सुहास शिरवळकर म्हणजेच “सुशि“, ऍज ही इज नोन टु हिज फॅन्स! खरं तर देवनागरीत इंग्रजी लिहिण्याचे प्रसंग आमच्या आयुष्यात फार येत नाहीत. खरं तर आमची नजर अशा लिखाणाला सरावलेली नाही. वपुंच्या लिखाणात अधून मधून हे जादूचे प्रयोग पाहिले होते. पण, अशा अविष्काराचा सर्रास आणि परिणामकारक व्यवहार बघायला मिळाला तो सुशिंच्या कादंबरीत आणि कथा संग्रहात! मर्डर हाऊस सुहास शिरवाळकरांच्या दोन मर्डर मिस्ट्रीज चा संग्रह आहे. (आम्हीही आता असंच लिहिणार बहुदा सबंध ब्लॉगभर). या कथांचा नायक, निळ्या डोळ्यांचा आणि हॉलिवूड सिनेमात शोभेल अशा टेम्परामेंटचा, बॅरिस्टर अमर विश्वास! कोणत्याही हॉलिवूड चित्रपटात शोभेल असा हा हिरो! आता भाषाशैली आणि कथेचा घाट थेट मुंबईचा आहे हे वेगळं सांगायला नको.
पहिल्या वाक्यापासून वाचकांना “पुढे काय होणार?” ची आशा लावणारी ओघवती भाषाशैली आणि शब्दांची वेधक मांडणी ही एका कसलेल्या कथालेखकाची वैशिष्ट्ये आहेत. अर्थातच सुशि या दुनियेतले “मंझे हुवे खिलाडी” आहेत हे मी सांगायची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला मर्डर हाऊस वाचावे लागेल.
मर्डर हाऊस चे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ठळक आणि लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा. मग आपल्या दिसण्या – बोलण्याने कोणालाही मोहात पाडेल अशी तारा असो, नाहीतर डोक्यावर खारका मारत अशोक विश्वास वर खार खाणारे दिक्षीत वकील असोत, साळसूदपणाचा आव आणणारी विमी असो नाहीतर गूढ बनून राहिलेला सलढाणा उर्फ गरुडाचार्य असो. त्याचप्रमाणे हायवे मर्डर मधील माधुरी असो नाहीतर इन्स्पेक्टर खत्री. सगळ्यांना आपले ठळक रोल आहेत आणि विशिष्ट शैली आहे. या पत्रांमुळेच कथा लक्षात राहतात.
कथा एखाद्या सिनेमासारख्या एकेक सीन ची स्टेशन घेत घेत आपल्या समोरून भरधाव निघून जाते आणि आपण तिच्याकडे बघण्यात एवढे गुंग होऊन जातो की कथा कधी संपणार? हा विचार मनातही येत नाही. खरं तर कथा आणि त्यातील गूढ आपल्या समोर उलगडताना दिसत असते. मर्डर हाऊस ही कथा कोर्टरूम ड्रामा असली तरीही वाचक एके ठिकाणी बसून राहत नाही. नवनवीन क्लुप्त्या आणि साक्षीदार शोधून आणणारा अमर विश्वास आणि हायवे मर्डर केसमध्ये केवळ योगायोगाने गुंतून देखील सत्य शोधण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवणारा अमर विश्वास! माणूस किंवा व्यक्तिरेखा तीच असली तरीही सेटअप वेगळे आहेत, मोटिव्ह वेगळे आहेत, अमर विश्वास चा अप्रोच वेगळा आहे! एक मुंबईची कथा आहे तर एक लोणावळा-खंडाळा ची. सुहास शिरवाळकरांचे एकंदरीतच आत्तापर्यंत वाचलेले लेखन मुंबईकर लेखकाला साजेसे आहे.
एक मात्र खरं की कथेच्या अंती लक्षात राहतो तो बॅरिस्टर अमर विश्वास! ज्या काळात या कथा लिहिल्या आहेत त्या काळाशी साजेसा हिरो. प्रचंड आत्मविश्वास आणि सत्य शोधण्याची ओढ. नुसते फोटो पाहून तर्क लावण्याची खुबी. कारण, कार्य, कार्यकारणभाव आणि परिणाम यांचा अचूक वेध घेणारी तीक्ष्ण नजर. अशी डिटेक्टिव्ह माईंडेड पात्रे बहुदा पाश्चात्त्य कथांमधूनच वाचायला मिळतात. कारण काही कारणांमुळे फ्लॅमबॉयन्ट असणे आपल्याकडे लोकांना फारसं रुचत नाही. त्यातून निळ्या डोळ्यांचा हिरो, व्हिस्की घेत खुनाचे फोटो बघत असेल तर प्रश्नच मिटला!
अर्थातच अशी व्यक्ती खरोखर समोर आली तर स्त्रिया नक्कीच भाळतील आणि पुरुष कॉपी करण्याचा प्रयत्न करतील. असो, वाचकांना इतकंच सांगू शकतो की मर्डर हाऊस म्हणजे वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा ज्यांच्यातील गुंतागुंत अत्यंत क्लिष्ट असली तरीही तिला सुतासारखं करणारा बॅरिस्टर अमर विश्वास त्यात आहे! न्याय मिळणार आणि गुन्हेगाराला शिक्षा देखील होणार.. विश्वास ठेवा!
वा, आठवणी ताज्या झाल्या ! आता पुस्तक वाचायलाच हव!
नक्की!! धन्यवाद 🙏