दारूबंदी आणि काही प्रश्न
कोणत्याही देशात कधी ना कधी अशी वेळ येते जेव्हा, नेते दारूबंदी करण्याबद्दल विचार करत असतात. भारतात देखील वेळोवेळी ड्राय डे (दिवसभराची दारूबंदी) घोषित केलेले आहेत. अनेक राज्यांमध्ये कायद्याने दारूबंदी केलेली आहे. दारूबंदी बद्दल लोकांची अगदी टोकाची भूमिका ऐकायला मिळते. अर्थातच यामागे कारणे देखील आहेत. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत, अनेक लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. या सगळ्या समस्यांना रामबाण उपाय म्हणून “दारूबंदी” कडे बघितलं जातं. भारताच्या गेल्या १०० वर्षात देखील अनेक नेत्यांनी दारूबंदी करण्याचे प्रस्ताव केलेले आहेत, दारूबंदी केलेली देखील आहे.
दारूच्या व्यसनाचे सगळे दुष्परिणाम मान्य करून माझ्या मनात काही प्रश्न आधीपासून उमटत आलेले आहेत. अगदी शाळेत असल्यापासून! जर दारूबंदी करणारे नेतेच दारूचे सेवन करत असतील तर त्यांनी स्वत:च्या पायावर धोंडा पडून घेतला का? दारूबंदी केल्याने दारुड्या / व्यसनी लोकांच्या दारू पिण्यात काही कमी होते का? ड्राय डे असूनही काही लोकांना दारू कशी मिळते? ज्या राज्यात दारूबंदी आहे त्या राज्यात दारू मिळतंच नाही का? असे असेल तर त्या ठिकाणी जे बार/पब वगैरे दिसतात तिथे लोकांना काय पाजतात? दारूबंदी झालेली असताना त्या राज्यांमधून वेळोवेळी दारूच्या सेवनातून झालेल्या मृत्यूच्या बातम्या का येतात? ही दारूबंदी देश भर झाली तर दारू बनवणाऱ्या, विकणार्या आणि त्याच्या आजूबाजूला उभ्या असणार्या व्यावसायिकांचे काय होईल?
काही वर्षांपूर्वी बिहार येथे दारूबंदी असल्याने अवैध दारूची तस्करी, त्यातून उद्भवणारी गुंडगिरी, हिंसा, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींबद्दल बातमी वाचल्याचे आठवते. अनेक लोकांचे म्हणणे आहे की दारूबंदी केल्याने नुकसान सरकारचेच होते. लोकांनी व्यसनाच्या अधीन होऊ नये म्हणून, सरकारने दारूबंदी केली पण त्याचा नक्की किती फायदा झाला याबद्दल सरकारी आकडे काय सांगतात? कारण दारू पिणाऱ्यांची संख्या निश्चितच कमी झालेली दिसत नाही. तीच गट धूम्रपानाची आहे, पण तूर्तास दारू आणि दारूबंदी या विषयांवर बोलू. दारूबंदी केल्याने दारूच्या विक्रीतून मिळणार महसूल बंद होतो. त्यामुळे सरकारचे आर्थिक नुकसान होते. इत्यादी इत्यादी इत्यादी! अनेक दिवस हे प्रश्न आणि हे विचार मनात खोलवर कुठे तरी लपवून ठेवलेले होते. पण आजच्या दिवशी, म्हणजे १६ जानेवारी १९२० साली इतिहासात एक घटना घडली. ज्याचे पर्यवसान अमेरिकेसाठी तरी चांगल्या बदलात झाले नाही.
अमेरिकेतील दारूबंदी
१६ जानेवारी १९१९ रोजी अमेरिकेत, संविधानात १८ वी घटना दुरुस्ती करून दारूची निर्मिती, विक्री, आयात, निर्यात आणि वाहतूक यांच्यावर कायद्याने बंदी आणली. आणि इथून अमेरिकेतील “दारूबंदी” ची गोष्ट सुरु होते. या घटना दुरूस्तीची शिफारस १८ डिसेंबर १९१७ साली अमेरिकेच्या काँग्रेस मध्ये करण्यात आली. १६ जानेवारी १९१९ साली या दुरूस्तीला मान्यता मिळाली आणि एक वर्षानंतर म्हणजेच १७ जानेवारी १९२० ही दारूबंदी लागू करण्यात आली. यातून Volstead Act, म्हणजेच National Prohibition Act अमलात आणला गेला. कोणत्याही द्रव्यात ०.५ पेक्षा अधिक टक्के दारू असेल तर त्याला दारू समजून त्याच्यावर बंदी आणली गेली. या कायद्याचे उल्लंघन केल्यास २००० डॉलर्स चा दंड आणि/किंवा वर्षे कारावासाची शिक्षा निश्चित केली गेली. १३ वर्षे लागू असलेली ही दारूबंदी १९३३ साली २१ वी घटना दुरूस्ती आणून उठवण्यात आली. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी घटना दुरूस्ती, एक वेगळी घटना दुरूस्ती आणून हटवण्यात आली.
