November 14, 2024
आ नो भद्राः क्रतवो – अर्धवट अनुवाद.. अर्धवट ज्ञान

आ नो भद्राः क्रतवो – अर्धवट अनुवाद.. अर्धवट ज्ञान

Spread the love

“आ नो भद्राः क्रतवो” आणि आपली सोय

“आ नो भद्राः क्रतवो” एक वाक्य जे मी, हातातल्या पत्त्यांसारखे फेकलेले आहे, अनेकांनी सोयीस्कररीत्या वापरलेले आहे. “अहिंसा परमो धर्म:” या अर्धवट श्लोकाबद्दल माहिती असेलच! भारताला आणि भारतीयांना आपल्या इतिहासाबद्दल विशेष काही माहिती नसते. त्याहूनही भयंकर परिस्थिती संस्कृत ग्रंथांबद्दल असलेल्या ज्ञानाबद्दल आहे. लोक लगेच म्हणतील की “तुम्हीच शिकवलं नाही”. चला या वादात न पडता, या अपेक्षेची पूर्तता करतो! एका गोष्टीची मात्र खात्री देतो की, एकदा तुम्ही हे वाचल्यानंतर विसरू शकणार नाही. माझी इच्छा देखील हीच आहे. तुम्ही देखील हा “पूर्ण अनुवाद” संदर्भासह लोकांपर्यंत पोहोचवाल.

भारतात कोणाला स्वतःची, म्हणजेच स्वतःची स्वतःच्याच इतिहासाकडून पाठ थोपटून घ्यायची झाली की ते वेद, महाभारत, रामायण, पुराण, उपनिषद आणि मनुस्मृती (होय मनुस्मृती देखील!) मधून आपल्याला पटेल, आवडेल आणि समजेल तेवढा “अर्धवट” भाग उचलतात आणि समोरच्या माणसाच्या तोंडावर, कोणताही संदर्भ न पत्त्यांसारखे फेकतात. आधी म्हटल्याप्रमाणे मी देखील हे केलेले आहे. माझ्या प्रवासाबद्दल बोलण्याची ही जागा नाही, पण बाकीच्यांप्रमाणे मी देखील हे केलेले आहे. सांगणाऱ्याने सांगायचं असतं. ऐकणाऱ्याला संस्कृत ऐकून तसेही दबून जायला होतं. सांगणारा संदर्भ सांगत नाही आणि ऐकणाऱ्याला अर्थ देखील समजत नसतो. तसं पाहिलं तर win-win situation आहे. सांगणाऱ्याची कॉलर ताठ होते. पण…

या सगळ्या उहापोहात मूळ अर्थ आणि संदर्भ बाजूला राहतात. “आ नो भद्राः क्रतवो” चेच उदाहरण घेऊ. किती लोकांना माहित आहे की हे वाक्य किंवा पंक्ती, “ऋग्वेद” मधील आहे? ही पंक्ती एका संपूर्ण श्लोकाचा एक छोटा तुकडा (subset) आहे. ऋग्वेदाच्या ८९व्या मंडळातील (स्वस्तिवाचन) हा पहिला श्लोक आहे.

आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतोऽदब्धासो अपरीतास उद्भिदः।
देवा नोयथा सदमिद् वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवेदिवे॥

ऋग्वेद (१.८९) – स्वस्तिवाचन

स्वस्तिवाचन

स्वस्तिवाचन, म्हणजे असे श्लोक जे कोणतेही “शुभ कार्य” करण्याआधी उच्चारले जातात. कोणतेही, म्हणजे कोणतेही! चांगले कार्य करण्याआधी देवाचे आवाहन करणे, त्याच्या कृपेची याचना करणे आणि ते कार्य निर्विघ्नपणे सिद्धीस नेण्यास साहाय्य करणे यासाठी देवांचे आवाहन केले जाते. तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि भारताबद्दल संकुचित मत असणाऱ्या पाश्चात्यांनी निर्माण केलेल्या कारकुनी शिक्षण पद्धतीत वर नमूद केलेल्या कुठल्याही गोष्टीचे ज्ञान किंवा किमान माहिती देखील आपल्याला दिलेली नसते. (अर्थात आता, म्हणजे २०२२ साली हे ज्ञान न देणे यासाठी समाज कोणाला प्रश्न विचारेल माहित नाही. पण आता गुरुकुल व्यवस्था नसल्यामुळे आम्ही सुटलो असं म्हणायला हरकत नाही!)

पूर्वीच्या काळासाठी एका समाजावर खापर फोडले जाते पण, २०२२ मध्ये जर शाळांमध्ये पूर्ण आणि योग्य ज्ञान मिळत नसेल तर त्याचे खापर कोणावर फोडणार?

