December 2, 2024
जे कां रंजले गांजले – संपूर्ण अभंग आणि भावार्थ

जे कां रंजले गांजले – संपूर्ण अभंग आणि भावार्थ

Spread the love

“जे कां रंजले गांजले!” संत तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की या अभंगाचा उल्लेख होणार नाही असं होणं अशक्य आहे. काही काही अभंग, कविता, पदे इतकी प्रसिद्ध आणि लोकप्रिय होतात की त्यातील पंक्ती वाक्प्रचार बनून भाषेचा एक अविभाज्य घटक बनतात. उदाहरणार्थ प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, ठेविले अनंते, बोलाचा भात बोलाची कढी, आलिया भोगासी. याच यादीत आणखीन एक वाक्य जे कुठल्याही मराठी माणसाला अगदी लहानपणापासून कानावर पडते ते म्हणजे “जे कां रंजले गांजले”. शाळेत असल्यापासून “जे कां रंजले गांजले, त्यासि म्हणजे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा” ही वाक्ये सगळ्यांना तोंडपाठ असतात. पण अशा पंक्तींबरोबर असे होण्याचे देखील एक महत्त्वाचे कारण आहे ज्याची मीमांसा फार केली जात नाही. हे शब्द, ही वाक्ये कुठे ना कुठे मानवी मनाचे आणि विशुद्ध भावनांचे आरसे बनतात. त्यामुळे ती स्थापित सत्ये वाटू लागतात.

पण या सगळ्या उहापोहामुळे एक नुकसान देखील होते. ते असे की अनेकदा ही वाक्ये संदर्भरहित किंवा योग्य परामर्श जाणून न घेता वापरली जातात. आता हेच उदाहरण पाहू. “जे कां रंजले गांजले” हे वाक्य जवळजवळ सगळ्यांना माहित आहे. पण, हे वाक्य नक्की कुठून आले? कुठल्या अभंगातून आले? त्याची पार्श्वभूमी काय आहे? संदर्भ काय आहेत? आणि मतितार्थ काय आहेत? याबद्दल फारसे कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही. प्रत्येक जण ढोबळ संज्ञांना धरून राहातो. त्यामुळे या ब्लॉगमध्ये आम्ही संपूर्ण अभंग आणि त्यातील काही सूक्ष्म अर्थ-भावार्थ देखील सांगणार आहोत, जे अन्यत्र सापडणं विरळाच. तुकारामबुवांनी या अभंगात साधू – सज्जनांची लक्षणे स्पष्टपणे सांगितलेली आहेत.

जे कां रंजले गांजले । त्यासि ह्मणे जो आपुले ॥१॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥२॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ॥३॥
ज्यासी आपंगिता नाहीं । त्यासी धरी जो हृदयीं ॥४॥
दया करणें जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।।५॥
तुका म्हणे सांगू किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥६॥

इथे रंजले गांजले या शब्दांबद्दल बोलणं फार गरजेचं आहे. कारण केवळ एकाच दृष्टीने बघण्याची आणि विचार करण्याची सवय लागल्यामुळे, कुणालाही रंजले गांजले हे शब्द ऐकवले की त्यांच्यासमोर गरीब, भुकेले, समाजाने पिडलेले आणि अनाथ इत्यादी लोकच दिसतात. पण आमच्या मते ही फार संकुचित व्याख्या आहे. भारतीय तत्वज्ञान केवळ ऐहिक आणि भौतिक संपत्तीच्या आधारावर सुख – दुःख ठरवत नाही. कारण तसं असतं तर साधू संत कधीच सुखी होऊ शकले नसते! त्यामुळे इथे रंजले गांजले या शब्दांची व्याप्ती वाढवणं गरजेचं आहे. जे मनुष्य तो त्रासलेले आहेत, चिंतांनी ग्रासलेले आहेत, कष्टी आहेत, कुठल्या ना कुठल्या विकाराने – आजाराने पीडित आहेत इत्यादी सगळ्यांना रंजले गांजले म्हटलं पाहिजे. कारण साधू पुरुषांना राव – रंक, मोठा – छोटा सगळे सारखेच! अशा रंजल्या गांजल्यांना जे आपलेसे करतात, त्यांच्या दुःखी मानेवरून मायेचा हात फिरवतात, आधार देतात, योग्य सल्ला देतात, अगदी “आपल्या” माणसांसारखे वागवतात तेच खरे साधू आणि अशाच माणसांच्या ठायी भगवंत असतो.