आता हा इतिहास वाचल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल, जर दारूबंदी केलीच होती तर उठवली कशाला? याचे सोपे उत्तर असे आहे की “अमेरिकन समाजाला दारूबंदीच्या फायद्यांपेक्षा नुकसान खूप जास्त होऊ लागले”.
१७ जानेवारी १९२० पासून दारूबंदी लागू करण्यात आली आणि तेव्हापासून सुरुवात झाली Bootlegging ला. म्हणजेच दारूच्या अवैध निर्मिती आणि विक्रीला! Bootlegging या शब्दाचे मूळ १८ व्या शतकात आहे. जेव्हा तिसर्या जॉर्ज राजाच्या काळात तस्कर मंडळी बूटांमध्ये लपवून मौल्यवान किंवा अवैध वस्तूंची तस्करी करत असत. हाच प्रकार पुढे १९व्य शतकात अमेरिकेत घडला जेव्हा स्थानिक अमेरिकन लोकांशी व्यवहार करताना युरोपियन लोक दारूच्या बाटल्या उंच बूटांमध्ये लपवून जात असत. दारूबंदीची सक्ती होताच सरकारने दारूच्या टाक्याच्या टाक्या, कित्येक लाखो लिटर दारू गटारात ओतून टाकले. दारू विक्रेत्यांची धरपकड सुरु केली. धडाधड अटकसत्र सुरु केले. १९२० पासून अशी दारूची अवैध निर्मिती आणि तस्करी सुरु झाली. दारूबंदी असताना सुरुवातीला काही लोकांनी याचा फायदा उठवला आणि आपले अवैध धंदे सुरू केले.
दारूबंदी आणि गुन्हेगारी
अवैध दारूची तस्करी करणाऱ्या लहान लहान टोळ्या निर्माण झाल्या. त्यांच्यामधूनच स्थानिक गुंड निर्माण होऊ लागले. जिथे जिथे शक्य होते तिथे तिथे भ्रष्ट सरकार, पोलीस, न्यायालये आणि यंत्रणा यांना लाच दिली. जिथे हे शक्य नव्हते तिथे या गुंडांनी शस्त्रे उचलली. गुन्हेगारीचा सुळसुळाट झाला होता. अवैध दारूतून काळा पैसा नदीसारखा वाहत होता. कारण दारूबंदी झाली असली तरी दारूचे सेवन कमी झालेली नव्हते. लोकांच्या पार्ट्या सुरूच होत्या. वाट्टेल त्या किमतीला लोक दारू विकत घ्यायला तयार होते. त्यातच अमेरिका भयंकर आर्थिक मंदीतून जात होता. ज्याला जसे जमेल तसे पैसे कमवत होता. यातूनच गरीब तरुण, तरुणी अवैध दारूच्या तस्करीत सामील होऊ लागले. Rumrunner होऊ लागले. Rumrunner म्हणजे रम (दारूचा एक प्रकार), अवैध मार्गांनी हटकून तिकडे पोहोचवण्याची अगदी जमिनीशी जोडलेला उद्योग.
त्याकाळात रम, कॅरेबियन मधून आणि व्हिस्की कॅनडा मधून अवैधरित्या आयात केली जायची. एक भयंकर मोठा अवैध व्यवसाय निर्माण झाला. (असेच काही मुंबईत ९० च्या दशकात घडलेले तुम्हाला माहित असेल). अमेरिकेतील शहरे, उपनगरे, गरीब वस्त्या गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या गर्तेत जाऊ लागले. इतके की प्रचंड प्रमाणात शस्त्रांची देखील तस्करी सुरु झाली. यातून हिंसा सुरु झाली. ठिकठिकाणी गटांमध्ये, टोळ्यांमध्ये हिंसा होऊ लागली. दारूसारखे रक्त रस्त्यांवर सांडत होते. सामान्य माणसाला जगणे अवघड होऊन बसले होते. या सगळ्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सगळ्यात कुख्यात होती शिकागो मधील, Al Capone या दारूच्या तस्कराची टोळी! Al Capone एका अर्थी अमेरिकेतील अंडरवर्ल्ड चा बादशाह बनला. इतरही टोळ्या होत्या, पण Al Capone सगळ्यात निडर, हिंसक आणि क्रूर होता. त्याचा सर्वोच्च हिंसक बिंदू होता सेंट व्हॅलेंटाईन डे चा नरसंहार (Saint Valentine’s Day Massacre).या घटनेने समाजाला हादरवून सोडलं. लोक, पत्रकार आणि माध्यमे या टोळीयुद्धाच्या विरोधात आवाज उठवू लागली.