आ नो भद्राः क्रतवो प्रचलित अर्थ आणि मूळ अर्थ

असो…

लोकांना माहित असलेला किंवा पुनःपुन्हा सांगितलेला गेलेला अर्थ

"जगात असलेले सगळे उत्तम विचार सर्व दिशांनी आमच्याकडे येवो (Let noble thoughts come to us from every side)"

आता आपण संपूर्ण श्लोकाचा अर्थ समजून घेऊ म्हणजे, हे अर्धवट वाक्य पत्त्यांसारखं फेकताना आपण किमान एकदा तरी विचार करू की, ऋग्वेद कोणत्या संदर्भात हे सांगतो? ऋग्वेदातील हे स्वस्तिवाचन सर्व देव – देवतांना केलेले आवाहन आहे.

संस्कृत श्लोकाची फोड पुढीलप्रमाणे

आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतोऽदब्धासो अपरीतास उद्भिदः। 
देवा नोयथा सदमिद् वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवेदिवे॥

आ नो = आमच्यापर्यंत
भद्राः क्रतवो = उत्तम निश्चय/संकल्प/विवेक/प्रज्ञा/विचार इत्यादी
यन्तु = येऊ दे
विश्वतः = विश्वातून
अदब्धासः =अविचल/अविरत/अपराजयी/संपूर्ण विश्वासार्ह
अपरीतास = असीमित/अबाधित/अबाध्य
उद्भिदः = कारंजासारखे पसरणे/विखुरणे

देवा = देव
नो यथा = मला सुद्धा / मला ज्याप्रमाणे
सदम् इद = नेहमीप्रमाणे
वृधे = वाढणे/ वृद्धी
असन्नप्रायुवो = असन् + अप्रायुवो (अप्रायु) = होणे/असणे/स्थापित/राहणे + साक्षेपी/सुयोग्य/सतर्क
रक्षितारो = रक्षण करणे/करा
दिवे = दिवस/ प्रत्येक दिवस

आता या अर्थांचे सार सांगतो

(हे देवा) विश्वातले सर्व उत्तम विचार/संकल्प, जे अविरत, शाश्वत, अबाधित आणि संपूर्णपणे विश्वास ठेवण्यायोग्य आहेत ते अपराजयी, अकुंठित होवोत आणि आमच्यापर्यंत एखाद्या कारंज्याच्या तुषारांच्या छिडकाव्याप्रमाणे येवोत.
सदा (आमच्या) प्रगतीला, वृद्धी कदापि न थोपणारे देव (येथे) साक्षेप रूपाने स्थानापन्न होवोत आणि प्रत्येक दिवशी आमची रक्षा करोत.

आपल्याकडे, आपल्या समाजात आणि शाळेत पहिले काही शब्द सोडले तर कोणताही संदर्भ समोर आणत नाहीत. नुसते उत्तम विचार मनात येणं आणि त्याच्याबरोबर देवांना वृद्धी आणि रक्षणासाठी आवाहन करणे यात खूप फरक आहे. पण “धर्मनिरपेक्ष” व्यवस्थेत देवांना जागा नसते. सगळ्यात विनोदी गोष्ट म्हणजे नास्तिक लोकही या श्लोकातील पहिले काही शब्द आपल्या सोयीप्रमाणे वापरतात! त्यांना हे माहीतच नसतं की ही देवाला केलेली प्रार्थना आहे, आवाहन आहे.

सोयीस्कर अध्यात्म

आपण देव आणि अध्यात्मिक अर्थ सोयीस्कररीत्या (नेहमीप्रमाणे) टाकून दिलेला आहे. आणि केवळ आपल्याला वापरता येतील अशा पत्त्यांप्रमाणे श्लोकाचा एक भाग वापरत आहोत. प्रश्न हा आहे की, वेदांच्या रचनाकारांचा दृष्टिकोन कोण लक्षात घेईल. तुम्ही रचलेल्या कवितेतील किंवा वाक्यातील काही भाग कोणताही संदर्भ न देता भलत्याच आणि स्वार्थी कारणासाठी वापरला तर तुम्हाला आवडेल का? उत्तर हो असेल तर आत्ता ज्याप्रमाणे “आ नो भद्राः क्रतवो” वापरलं जातं ते योग्यच आहे. आणि जर उत्तर “नाही” असेल तर पुढच्या वेळी कोणी हे शब्द कोणतेही संदर्भ न देता केवळ आपल्या फायद्यासाठी वापरत असेल तर स्वतःला, आजूबाजूच्या लोकांना वर सांगितलेला अर्थ नक्की सांगा!

🙏🏻


आणखीन ब्लॉग वाचायचे असल्यास इथे वाचता येतील!

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *