एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता । हाणोनिया लाता पळाले ते ।।१।।
गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले । तोंड काळे झाले जगामाजी ।।२।।
हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले । तुका म्हणे गेले वायाचि ते ।।३।।
गाढव आणि ब्रह्मचर्य
संत तुकाराम महाराज माझे फार लाडके संत कवी. कवी मनाचे संत कायमच आपल्या लेखणीद्वारे समाजाच्या दोषांवर आघात करत आलेले आहेत. संत तुकाराम महाराजांइतके स्पष्ट आणि कठोर शब्दांत समाजाची कानउघडणी करणारे फारच थोडे. “गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले” या अभंगात संत तुकाराम महाराजांनी मानवी स्वभावातील दांभिकतेवर आघात केलेला आहे.
तुकाराम महाराजांची गाथा वाचली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे धर्माचरण आणि सत्य यांवर दिलेला भर. प्रत्येकाने स्वधर्म जपला आणि पाळला पाहिजे ही त्यांची शिकवण आहे. ब्रह्मचारी आहात तर पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करा आणि गृहस्थ असाल तर गृहस्थाचा धर्म पाळा. तुकाराम महाराज या अभंगात देखील हेच सांगतात.
कोण्या ब्रह्मचाऱ्याला जर वासनेने व्यापले तर काय होते? लोकांमध्ये ब्रह्मचारी असण्याचे दाखवणे गरजेचे होते आणि त्यातूनच अनैसर्गिक आणि अप्राकृतिक आचरणाकडे पाऊल वळते. जसे या अभंगात एक ब्रह्मचारी गाढवाशी समागम करायला जातो एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता व ते गाढव ब्रह्मचारीला लाथ मारून पळून जाते. तसे पाहायला गेले तर गाढव आपल्या धर्माचे पालन करतो. पण ब्रह्मचारी आपला धर्म विसरतो! परिणाम असा की गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले ब्रह्मचारी ला ना दैहिक सुख मिळते ना परमार्थ साध्य होतो हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले. होते ती फक्त फजिती! समाजात तोंड काळे होते. तोंड काळे झाले जगामाजी.
मला जो अर्थ समजला तो असा की माणसाने आपल्या वासनेवर ताबा मिळवून ब्रह्मचर्य साध्य केले पाहिजे. नाहीतर माणूस स्वतःला ब्रह्मचारी म्हणत फक्त ब्रह्मचर्याचे नाटक सुरु करतो आणि मनातून वासना जात नाही. हीच वासना एक दिवस त्याचा घात करते. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला गृहस्थ व्हायचे असेल तर गृहस्थ व्हा. जगाचे भोग आणि उपभोग घ्या. आणि जर ब्रह्मचारी व्हायचं असेल तर खोटेपणा आणि आव न आणता स्वतःच्या वासनेवर नियंत्रण मिळवा. अर्धवट काहीतरी कराल तर जगात तोंड काळे होईल!
आजचा काळ
मला हा अभंग वाचल्यानंतर एक विचार मनात आल्यावाचून राहत नाही. तो म्हणजे भारतीय समाजाची वैचारिक आणि अध्यात्मिक अवस्था. हजारो वर्षांच्या गुलामगिरीनंतर, भारतीयांना एका गोष्टीचे फार आकर्षण आहे ते म्हणजे बहिस्थ आणि विशेष करून पाश्चात्य विचारसरणीचे आणि धर्माचे. विशेषतः ब्रिटिश राज्य आल्यानंतर त्यांनी तथाकथित समाजसुधारकांना हाताशी धरून भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माची निंदा सुरु केली. परिणामी भारतीयांमध्ये स्वधर्म, स्वभाषा आणि संस्कृती यांच्याबद्दल अनास्थाच नव्हे तर द्वेष निर्माण झाला. इतका की आजकाल कोणी स्वतःला पटकन सनातन धर्मपालक म्हणताना कचरतो, कमीपण वाटून घेतो. पण हे करत असताना आपण हे विसरलो की आपली अवस्था त्या ब्रह्मचर्य पाळण्याचे ढोंग करणाऱ्या सारखी झालेली आहे. भारतीय समाज पाश्चात्य झाला नाही (होणारच नव्हता) आणि भारतीय सुद्धा राहिला नाही! झाली ती फक्त फजिती.. विचार करा!
आणखीन अभंगांचे भावार्थ ऐकण्यासाठी इथे पाहा.