त्याकाळात रम, कॅरेबियन मधून आणि व्हिस्की कॅनडा मधून अवैधरित्या आयात केली जायची. एक भयंकर मोठा अवैध व्यवसाय निर्माण झाला. (असेच काही मुंबईत ९० च्या दशकात घडलेले तुम्हाला माहित असेल). अमेरिकेतील शहरे, उपनगरे, गरीब वस्त्या गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या गर्तेत जाऊ लागले. इतके की प्रचंड प्रमाणात शस्त्रांची देखील तस्करी सुरु झाली. यातून हिंसा सुरु झाली. ठिकठिकाणी गटांमध्ये, टोळ्यांमध्ये हिंसा होऊ लागली. दारूसारखे रक्त रस्त्यांवर सांडत होते. सामान्य माणसाला जगणे अवघड होऊन बसले होते. या सगळ्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सगळ्यात कुख्यात होती शिकागो मधील, Al Capone या दारूच्या तस्कराची टोळी! Al Capone एका अर्थी अमेरिकेतील अंडरवर्ल्ड चा बादशाह बनला. इतरही टोळ्या होत्या, पण Al Capone सगळ्यात निडर, हिंसक आणि क्रूर होता. त्याचा सर्वोच्च हिंसक बिंदू होता सेंट व्हॅलेंटाईन डे चा नरसंहार (Saint Valentine’s Day Massacre).या घटनेने समाजाला हादरवून सोडलं. लोक, पत्रकार आणि माध्यमे या टोळीयुद्धाच्या विरोधात आवाज उठवू लागली.
दारूबंदीच्या बंदीची सुरुवात
एका बाजूने गुन्हेगारी, लूटमार, अवैध देहविक्रय वाढत होती आणि दुसऱ्या बाजूने अमेरिका आर्थिक मंदीच्या गर्तेत आणखीनच खोल बुडत चालला होता. निवडून येणाऱ्या प्रत्येक राष्ट्रपतीला याबद्दल प्रश्नांना तोंड द्यावे लागत होते. आर्थिक मंदीला भ्रष्टाचाराची पुरवणी होतीच! आर्थिक अव्यवस्था आणि भ्रष्टाचार या सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या महत्वाच्या समस्या आ-वासून उभ्या होत्या. या दारूबंदी चा विरोध करणाऱ्यांनी तर मांडला की, समाजात वाढलेल्या गुन्हेगारीला आणि आर्थिक समस्येला दारूबंदी एक मोठे कारण आहे. दारूबंदी केली नसती तर तस्करी झालीच नसती, गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण झाल्या नसत्या. तसेच ही दारूबंदी झाली नसती तर सरकारला महसूल देखील मिळाला असता.
या सगळ्यांचा प्रचंड दबाव अमेरिकन सरकारवर आला. १९२९ साली अमेरिकेतील स्टॉक मार्केट कोसळला आणि शेवटी १९३३ साली प्रचंड दबावाखाली ही दारूबंदी शून्य करण्यासाठी, हटवण्यासाठी २१ वी घटना दुरुस्ती केली गेली. आणि शेवटी ही दारूबंदी संपुष्टात आली! १७ मे १९२९ ला Al Capone याला अटक झाली आणि त्याला कॅलिफोर्निया मधील Alcatraz येथे त्याला कारावासात ठेवण्यात आले. त्याचा १९४५ साली मृत्यू झाला. अशाच अनेक कुख्यात गुंडांचे परिमार्जन करण्यात आले.
एकुणातच हा १३ वर्षांचा दारूबंदीचा काळ अमेरिकेसाठी मोठी उलथा पालथ घेऊन आला आणि अमेरिकेचा इतिहास चेहरा कायमसाठी बदलून गेला.
आता…
दारूबंदी चांगली की वाईट? भारतात दारूबंदी असावी की नसावी? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा ब्लॉग लिहिलेला नाही. त्यामुळे त्याचा शोध या ब्लॉगमध्ये घेऊ नका!
इतिहासातील असे इतर किस्से वाचण्यासाठी इथे क्लिक करा