थोर स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट म्हणजेच पांडुरंग महादेव बापट यांच्याबद्दल मराठी जनमानसात खूप कमी माहिती आहे. हे आपले दुर्दैव आहे की इतक्या मोठ्या क्रांतिकारकाबद्दल आपल्याला विशेष माहिती नाही. इतकेच काय, सेनापती बापट यांनी कविता देखील रचलेल्या आहेत हे किती जणांना माहित आहे? क्वचितच कोणाला सेनापती बापटांच्या कवितांबद्दल माहिती असेल.
मातृभूमीच्या सेवेसाठी सदैव तत्पर एक प्रखर स्वातंत्र्यसैनिक पण त्याच वेळेला समाजात स्वातंत्र्यप्राप्तीच्या दृष्टीने दिसणाऱ्या उदासीनतेबद्दल उद्विग्न! समाजाला जागृत करण्यासाठी सेनापती बापटांनी रचलेल्या या अभंगाचे वाचन केल्यावर त्यांच्या मातृभूमी-भक्तीची प्रचिती येते. मातृभूमीची सेवा म्हणजे परमेश्वराची भक्ती! भक्तीच्या सर्वोच्च ठिकाणी त्यांनी मातृभूमीचे प्रेम नेऊन ठेवले आहे. त्यांच्या कवितेत लोकांविषयी तळमळ स्पष्टपणे दिसून येते. आयुष्यात अनेक टप्प्यांवर लोकांची योग्य साथ न मिळाल्याने खचून न देता ते राष्ट्रसेवा हीच हरीची भक्ती म्हणत लोकांना लढण्यासाठी आवाहन करत आहेत. सेनापती बापटांच्या कवितेत, सर्वसामान्यतः कवितेकडून आपल्या ज्या शृंगारिक, अलंकारिक अपेक्षा असतात त्या कदाचित पूर्ण होणार नाहीत पण त्यांचे भाव शुद्ध असल्यामुळे सध्या भाषेतला हा अभंग मनाला भावतो!
देशाचा संसार, माझे अंगावरी
ऐसे थोडे तरी, वाटू द्याहो
वाटू द्या हो, थोडे तरी प्रत्येकासी
माझी कासाविसी, याचसाठी
याचसाठी तुम्हा, हात जोडीतसे
कोणी म्हणतसे, वेडा झाला
वेडा झाला देश, माऊलीचे साठी
होते पुण्य गाठी, हेचि खरे
हेचि खरे देवा, आवडता झालो
तेणें निवडिले, देशसेवे
देशसेवेसाठी, व्हावेत वेडे सगळे
ज्यांना ज्यांना कळे, धर्म तत्व
धर्मतत्व तेचि, जो का उपकार
त्याचाचि आधार, सज्जनांसी
सज्जनांसी, चहू कडूनि टोचिती
कितीक छळिती, छळक ते
छळक ते अंती, मनी पस्तावती
सज्जनाची शांती, देखोनिया
देखोनिया शांती, कारण शोधीती
तेथ आलोकिती, भूतदया
भूतदया बीज, उपकार फळ
शांती ते अढळ, उपकारी
उपकारी ज्यांना, सार्थकता वाटे
सोशिती चपेटे, संकटाचे
संकटाचे काळी, हृदयनिवासी
आपल्या भक्तासी, धीर देई
धीर देई की जो, पर उपकार
तोचि तो साचार, धर्मतत्व
धर्मतत्व ज्यांनी, आपुलेसे केले
त्यांसी बोलाविले, देशसेवे
देशसेवेसाठी, राबावे काहीसे
हेचि मज पिसे, सत्य सत्य
सत्य सत्य माझी, विद्या शक्ती थोडी
परी देवा गोडी, भक्तीचीच
भक्तीचीच गोडी, सुदाम्याचे पोहे
गोड करिताहे, हरीमुखी
हरीमुखी मीही, घालीतसे पोहे
मूठभरि तो हे, स्वीकारिल
स्वीकारीत भावे, केली देशसेवा
मज शांतिमेवा, वाढीतसे
वाढीतसे हरी, मोक्षाचे वाढणे
ज्यासी ज्यासी येणे, त्याने यावे
यावे यावे ऐसी, हांक दे लोकांसी
ऐसे मजपासी, हरी बोले
हरी बोले मी तो, बोलावणेकरी
तुम्हासी पाचारी, हरीसाठी
हरीसाठी तुम्हां, बोलावणे केले
आले वा न आले, मज काय
मज काय मी तो, सेवक हरीचा
वेडापिसा त्याचा, त्यासी गोड
त्यासी गोड व्हाल, जेणे ते तुम्हांसी
गूढ सज्जनांसी, सांगितले
सांगितले की त्या, सेवा-अनुरक्त
वाढवतो भक्त, स्वदेशाचा!