संत मुक्ताबाई, साक्षात मुक्तीचा मार्ग! ज्ञानदेवांना “ताटी उघडून” विश्वाला उपदेश द्या सांगणाऱ्या संत मुक्ताबाई! त्यांना आपण प्रेमाने मुक्ताई देखील म्हणतो. संत मुक्ताबाई यांनी देखील अभंग रचले. अद्वैतावर त्यांचे भाष्य विचार करायला लावणारे आणि गूढ आहे. प्रत्येक शब्द जणू शिवधनुष्य आहे. खऱ्या अर्थाने ज्याला इंग्रजीत आपण “Mystic” म्हणतो तशा मुक्ताई आहेत. त्यांच्याच अभंगाच्या संग्रहातील एक अप्रतिम अभंग म्हणजे “प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण”. जगात एकाच वेळी सगुण आणि निर्गुण प्रकृतीत गोष्टी अस्तित्वात असतात. त्यांच्याविषयी ज्ञान असणे महत्वाचे आहे.
प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण । दीपें दीप पूर्ण एका तत्त्वें ॥ १ ॥
देखिलेंगे माये पंढरिपाटणीं । पुंडलिका आंगणी विठ्ठलराज ॥ २ ॥
विज्ञानेंसी तेज सज्ञानेसी निज । निर्गुणेंसी चोज केलें सयें ॥ ३ ॥
मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल । निवृत्तीनें चोखाळ दाखविलें ॥ ४ ॥
प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण, संत मुक्ताबाई म्हणतात की प्रकृति एकाच वेळी सगुण आणि निर्गुण स्वरूपात आपल्या समोर येते. याचे एक उत्तम रूपक म्हणजे दीप! दृष्टीला दिसणारा दीप हे त्या दिव्याचे सगुण रूप पण मनात उजळणारा सत्य, ज्ञान आणि पुण्याचा परमात्मरूपी दीप हे त्याचे निर्गुण स्वरूप! दीपें दीप पूर्ण एका तत्त्वें.. दिव्यात दिवा हे त्याचे पूर्ण स्वरूप.
पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ कोणाला नसते? परमेश्वर, योगेश्वर पांडुरंग निर्गुण निराकार आहे आणि तरीही पंढरपुरी जाऊन त्या सावल्या परब्रह्माचे दर्शन घ्यायची लालसा कोणाला नसते. देखिलेंगे माये पंढरिपाटणीं हे त्या परमेश्वराचे सगुण रूप आणि पुंडलिका आंगणी त्याच्या अंगणात विटेवर उभा विठ्ठलराज आपल्या निर्गुण स्वरूपात येतो केवळ भक्तासाठी!
पंचेंद्रियांच्या आधारावर उभे असलेले आपले विश्व, ज्याला जे हाती लागले त्याच्यावर स्वर झाले! त्यामुळे व्यक्ती किंवा वस्तूच्या गुणांच्या बाह्यस्वरूपावरून त्या व्यक्तींची किंवा वस्तूंची प्रचिती येते. विज्ञानेंसी तेज, विज्ञान म्हणजे विविध गोष्टींचे ज्ञान, ते असल्याचे तेज उठून दिसते. विज्ञानाने ते तेज आपलेसे केले. सज्ञानेसी निज, इथे निज चा अर्थ आम्ही स्थिरता असा घेतो आहोत. सज्ञानाने स्थिर बुद्धी ला आणि स्थिर आचरणाला आपलेसे केले. पण प्रश्न असा येतो की, निर्गुणाने कशाला आपलेसे केले? निर्गुणेंसी चोज केलें सयें चोज म्हणजे ज्याची ख्याती अथवा माहिती आपोआप जाणवते. ज्याच्या माहितीसाठी कुठल्या भौतिक गोष्टीची गरज नाही. याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येते जेव्हा कधी पांडुरंगाचा धावा गाताना किंवा ऐकताना डोळ्यांतून नाकाला पाणी येते. त्या क्षणाचा अनुभव असणाऱ्यांना चोज समजायला अवघड नाही! संत मुक्ताबाई यांनी इतके मोठे गूढ केवळ काही शब्दात सांगितले आहे. अशी उदाहरणे विरळच.
अखेर मुक्ताबाई आपले गुरु संत निवृत्तीनाथांचे देखील आभार मानतात. संत मुक्ताबाई विठ्ठलाला आपला तारक म्हणतात. मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल. सम्यक म्हणजे सर्वज्ञ! निवृत्तीनाथ महाराजांनी या निर्गुण पांडुरंगाचे दर्शन घडवले जो तारणहार झाला!
इतके अप्रतिम अभंग आपल्या संतांनी रचून ठेवलेले आहेत हे आपले भाग्य!
आपल्या संतांची आणखीन एक गोष्ट जी सहसा कोणी सांगत नाही ती म्हणजे, आपल्या आयुष्यात कितीही दुःखाचे लोट आले तरीही त्यांनी ना आपला धर्म सोडला आणि ना देवाला नवे ठेवली! त्यांनी पूर्ण प्रयत्न करून आपल्या धर्मातील अनिष्ट गोष्टींचा कडाडून विरोध केला. पण धर्म सोडला नाही! आमच्या मते हे खरे समाज सुधारक आहेत! आणि हे स्वार्थापोटी स्वधर्म सोडून मोठ्या झालेल्या तथाकथित सुधारकांपेक्षा कैक पटीने अधिक पूज्य आहेत.
सकल जिवांची आई, माझी मुक्ताई!