गोब्राह्मण प्रतिपालक
सध्याच्या राजकारणाने प्रेरित समाजात कुठली गोष्ट सनसनाटी होईल, कुठली वादग्रस्त होईल आणि कुठली गोष्ट भावना दुखावणारी होईल हे सांगता येणं कठीण आहे. त्यातून जेव्हा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा येतो तेव्हा तर विचारायलाच नको. यातलाच एक वितंड म्हणजे शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक होते की नव्हते? खरं सांगायचं तर काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी २०-२५ वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांना कोणी गोब्राह्मण प्रतिपालक म्हणणे कुणालाही आक्षेपार्ह वाटत नव्हतं. हा वितंड गेल्या काही वर्षांतलाच प्रकार आहे. त्याच्या सामाजिक-राजकारणी (socio-political) मीमांसेसाठी हा ब्लॉग नाही. किंबहुना हा ब्लॉग कुणालाच काही सिद्ध करण्यासाठी नाही, फक्त काही गोष्टींची मनात जाणीव राहावी यासाठी लिहीत आहे.
मग तुम्हाला प्रश्न पडेल की या ब्लॉगचे उद्दिष्ट आणि शीर्षकात “गोब्राह्मण” लिहिण्याचे प्रयोजन काय?
सनद आणि मीमांसा
याचे उत्तर आहे एक सनद. इतिहासाची पाने डोळ्यांखालून जात असताना चाकण येथील “वेदमूर्ती राजश्री सिद्धेश्वरभट बिन मेघनादभट ब्रह्मे उपाध्ये” यांना शिवाजी महाराजांनी दिलेली सनद. परसनिसांच्या “सनदापत्रांतील माहिती” या ग्रंथात या सनदेचा उल्लेख आहे. ही सनद स्वतः महाराजांनी दिलेली आहे. आणि या सनदेत शिवाजी महाराजांनी कुलस्वामिनी, पूर्वज यांच्याबरोबर “गोब्राह्मण” यांच्या नावे देखील आण म्हणजेच शपथ घेतल्याचा उल्लेख आहे.
सनद खालील प्रमाणे,
निष्कर्ष
चारित्र्यवान माणसांनी आणि विशेषेकरून ज्यांना आपण प्रत्यक्ष “अवतारी पुरुष” मानतो अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शपथ म्हणजे ब्रह्मवाक्य असते. महाराजांनी ज्यांच्या नावे शपथ घेतलेली आहे त्यांच्याविषयी त्यांच्या मनात आदर आणि निस्सीम भक्ती असली पाहिजे हे कुणालाही पटण्यासारखे आहे. सनद वाचल्यानंतर एक गोष्ट वाचकांच्या नक्की लक्षात येईल की शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक होते अथवा नव्हते या प्रश्नापेक्षाही पुढे जाऊन आपल्याला ते गोब्राह्मण म्हणजेच गोमाता आणि विप्र (मुद्दाम विप्र हा शब्द वापरला) यांचा शपथ घेण्याइतपत आदर करत होते, सम्मान करत होते हे लक्षात घेतले पाहिजे.
आशा करतो की यापुढे जेव्हा कधी शिवाजी महाराज आणि गोब्राह्मण यांच्याविषयी मनात शंका उत्पन्न होईल तेव्हा ही सनद तुम्हाला आठवेल.
आणखीन ऐतिहासिक ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा!