आमच्या सिनेमाच्या साऊंड डिरेक्टरच्या साऊंड स्टुडिओ बद्दल थोडी माहिती मी आधी दिलेली आहे. पण या साऊंड स्टुडिओ मधील माझे अनुभव इथेच संपत नाहीत. आत्तापर्यंत मला या स्टुडिओ मध्ये विचित्र जाणीवा होत होत्या. दरवाज्याचा अनुभव होताच. पण त्यानंतर गूढ आणि गडद जाणीव सोडून विशेष काही घडलं नव्हतं. हळूहळू मला वाटायला लागलं की बहुतेक या जागेत इतकंच आहे. त्या स्टुडिओत मी एकूण ५-६ वेळा नक्की गेलो असेन.
त्यातील एके दिवशी स्टुडिओच्या मालकाने त्याच्या बाबतीत घडलेला किस्सा सांगितला. गप्पा मारता मारता अचानक विषय निघाला की, जर फ्लॅट इथे आहे तर कुटुंब इथे का राहात नाही?
त्यावर मालक म्हणाला की, “आधी आम्ही इथे राहात होतो. पण एकंदरीत सगळे विचित्र (भुताचे) अनुभव बघता आम्ही इथे राहणं सोडून दिलं.”
माझ्या चेहऱ्यावर अर्थातच प्रश्नचिन्ह होते. तेव्हा त्याने काही छोटे मोठे अनुभव सांगितले. पण त्यातला एक अनुभव लक्षात राहिला. कारण तो अनुभव सांगताना तो म्हणाला की, “माझ्या कडे एक फोटो होता, ज्यात एक आकृती दिसली होती. आतल्या कपाटाच्या आरशाच्या दाराच्या समोर मी आरशाकडे तोंड करून बसलो होतो. लॅपटॉप वर गेम खेळत होतो. आधीही असे अनुभव आल्यामुळे फोन किंवा कॅमेरा जवळ ठेवायचो. माझ्या मागे काहीतरी असल्यासारखं जाणवलं म्हणून पटकन आरशाकडे बघून फोटो काढला. काढलेला फोटो जेव्हा लॅपटॉपमध्ये बघितला तेव्हा, धक्का बसला, माझ्या डोक्याच्या वर एक अस्पष्ट आकृती दिसत होती. खूप वर्षे झाली त्याला. फ्लॅट शिफ्ट करताना ते फोटो गहाळ झाले.”
अर्थातच तो फोटो उपलब्ध नाही ऐकल्यावर मला वाईट वाटलं. पण माझ्या माहितीनुसार आरशांमध्ये अनेक लोकांनी अशा आकृत्या पहिल्या आहेत. फोटो आणि व्हिडीओ मध्ये टिपलेले आहेत. या आकृत्या का दिसतात? त्या खऱ्या असतात का? की कोणती तांत्रिक गोष्ट असते? देवाला माहित. पण अनुभव खरे असतात आणि प्रश्न खरे असतात.
हा संवाद लक्षात राहिला. त्यानंतर देखील दोन तीन वेळा स्टुडिओमध्ये जाण्याचा योग्य आला. पण कामाची लगबग आणि वेळेची कमतरता खूप असल्यामुळे, कधी आजूबाजूला लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. पण एकूण वेळा जेव्हा मी गेलो त्याच्या शेवटच्या खेपेच्या आधी रात्री उशिरापर्यंत काम करण्याचा योग आला. त्यावेळी स्टुडिओमध्ये साऊंड डिरेक्टर आणि मी एवढेच होतो.
वेळ साधारण ११ ची. साऊंड डिरेक्टर काही वेळासाठी बाथरूम मध्ये गेला होता. स्टुडिओ मध्ये मी एकटाच होतो. अख्या फ्लॅटमध्ये फक्त बेसिन जवळचा दिवा सुरु होता. बाकी सगळ्या घरातले दिवे बंद होते. बसून काय करायचं म्हणून मी पाय मोकळे करण्यासाठी बेसिन जवळ गेलो. तोंडावर पाणी मारलं आणि डावीकडे असलेल्या बेडरूम मधील, बेसिन जवळच्या दिव्यामुळे अंधुक झालेल्या अंधाराकडे बघत राहिलो. का ते विचारू नका! काही सेकंद त्या अंधाराकडे बघून मी पुन्हा स्टुडिओ कडे जायला वळलो आणि त्याच क्षणी त्या बेडरूम मध्ये माणूसभर उंचीवर एक पूर्ण गडद काळी आकृती किंवा सावली माझ्या डावीकडून उजवीकडे जाताना दिसली. पण त्याला पाय वगैरे काही नव्हते. हवेतल्या हवेत सावलीचा एक मोठा गोळा हलला होता! खेळ अगदी २ क्षणांचा पण, मला मी जे पाहीलं त्यावर विश्वास बसेना. लगेच मी त्या बेडरूम मध्ये गेलो. अर्थातच बेडरूममध्ये कोणी नव्हतं. पुन्हा बाहेर आलो. स्वत:ला सावरलं. आणि विचार केला की हा सावलीचा भ्रम तर नाही? कारण बेसीन जवळचा दिवा सुरु होता आणि माझ्या पाठीमागे होता. मी पुहा तिथे उभे राहून तसेच हलून बघितले पण काही केल्या तशी काळी आकृती किंवा सावली दिसत नव्हती! डोकं शांत झालं होतं एखाद्या पोकळी सारखं. माझे वैज्ञानिक डोके सुरू केले कारण कुठलाही अनुभव पडताळून बघणं हे विज्ञानाला आणि सत्य शोधनाला धरून आहे. मी विचार करत होतो की मला दिसलेली सावली कशाची होती? मी माझ्या उजवीकडून डावीकडे हललो होतो आणि सावली माझ्या डावीकडून उजवीकडे जाताना दिसली होती. खालील चित्र बघता विज्ञानाच्या दृष्टीने हे अशक्य आहे. तसेच दिवा साधारण १०-१२ फूट लांब असल्याने माझी इतकी गडद सावली पडणं अशक्य होतं. शेवटी ही शहानिशा करून झाल्यावर माझी खात्री पातळी की मी काहीतरी पाहीलं ज्याचा उलगडा मला होत नाहीये किंवा ज्याच्या मागचे तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक कारण मला देत येत नाहीये. सगळं काही काही सेकंदात घडलं. अगदी timelapse व्हिडीओ असावा असं.
हा माझा तिथला भन्नाट Paranormal Experience!

काही सेकंद स्टुडिओमधील खुर्चीत काय घडलं याचा विचार करत बसलो असेन, तोच साऊंड डिरेक्टर बाथरूम मधून बाहेर आला. आल्या आल्या त्याला हकीकत सांगितली. त्याला आश्चर्य वाटले नाही.
या घटनेला साधारण ७-८ महिने होऊन गेलेले आहेत. पण ती रात्र, तो अंधुक अंधार, त्यात हललेली ती गडद सावली अजूनही डोळ्यांसमोर स्पष्ट दिसतात!