आजकालच्या जगात जिथे माणूस माणसाशी धड बोलत नाही तिथे अशा सज्जनांची गरज जरा अधिकच आहे. ज्या लोकांनी कुठल्या ना त्रासाला किंवा वेदनेला किंवा लज्जेला कंटाळून आत्महत्या केली, त्यांना जर कोणी समजून घेणारा, त्यांचे ऐकून घेणारा मिळाला असता तर? परिस्थितीपुढे हतबल होऊन निर्वाणीचे पाऊल उचलणारे देखील एका अर्थी रंजले गांजले नाहीत का? आपल्याला अशा लोकांना भ्याड म्हणणं खूप सोपं आहे पण त्यांना मदतीचा हात किती जण पुढे करतात? अशांना देखील जे आधार देतात ते साधू आणि खरोखर ते देव बनूनच आलेले असतात!

सज्जन मनुष्याचे चित्त म्हणजेच बुद्धी, विचार आणि मन सदा मृदु असते. त्यात कुठलेही कपट, कटुता, अहंभाव, क्रोध, मत्सर आणि क्रूरता नसते. सगळ्यांच्या प्रति मनात सात्विक भाव असतो. बोलण्यात आणि वागण्यात देखील एक प्रकारची शीतलता असते. ज्ञानेश्वर माऊली पसायदानात म्हणतात तसे “मार्तंड जे तापहीन”. त्याचप्रमाणे त्यांचे चित्त सबाह्य नवनीत म्हणजे लोण्यासारखे असते. लोणी मऊ व मृदु असतेच. त्याचबरोबर लोणी हा दुधातील स्निग्धतेचा अर्क देखील असतो. स्निग्धता म्हणजे प्रेमभाव, परोपकार. ज्याच्या मनात, विचारात आणि आचारात स्निग्धता असते तो सज्जन. सबाह्य म्हणजे अंतर्बाह्य. त्यामुळे केवळ विचारात प्रेमभाव असणे उपयुक्त नाही आचरणात देखील जो आणेल तो सज्जन!

सज्जनांचे आणखीन एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे, जगात ज्यांचा कोणी नाही त्यांच्यासाठी हे सज्जन धावून जातात. हिंदीमध्ये “जिसका कोई नाही होता उसका भगवान होता है” हे आपण ऐकतो पण पृथ्वीवर ज्यांना देवतुल्य म्हणू शकतो ते सज्जनच असतात! ज्यासी आपंगिता नाहीं म्हणजे ज्याला कोणी वाली नाही, कोणी त्राता नाही, अशा मनुष्याला जो आपल्या हृदयी धरतो, त्याच्यावर माया करतो तो सज्जन! लाचारी सगळ्यात वाईट. अशा लाचारीच्या जो कोणत्याही अपेक्षेविना, कुटील स्वार्थाविना आधार देतो, हात देतो तो खरा सज्जन.

सज्जनांचे आणखीन एक उत्तम लक्षण म्हणजे दयाळूपणा. आपल्या मुलावर ज्या तऱ्हेची दया मनुष्य दाखवतो तशीच दया जो आपल्या दास दासी म्हणजे नोकरा चाकरांवर, हाताखाली काम करणाऱ्यांवर दाखवतो तो देखील सज्जनच. एकाला एक नियम आणि दुसऱ्याला वेगळा असा भेद त्यांच्या मनात नसतो. किंबहुना आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांवर जो पुत्रवत प्रेम आणि दया दाखवतो तो सज्जन!

शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की सज्जनांची अशी कित्येक लक्षणे सांगता येतील. सज्जन हा साक्षात भगवंताची मूर्ती असतो. खरं सांगायचं तर प्रत्येकाकडे मनःश्चक्षु असतात. त्या दृष्टीने बघितल्यास ज्याच्याकडे बघून जाणवेल की हा मनुष्य नव्हे साक्षात भगवंतांची मूर्ती आहे.. तोच सज्जन!

टीप:

ज्यांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग वाचलेले आहेत. त्यांचे उपदेश वाचलेले आहेत त्यांना हे निश्चित समजेल की तुकाराम महाराजांनी कोणालाही डोळे झाकून दया करण्याचा सल्ला दिलेला नाही. कारण तेच म्हणतात नाठाळाचे काठी देऊ माथा. त्यामुळे दुर्जनांबरोबर केला जाणारा व्यवहार आणि सामान्य लोकांबरोबर करायचा व्यवहार यात वाचकांनी गल्लत करता काम नये!

Click to rate this post!
[Total: 6 Average: 2.7]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *