वृत्ताचे नाव – शिखरिणी
वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त)
वृत्त मात्रा संख्या – २५
वृत्त अक्षर संख्या – १७
गणांची विभागणी – य, म, न, स, भ, ल, ग
यति – ६ व्या आणि ११ व्या अक्षरावर
नियम –
शिखरिणी वृत्तात य, म, न, स, भ, ल, ग गण U – – | – – – | U U U | U U – | – U U | U – आणि मात्रा १२२ । २२२ । १११ । ११२ । २११ । १ २
शिखरिणी बद्दल माहिती
शिखरिणी म्हणजे संस्कृतमध्ये उत्तम स्त्री! या शब्दार्थाचा आणि वृत्ताचा अथवा छंदाचा किती संबंध आहे हे सांगता येणं कठीण आहे. पण अनेक संस्कृत कवींनी या वृत्ताला सुंदर म्हटले आहे. निसर्ग, व्यक्ती यांचे वर्णन करताना या वृत्ताचा विशेष उपयोग केलेला आढळतो.
क्षेमेंद्र म्हणतात की शिखरिणी वृत्त ओजोगुण दर्शवण्यासाठी किंवा कथनाच्या शरणागतीच्या प्रसंगात उत्तम वाटते. ओजोगुण म्हणजे ओज युक्त भाव. सामाजिक मानसाला प्रभावित करण्याचे सामर्थ्य, मनात एक स्वयंप्रकाश प्रज्वलित करण्याचे सामर्थ्य.
शिखरिण्या: समारोहात्सहजैवौजसः स्थिति:
सैव लुप्तविसर्गांतै: प्रयात्यत्यन्तमुन्नतिम्
उपपन्नपरिच्छेदकाले शिखरिणी मता।
कवी राजशेखर, भवभूती यांनी शिखरिणी वृत्तात रचलेल्या काव्याचें वर्णन एखाद्या स्वच्छंद नदीसारखे करतात. ज्याप्रमाणे मोर घनांना पाहून नाचू लागतो त्याचप्रमाणे शिखरिणी वृत्त संदर्भांच्या मेघांमध्ये शब्द, अर्थ घेऊन समोर येते.
भवभूतेः शिखरिणी निरर्गलतरड़िगणी
श्री शंकराचार्यांनी, संपूर्ण “जगन्नाथ अष्टकं” शिखरिणी वृत्तात बांधलेले आहे.
आयुर्वेदात श्रीखंडला “रसाला” किंवा “शिखरिणी” म्हणतात!
वृत्ताचे लक्षणसूत्र
१.
तया वृत्ता देती विबुध जन संज्ञा शिखरिणी ॥
जयामध्यें येती य म न स भ ला गा गण गणीं ॥
दहा आणी सात प्रतिचरणिं ही अक्षरमिती ॥
विसांवा तो घ्यावा गुरुचरणिं सांगूं तुज किती ॥
– (“वृत्तदर्पण”, परशुराम बल्लाळ गोडबोले)
२.
रसै रुद्रैश्छिन्ना यमनसभला ग: शिखरिणी
– (“रत्नाकर”, केदारभट्ट)
शिखरिणी वृत्ताची उदाहरणे
विसावा हे काही उडुनि लवलाही परतला । (१२२ २ २२ १११ ११२२ १११२)
नृपाळाचे स्कंधी बसुनि मणिबंधी उतरला ॥ (१२२२ २२ १११ ११२२ १११२)
म्हणे हंस क्षोणीपतिस “तुज कोण्ही सम नसे । (१२ २२ २२१११ ११ २२ ११ १२)
दयेचाही केवा तुजजवळि देवा बहु वसे ॥ (१२२२ २२ १११११ २२ ११ १२)
– (“दमयंती स्वयंवर”, वामन पंडित)
शिखरिणी वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!
असे ते बोलोनी, त्वरित मग दोघे उसळले;
वनीं वाय्वग्नीसे भरतकटकांतीं मिसळले;
महाकांडव्रातेंकरुनि सुटले मर्दित रणीं,
बुडे अब्धीमध्यें तदिषुशिखिसंतप्त तरणी
– (“कुशलवोपाख्यान”, महाकवी मोरोपंत)
नळाते पाचारी सुरपति विचारी कुशल तो ।
म्हणे ‘आम्हांपासी तव गुरु विलासी निवसतो ॥
खूणा ज्याज्या त्याच्या तुजजवळि राजा निरखितो ।
हिरा तू तद्वंशी म्हणउनि तदंशी समजतो ॥
– (“दमयंती स्वयंवर”, वामन पंडित)
उदावाई बोळे सातिप्रति तदा वाक्य सरते |
तुम्हां दाणा-गोटा भरडुन भरावे उदरं तं ॥
तशी आह्मां भिक्षा मिळवुनच लागेल भरणे |
असा आला वाटे समयच उपायास करणे ॥
– (“श्रीमती अहिल्याबाईसाहेब होळकर यांचे पद्यात्मक चरित्र”, गोविंद एकनाथ गोसावी – संदर्भ)
महानामोदोऽयं मम मनसि लीलां वितनुते
यतीन्दोरास्येन्दोः अमृतमिव भूयो विगलितम् ।
पिबाम्येवं नित्यं वचनमतिरम्यं भगवतः
मनःकान्तं मान्यं मधुरमधुरं साम्यविधुरम् ॥
– (“यतिपतिषण्णवतिः”)
उभा राहे एके चरणिं धरणीतें धरुनियां
तपश्चर्या वाटे करित जणुं डोळे मिटुनियां,
बका ऐशा ढोंगे तव अमति मासेच ठकती,
परि ज्ञाते तूझें कपट लवलाहीं उमजती.
– (“बगळ्याची अन्योक्ती”, कृष्णशास्त्री चिपळूणकर)
तुझी वाणी कोणी म्हणत गुण हा अद्भुत असे ।
मला वाटे मोठा तुजजवळ हा दोषच वसे ॥
शुका तीच्या योगे सतत पिंजर्यामाजि पडशी ।
गड्या स्वातंत्र्याच्या अनुपम सुखा सर्व मुकशी ॥
– (“शुकान्योक्ति”, कृष्णशास्त्री चिपळूणकर)
कदाचित् कालिन्दीतटविपिनसङ्गीतकरवो
मुदाभीरीनारी_वदनकमलास्वादमधुपः ।
रमाशम्भुब्रह्मा मरपतिगणेशार्चितपदो
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥
– (“जगन्नाथ अष्टकं”, शंकराचार्य)
प्रिये, माझ्या उच्छृंखल करुनियां वृत्ति सगळया,
तुझ्या गे भासानें कवनरचनेला वळविल्या ;
अशी जी तूं देशी प्रबलकवनस्फुर्ति मजशी,
न होशी ती माझें अपरकविता-दैवत कशी ?
– (“अपरकविता दैवत”, केशवसुत)
शिखरिणी वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!