January 12, 2025
भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा (संपूर्ण कविता) – वसंत बापट

भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा (संपूर्ण कविता) – वसंत बापट

Spread the love

कविवर्य वसंत बापट यांचा जन्म २५ जुलै १९२२ साली कराड येथे झाला. सामाजिक आणि भावनिक अशा दोन्ही रुळांवर बापटांची कविता अगदी मनस्वीपणे धावली. कधी “येशील येशील राणी” असे प्रेयसीला पहाटे चोरून यायला बोलावत तर कधी “केवळ माझा सह्यकडा” असा महाराष्ट्राभिमान गर्जत, कधी “गगन सदन तेजोमय” भक्ती गीत गात तर कधी, “आई आपल्या घराला किती मोठं कुंपण” असा भाबडा पण काळजाला छेद देणारा प्रश्न करत बापटांची कविता रसिकाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.

Vasant Bapat Poet कवी वसंत बापट
कवी वसंत बापट

त्याचपैकी त्यांची एक अत्यंत प्रसिद्ध आणि कोणत्याही मराठी व महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्याला मुखोद्गत असणारी कविता म्हणजे “भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा”. ही संपूर्ण कविता या ब्लॉगमध्ये देत आहोत.

भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा 
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा 
तुमच्या अमुच्या गंगा यमुना केवळ माझी भिवरथडी 
प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी 
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला 
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला 
धिक तुमचे स्वर्गही साती 
इथली चुंबिन मी माती 
या मातीचे कण लोहाचे ,तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातून अजुनी वाहतसे लाव्हा सगळा


कबीर माझा, तुळसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच 
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनीं जनार्दन बघणारा तो “एका” हृदयी एकवटे
जनाबाइच्या ओवी मध्ये माझी मजला खूण पटे 
इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली 
ती माझी मी तिचाच ऐशी, जवळीक कायमची झाली 
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे 
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले 
माझ्यासाठी भीमाकांठी भावभक्तीची पेठ खुले


रामायण तर तुमचें माझें भारत भारतवर्षाचें
छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचें 
रजपुतांची विक्रमगाथा तुमच्यापरि मजला रुचते 
हृदयाच्या हृदयांत; परंतु बाजी बाजीची सुचते 
अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी 
दत्ताजीचा शेवटचा तो शब्द अजुनि हृदयामाजीं 
बच जाये तो और लढे 
पाउल राहील सदा पुढे 
तुम्हास तुमचें रुसवेफुगवे घ्या सगळा नाजुक नखरा 
माझ्यासाठी राहिल गांठी मरहट्याचा हट्ट खरा 


तुमचें माझें ख्याल तराणे दोघेही ऐकू गझला 
होनाजीची सोनलावणी वेड लावते; परि मजला 
मृदुंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अन् मुरली 
थाप डफावर कडकडतां परि बाही माझी फुरफुरली 
कडाडणारा बोल खडा जो दरी दरीमधुनी घुमला 
उघडुनि माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला 
तटातटा तुटती बंद 
भिंवईवर चढते धुंद 
औट हात देहांत अचानक वादळ घुसमटुनी जातें
उचंबळे हृदयात पुन्हा तें इतिहासशी धृढ नातें 


कळे मला काळाचे पाउल द्रुतवेगानें पुढति पडे 
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणी अधिकचि उघडे 
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी 
मीही माझें बाहू पसरून अवघ्या विश्वातें कवळी 
विशाल दारे माझ्या घरची, खुशाल हीं राहोत खुली 
मज गरीबाची कांबळवाकळ सकळासाठी आंथरली
मात्र भाबडया हृदयांत
तेवत आहे जी ज्योत 
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करूनि झंझावात 
कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारू निमिषांत 


इतकी वर्षे होऊन गेली ही कविता रचून पण अजूनही या शब्दांची मोहिनी मराठी मनावर कायम आहे! कवी वसंत बापट यांना शब्दयात्री कडून शतशः नमन 🙏🏻

Click to rate this post!
[Total: 2 Average: 3]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *