पूर्वी जपानमध्ये एक जोशु नावाचे एक गुरु होऊन गेले. जोशु गुरु त्यांच्या दुर्बोध सवयींसाठी प्रसिद्ध होते. ते त्यांच्या मठात येणाऱ्या प्रत्येकाला “चहा घ्या” असं म्हणत चहा देत असत. बाकी काही विषय वाढत नसे!
एकदा एक प्रवासी जोशुंकडे आला. जोशु गुरु सगळ्यांना चहा देत होते. त्यांनी अनोळखी प्रवासी माणसाला विचारले
“अनोळखी माणसा, आपण याआधी भेटलो आहोत का?”
“नाही गुरुजी” अनोळखी प्रवासी उत्तरला.
“मग हा चहा घ्या” असं म्हणून जोशु गुरु त्याला चहा देतात.
त्यानंतर जोशु गुरु, एका उपासकांकडे वळतात आणि विचारतात.
“आपण, याआधी भेटलो आहोत का?
“हो. मी याच मठात गेली तीन वर्षे राहत आहे. आपण एकमेकांना ओळखतो” उपासक उत्तर देतात.
“बरं, मग हा चहा घ्या” असं म्हणत जोशु गुरु त्या उपासकांना चहा देतात.
हे पाहून मठाचे मुख्य गुरु थोडे विचलित होतात आणि जोशु गुरूंना विचारतात.
“तुम्ही हे प्रत्येकाला आपण एकमेकांना भेटलो आहोत का? असं का विचारता? आणि उत्तर काहीही असले तरीही तुम्ही त्याला चहा देता! हा काय प्रकार आहे?”
जोशु गुरु शांतपणे त्यांच्याकडे बघतात आणि विचारतात,
“मुख्य गुरु, तुम्ही आत्ता इथे आहात का?”
“अर्थात!” मुख्य गुरु उत्तर देतात.
“मग आता हा चहा घ्या!” असं म्हणून जोशु गुरु, मुख्य गुरूंना चहा देतात.
इतर झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.