संत ज्ञानेश्वर महाराज “माऊली” महाराष्ट्राच्या अध्यात्मिक नभांगणातील एक अढळ आणि प्रखर ध्रुवतारा. इतक्या कमी वयात इतकी अध्यात्मिक उंची गाठणं हे फक्त अवतारी पुरुषच साधू जाणे! माऊलींचा हरिपाठ उघडला की पहिले शब्द समोर येतात ते म्हणजे “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी”. केवळ हे चार शब्द वाचताच आजूबाजूचा प्रपातासारखा वाहणारा काळ एका क्षणात सामावून जातो आणि उरते ती पवित्र शांतता! हे शब्दसामर्थ्य उगाच लाभत नाही. ज्या दिव्यात जितके तेल आणि वातीत क्षमता असेल तितका तो प्रकाश देणार. याला जोड मिळाली ती सुरेश वाडकर यांच्या स्वरांची आणि श्रीधर फडके यांच्या संगीताची.
किमान क्षणभर देवाच्या समोर हात धरून डोळे मिटून त्या वातावरणाचा अनुभव, अनुभूती ज्यांनी घेतली आहे त्यांना “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी” या रचनेतील भाव समजणं सहज शक्य आहे. ज्यांना ही अनुभूती नाही त्यांना आवर्जून सांगेन की एकदा तरी ही अनुभूती घ्या! असो, भाव माहित असला तरी भावार्थ माहित असेलच असे नाही. त्यामुळे या अत्यंत लोकप्रिय अशा अभंगाचा भावार्थ या ब्लॉगमध्ये देत आहे.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।।
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।।
असोनी संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा ।।
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी ।।
देव भावाचा – भक्तीचा भुकेला असतो आणि भक्तीला कुठले परिमाण नाही. त्यामुळे त्याची मोजदाद होऊ शकत नाही. भक्ती, एकतर असते किंवा नसते. इथे अर्धवट भाव कमी येत नाही. जो संपूर्ण भक्त आहे त्याला एक क्षण देखील पुरे असतो त्या देवाशी, परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी, त्याचे स्मरण करण्यासाठी. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाचिये द्वारी उभा क्षणभरी जो फक्त एक क्षण पूर्ण भक्तिभावाने देवाच्या द्वारी उभा राहिला तेणे मुक्ती चारी साधियेल्या, त्याला चारही मुक्ती प्राप्त होतात. अट एकच तो क्षण मनुष्याने संपूर्णपणे स्वतःला देवाच्या स्वाधीन केले पाहिजे, समर्पित केले पाहिजे. अशा माणसाला चारही मुक्ती म्हणजे सायुज्य, सालोक्य, सारुप्य, सामिप्य अर्थात मोक्षप्राप्ती होते. एका अर्थी पाहायला गेलं तर माऊली आपल्याला सांगत आहेत की “किमान काही क्षण तरी देवासमोर नतमस्तक व्हा!”
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याला चार खांब आहेत. असे म्हणतात की हे चार खांब चार मुक्तींचे द्योतक आहेत. आणि जो कोणी या गाभाऱ्यात येईल म्हणजेच या चार खांबांच्या मध्ये येईल त्याला चारही मुक्ती प्राप्त होतात.
पुढच्या पंक्तीत माऊली म्हणतात हरि मुखे म्हणा एकदा नव्हे दोनदा! सर्वसामान्य लोकांना माऊली कळकळीने म्हणत आहेत मुखी देवाचे नाव असू द्या. मुखी सतत देवाचे नाव असू द्या. पुण्याची गणना करू नका पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना करायची नसते केवळ परमेश्वराचे नाव घ्यायचे असते. अध्यात्मात मोक्षप्राप्ती हवी असेल तर मुळात माणसाने कोणत्याही आसक्तीला बळी पडू नये. या पंक्तीचा आणखीन एक अर्थ असाही निघू शकतो की जर तुमच्या मुखी कायम परमेश्वराचे नाम असेल तर तुम्ही कमावलेल्या पुण्याची गणना देखील करता येणार नाही इतका संचय होईल!
