारित “साजणवेळा” या कार्यक्रमात देखील करण्यात आला.
या ब्लॉगमध्ये मूळ कविता, तिचा मराठी अनुवाद आणि भावार्थ पाहू!

The Albatross (L’Albatros) कविता आणि अनुवाद
Souvent, pour s’amuser, les hommes d’équipage
Prennent des albatros, vastes oiseaux des mers,
Qui suivent, indolents compagnons de voyage,
Le navire glissant sur les gouffres amers.
अनेकदा स्वतःची कमाणूक करण्यासाठी खलाशी
अनंत आकाशाचे प्रवासी अल्बेट्रॉस पक्षाला पकडतात
जे रेंगाळत रेंगाळत होडीच्या आजूबाजूला उडत असतात
जेव्हा ती होडी खोल आणि खाऱ्या पाण्यावर तरंगत असते
À peine les ont-ils déposés sur les planches,
Que ces rois de l’azur, maladroits et honteux,
Laissent piteusement leurs grandes ailes blanches
Comme des avirons traîner à côté d’eux.
आणि त्या पकडलेल्या पक्षाला होडीमध्ये उतरवताच
तो आकाशाचा सम्राट विचित्र आणि ओंगळवाणा दिसू लागतो
जेव्हा तो आपल्या विशाल पंखांना जवळ घेऊन
दोन बाजूंना वल्हे फरफटत नेल्यासारखा बेढब चालू लागतो
Ce voyageur ailé, comme il est gauche et veule!
Lui, naguère si beau, qu’il est comique et laid!
L’un agace son bec avec un brûle-gueule,
L’autre mime, en boitant, l’infirme qui volait!
हा पंख असलेला प्रवासी.. इतका दुबळा आणि बावळट
आधी किती देखणा आणि आता केविलवाणा आणि हास्यास्पद दिसतो
एक जण त्याच्या सोनेरी चोचीत चिरुटाचे टोक घुसवून त्रास देतो
दुसरा उड्या मारून नक्कल करून कधी भरारी घेतलेल्या पक्षाला खिजवतो
Le Poète est semblable au prince des nuées
Qui hante la tempête et se rit de l’archer;
Exilé sur le sol au milieu des huées,
Ses ailes de géant l’empêchent de marcher.
कवी या मेघांच्या राजपुत्रासारखाच असतो
जो वादळाशी झुंजायला आणि रोखलेल्या बाणांना आव्हान द्यायला आवडतं
पण जमिनीवर येताच सगळीकडे त्रास देणारी माणसांची गर्दी असते
आणि मग त्याचं हे विशाल पंखांचं अस्तित्व त्याच्या चालण्याच्या आड येतं

भावार्थ
चार्ल्स बोडलेअर यांची L’Albatros (Albatross) ही कविता १८५७ मध्ये प्रकाशित झालेल्या Les Fleurs du Mal (दु:खाचे फूल) या संग्रहातील आहे. ही कविता कवीच्या आणि व्यापक स्तरावर कलावंताच्या जीवनातील विरोधाभास आणि कलाकाराच्या संघर्षाचे चित्रण करते. या कवितेत चार्ल्स यांनी कलावंतासाठी Albatross या पक्ष्याचे रूपक वापरलेले आहे.
आकाशात उडणारा Albatross पक्षी म्हणजे कवी, कलावंत ज्याचा जन्म उडण्यासाठी झालेला आहे. देवाने त्याला विशाल पंख म्हणजे कल्पनाशक्ती आणि प्रतिभा देऊ केलेली आहे. भावनांचे, संवेदनांचे, शब्दांचे आणि कलेचे अनंत आकाश त्याला विहरण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी, स्वतःच्या सीमा वाढवण्यासाठी मिळालेले आहे. एक त्याचे स्वतःचे विश्व जिथे तो राजा असतो, त्याचे अस्तित्व सर्वस्व असते. या विश्वात तो तो जसा आहे तसा राहू शकतो.
खालचा समुद्र खोल वेदना आणि खाऱ्या अनुभवांचे प्रतीक आहे.
होडीतून झुंड बनवून प्रवास करणारे असंवेदनशील, थट्टा करणारे खलाशी, म्हणजे कलावंताच्या विश्वाचा मागमूस देखील नसलेला समाज किंवा लोक. हे लोक कायम अक्षत उडणाऱ्या पक्षाची थट्टा करत असतात. त्याला पकडून आपल्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. एकदा हा अनंतात विहार करणारा कलाकार त्याच्या पातळीवर आला की त्यांना आनंद होतो. समाज वाट बघत असतो की कधी कलाकाराला खाली उतरवावे आणि त्याला छळावे!
या क्रूर समाजाला आनंद होतो जेव्हा आपले विशाल पंख घेऊन मुक्तपणे उडणारा कलावंत जमिनीवर त्यांच्या सामान्य पातळीवर येतो. हा असंवेदनशील क्रूर समाज, या जायबंदी कलाकाराला त्रास देतो. जायबंदी झालेला कलाकार सुद्धा अत्यंत केविलवाणा आणि बेढब दिसतो. त्याचे प्रतिभेचे पंख, जगाच्या पातळीवर त्याला चालू देत नाहीत. लोकांना त्यांचे महत्व समजत नाही. ती प्रतिभा चेष्टेचे कारण बनते.
एखाद्या कलावंताचे हे अत्यंत करुण दृश्य आहे.
Charles Baudelaire (चार्ल्स बोडलेअर) यांच्याबद्दल
चार्ल्स बोडलेअर (१८२१-१८६७) हे फ्रेंच कवी होते, ज्यांना ‘Decadent’ (पतनशील) साहित्याचे जनक मानले जाते. त्यांची मानसिकता अलगाव, दु:ख आणि समाजाविरुद्ध बंडखोरीने भरलेली होती. ते स्वत:ला समाजात ‘निर्वासित’ समजत असत, कारण त्यांची संवेदनशीलता आणि कल्पनाशक्ती सामान्य लोकांना समजत नव्हती. ही कविता बोडलेअरच्या स्वत:च्या जीवनाचे प्रतिबिंब आहे. ते पॅरिसमध्ये राहत असताना, त्यांना आर्थिक अडचणी, व्यसन आणि रोग (सिफिलिस) यांनी त्रास दिला. त्यांची मानसिकता उदासीनता (Melancholy) आणि निराशावादाने प्रभावित होती, ज्यात ते सौंदर्य शोधत असत पण नेहमी दु:खात संपत असत.
कवी म्हणून, बोडलेअर स्वत:ला ‘ढगांचा राजपुत्र’ समजत असत, जो वादळात (जीवनाच्या संकटात) हसतो पण जमिनीवर (वास्तवात) अपमानित होतो. हे त्यांच्या मानसिक संघर्षाचे दर्शवते. कलाकार म्हणून ते मुक्त असतात, पण समाजाच्या टोमण्यांमुळे (जसे त्यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यात आली) ते दुखावले जातात. त्यांची मानसिकता रोमँटिक प्रभावाने भरलेली होती, ज्यात ते देव, निसर्ग आणि मानवी कमकुवतपणावर प्रश्न उपस्थित करत. शेवटी, ही कविता बोडलेअरच्या मनातील एकटेपणा, प्रतिभेचा बोझा आणि समाजाच्या क्रूरतेविरुद्धच्या रागाचे चित्रण करते, जे आजही अनेक कलाकारांच्या मानसिकतेला लागू होते.

आणखीन कवितांचे भावार्थ वाचण्यासाठी इथे क्लिक करा.