३ जानेवारी २०१७, पुण्यातील छ. संभाजी महाराज उद्यानातील राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली. ज्यांनी विटंबना केली त्यांचा कला, लेखन, वाचन, इतिहास या विषयांशी सुतराम संबंध नाही, नव्हता. ज्या संघटनेने त्यांची पाठराखण केली त्यांना तर ब्राह्मणद्वेषाचा विषडोह म्हणायला हरकत नाही. शक्यतो “शब्दयात्री”वर आम्ही राजकारणावर चर्चा करत नाही पण समाजाच्या दृष्टीने जे घटक आहे त्याला अधोरेखित करणे गरजेचे आहे. या संघटनेतील आणि त्यांच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांचा हे द्वेष इतका विकोपाला गेलेला आहे की वाट्टेल तेव्हा आणि वाट्टेल तशा कृती करायच्या इतकंच त्यांना ठाऊक आहे. मोठमोठे राजकारणी यांना पाठीशी घालतात, त्यामुळे यंत्रणा देखील काहीच करू शकत नाही. न्यायव्यवस्थेबद्दल न बोललेलंच बरं.
ज्या दुर्दवी सकाळी ही बातमी समजली तेव्हा राग आणि दुःख एकाच वेळी डोक्यात पिंगा घालत होते. राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या एका प्रसंगामुळे हे कृत्य केले वगैरे कारणे लोक देत होते, द्वेषाचा विषडोह या घृणास्पद कृत्याचे समर्थन करत होते. आयुष्यात कधी एकही पुस्तक न वाचलेले आणि साहित्य कशाशी खातात हे ही माहित नसलेले लोक गुन्हेगारांचं समर्थन करत होते. दुःख याचं वाटत होतं की राम गणेश गडकरी यांच्या शब्दांपेक्षा सुद्धा अधिक अपमानास्पद उद्गार तथाकथित समाजसुधारकांनी – समाज प्रबोधन करणाऱ्यांनी छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांच्याबद्दल काढलेले आहेत. पण त्यांना कोणी काही बोलत नाही, त्यांच्यावर कोणी आक्षेप घेत नाही, त्यांचे पुतळे अजूनही शाबूत आहेत. राम गणेश गडकरी यांचा पुतळा पाडण्यामागे अज्ञान आणि द्वेष पाहून करुणा वाटली, किंवा आली. कोणत्या थरावर आपला समाज येऊन ठेपलेला आहे? इतका द्वेष कुठून येतो? यांच्यात आणि त्या मुर्त्या तोडणाऱ्या, पाडणाऱ्या लोकांमध्ये काय फरक आहे? स्वतःवरची टीका शांतपणे ऐकून घेणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे!?
असो, या विषयावर खूप काही बोलता येईल. पण या ब्लॉगचा महत्वाचा मुद्दा पुढे आहे.
राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडण्यात आला, त्याची विटंबना करण्यात आली तेव्हा अनेक “मराठी” कलाकारांनी अगदी लाखो लाईक्स मिळतील अशा पोस्ट्स केल्या होत्या. बातम्यांच्या वाहिन्या, वर्तमानपत्रे यांत आपली लोभस आणि भावनापूर्ण वाक्ये फेकली होती. वल्गना केल्या होत्या. तेव्हा त्या सगळ्या प्रतिक्रिया बघून थोडा आनंद वाटला होता. पण जसजसे दिवस जात गेले तसतसे हे सगळे तथाकथित मराठी कलाकार जैसे थे वर गेले. इतके की आज जर कुणाला त्या दिवसाबद्दल विचाराल तर कोणाला “दु:ख व्यक्त करण्यापलीकडे” काहीही सुचणार नाही. विशेष म्हणजे त्या कलाकारांना, लेखकांना, कवींना स्वत:ला सारस्वत म्हणताना लाज देखील वाटणार नाही. तसेच एका सारस्वताची विटंबना शांतपणे सहन करत असताना आपण महाराष्ट्राला “सारस्वतांची भूमी” म्हणणं योग्य ठरेल का? याचाही विचार केला गेला पाहिजे.
उदाहरणार्थ खालील पोस्ट वाचा. अर्थातच मी नाव खोडलेले आहे कारण या कलाकारांशी कोणतेही वैयक्तिक वैर नाही. त्यांचा निर्णय घेण्यास ते पूर्णतः स्वतंत्र आहेत. टीका त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर आणि दुतोंडीपणावर आहे.
गमतीचा भाग म्हणजे राम गणेश गडकरी यांचा पुतळा अद्याप बसवण्यात आलेला नाही. आणि २०१७ पासून आत्तापर्यंत या आणि वल्गना करणाऱ्या अशा अनेक दुतोंडी कलाकारांचे शेकडो, हजारो प्रयोग याच उद्यानाशेजारच्या बालगंधर्व रंगमंदिरात झालेले आहेत. दुर्दैव आणखीन काय असतं आणि याहून करुण दुसरं काय आहे? अशा कलाकारांना दुतोंडी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?
आता यांचेही पाठीराखे म्हणतील की “शेवटी पोट आहे”!
अशा वेळी मला कवी ग्रेस यांची वाक्ये आठवतात
“देवा माझ्या कवितेवर जगात कुणालाही मात करू देऊ नकोस”
“Every artist is a special kind of man. कलाकार हा समाजधार्जिणा नसतो, तो समाजशील असतो”
कवी ग्रेस खरे कलावंत होते कारण त्यांना या गोष्टीची जाणीव होती की नुसते छापलेले बिल्ले मिळाले किंवा कार्यक्रमांच्या सुपाऱ्या मिळाल्या म्हणजे कोणी कलावंत होत नाही. कलेशी आणि त्या कलेच्या भक्तांशी ज्यांचे इमान नाही, ते बेईमान आहेत! त्यामुळे तेव्हा तोंड वर करून वल्गना करणारे तथाकथित कलावंत जे आज सगळं काही विसरून गेलेले आहेत ते बेईमान आहेत. विशेष म्हणजे काही जण ज्या लोकांनी राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडण्याचं समर्थन केलं त्यांच्या कंपूत दिसतात. यालाच दुतोंडीपणा म्हणतात.
मला राजकारणी, द्वेषडोहातील मनुष्यरूपी राक्षस यांच्यापेक्षा मराठी कलाकारांबद्दल अधिक राग आहे. कारण या कलाकारांनी एका खऱ्या कलाकाराला वाऱ्यावर सोडले आहे. आपली “राजकीय नाती” जपत जपत, त्यांनी कलेचे तुकडे झाले हे आणि या पुढेही होत राहणार हे ही मान्य केलेलं आहे. कलाकारांनी एका कलाकाराला न्याय मिळावा म्हणून विशेष काही केलेले नाही हे ही सत्य आहे.
त्यांनी कितीही विसरायचा प्रयत्न केला तरीही मी आणि माझ्यासारखे कलेचे भक्त आणि कलाकार राम गणेश गडकरी यांची झालेली अवहेलना, अपमान विसरणार नाही आणि विसरू देणार नाही. हा जागर आहे जो अखंड चालू राहणार. जिथे कलाकाराचा अपमान होतो ती जागा माझ्यासाठी वर्ज्य आहे!
गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी महाराष्ट्राला “मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा” या काव्यात “बुद्धीच्या देशा” म्हणतात तेव्हा प्रश्न पडतो की आपण गडकरींना खोटे ठरवले की काय?