पुढच्या पंक्तीत माऊली सर्वसामान्य माणसांना उपदेश करतात असोनी संसारी जिव्हे वेगु करी म्हणजे तुम्ही संसारी आहात म्हणजे तुम्हाला परमेश्वरप्राप्ती होणार नाही असे मुळीच नाही. पण यासाठी एक गोष्ट करणे गरजेची आहे ती म्हणजे, जिव्हे वेगु करी मुखावर हरी नाम घेणे वेगाने होऊ दे! आपल्याला अनेक संतांबद्दल माहिती आहे की ते आपला उद्योग धंदा करत असताना सतत नामाचा जप करीत. माऊली म्हणतात सर्वसामान्य माणूस ज्याला वेदशास्त्रे माहित नाहीत त्याने फक्त कायम नामस्मरण केल्याने सुद्धा वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा अशा थकलेल्या असतात. कायम नामस्मरण करणाऱ्या संसारी माणसाला देखील वेदशास्त्रे दंडवत करतात, महान मानतात! थोडक्यात सामान्य संसारी मोक्षप्राप्तीसाठी नामस्मरण गरजेचे आहे.
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा , शेवटच्या पंक्तीत ज्ञानेश्वर माऊली इतिहासाचा दाखल देतात की महर्षी व्यास रचित महाभारतात, पांडव ज्यांचा अध्यात्म, योग किंवा वैराग्यशी फारसा संबंध नव्हता, त्यांच्या घरी स्वयं परमपरमेश्वर श्री कृष्ण देखील गेले! याचे मुख्य कारण असे की सगळ्या पांडवांची श्रीकृष्णावर भक्ती होती. त्यामुळे पांडव आणि द्रौपदी यांनी जेव्हा जेव्हा श्रीकृष्णाचे स्मरण केले भगवान तेव्हा तेव्हा त्यांच्या मदतीला धावले मग ते हस्तिनापूर असो, की वन असो की इंद्रप्रस्थ असो! द्वारकेचा राणा पांडवा घरी थोडक्यात माणसाच्या मनात परमेश्वराचे नाव असेल, भक्ती असेल तर देव सुद्धा भक्ताच्या घरी येतो. भक्त पुंडलिकाची गोष्ट देखील प्रसिद्ध आहेच!
हा होता “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी” या अभंगाचा भावार्थ. आपल्या संतांचे विचार इतरांपर्यंत नक्की पोहोचवा.
खूप सुंदर लेख! मन शांत झाले! पैलू उलगडून दाखवणे म्हणजे काय याच ऊत्तम उदाहरण!!
धन्यवाद 🙏
सुंदर लेख….
धन्यवाद!
मुखातून नाम घेण्या साठी ब्रम्हज्ञान घेणं अत्यावश्यक आहे जी आणि ते नाम फक्त समयाच्या सद्गुरू कडून घ्यायला पाहिजे असं शास्त्र आणि धर्म ग्रंथ ग्वाही देतात जी
समयाच्या सद्गुरू ला शोधायला वेळ लागेल जी पण देवाची ओळख (ज्याचं मूळ स्वरूप निराकार आहे जी) तोच करून देईल जी ज्यांनी त्याला बघितलं आहे.
देवाला बघण्याची विधी खालच्या गीतेच्या श्लोक मधे आहे जी
*भगवत गीता अध्याय ४, श्लोक ३४*
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया।
।।4.34।। उस (ज्ञान) को (गुरु के समीप जाकर) साष्टांग प्रणिपात, प्रश्न तथा सेवा करके जानो; ये तत्त्वदर्शी ज्ञानी पुरुष तुम्हें ज्ञान का उपदेश करेंगे।।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः।।4.34।।