कला म्हणजे काय? “कला” समस्त मानव प्रजातीला प्रत्येक पिढीला पडणारा एक सनातन प्रश्न. आज पुन्हा या प्रश्नाच्या मृगजळात काही काळ यथेच्छ डुंबून घेतलं. ट्विटरवर एक ट्विट पाहिला ज्यात काही चित्रांची अनेक दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे असं सांगण्यात आलं होतं. अर्थातच जेव्हा कुठल्या कलाकृतीला एवढी किंमत मिळते तेव्हा चकित व्हायला होतं. कलाकार म्हणून थोडा आनंद पण वाटतो. सहज म्हणून ट्विट वाचायला घेतलं आणि थक्क झालो. आमच्या भाषेत सांगायचं तर फ्लॅट झालो! काही क्षणांसाठी डोकं सुन्न झालं.
आधी वाटलं काहीतरी घोटाळा आहे. ही कला नव्हे. कदाचित ही थापेबाजी असू शकते. त्यामुळे हे नाव गुगल केलं. गंमत म्हणजे खरोखरंच Cy Twombly या नावाचे एक अमेरिकन चित्रकार आहेत. Cy Twombly हे Modern Art म्हणजेच आधुनिक कला या सदरात मोडणारे चित्रकार आहेत. आणि खरोखरंच ही त्यांनीच काढलेली चित्रे आहेत. मला हसावं की आणखीन काय करावं समजेना. मग मी पण विनोद म्हणून माझ्या मुलीने आमच्या घराच्या भिंतीवर ओढलेल्या रेघोट्यांचे फोटो पोस्ट केले.
तसं पाहायला गेलं तर मी या मतावर ठाम आहे की, Cy Twombly यांची चित्रकला आणि माझ्या मुलीने ओढलेल्या रेघोट्या यांच्यात फार फरक नाहीये. पण फरक असा आहे की Cy Twombly यांची चित्रे “कला” या रकान्यात बसतात आणि माझ्या मुलीच्या रेघोट्या “उपद्व्याप” किंवा “निरर्थक उद्योग” या सदरात मोडतात. मी आणि बायको दोघांनीही तिला आमच्या खोलीच्या भिंतीवर मुक्तपणे आपली कला सादर करायची मोकळीक दिलेली आहे. पण, कदाचित काही घरांमध्ये अशा कलाकारीसाठी त्या मुलाने पोटभर मार खाल्ला असता. त्याला कला समजून त्यातले छुपे आणि गर्भित अर्थ वगैरे शोधणं तर दूरच राहिलं! गेला बाजार माझीही एक दोन चित्रे दाखवतोच. म्हणजे मी देखील अगदीच काही “हा” चित्रकार नाही हे कळेल 😂
गमतीचा भाग निराळा पण…
काही कला आणि कलाकृती यांना लोक दुर्बोध म्हणतात हे मी जाणतो. माझे लाडके कवी ग्रेस, जी ए कुलकर्णी, बा सि मर्ढेकर आणि खानोलकर यांना देखील अनेकांनी दुर्बोधाच्या रांगेत उभे केले. अगदी आयुष्यभर. अजूनही! अशा वेळी मी सहज बोलून जातो की “तुम्हाला समजलं नाही म्हणजे ते दुर्बोध का?” या प्रश्नामागे माझा वैयक्तिक अनुभव देखील आहे कारण, माझ्या लिखाणावर देखील दुर्बोध असल्याचे शेरे अनेकदा मिळतात. यात वाचणाऱ्यांच्या आकलनशक्तीवर आम्ही प्रश्नचिन्ह लावत नसतो, त्यांच्या संदर्भ न शोधण्याच्या आळसाला हटकत आणि झटकत असतो. त्याला आव्हान देत असतो. असो..
सत्यघटना आहे…
मी २००५ साली एका एकांकिकेची संहिता लिहिली आणि मित्रवर्गाला वाचून दाखवली. मला वाटलं होतं ऐकल्यावर काहीतरी प्रतिक्रिया येईल. पण बघतो तर काय? सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं. कोणालाच माझी संहिता, त्यातला संदेश आणि गोष्ट समजलेली नव्हती. कोणालाही काहीही समजलेलं नव्हतं. काहींनी तू लिहू नकोस असा देखील सल्ला दिला. खजील झालो आणि ती हस्तलिखित संहिता माळ्यावर ठेवून दिली. नशीब फेकून नाही दिली! दिलीही नसती. लोकांसाठी कितीही नावडती असली तरीही ती माझी कलाकृती होती. तिचा जन्म माझ्यातून झालेला होता! कलाकार काहीसा मातृभावाने युक्त देखील असतो. असो.. पण खरी गम्मत पुढे आहे.
काही वर्षांनी काही जुनियर माझ्याकडे आले आणि म्हणाले
“रोबा आम्ही स्क्रिप्ट शोधत आहोत. भरत करंडक साठी हवी आहे.”
तोपर्यंत मी शेवटच्या वर्षाला होतो आणि या स्पर्धेत भाग घेणार नव्हतो. मी काही स्क्रिप्ट, पुस्तके आणि कथा सुचवल्या. पण त्यांना काही केल्या आवडेना. शेवटी मला माझ्या या जुन्या संहितेची आठवण झाली. पण तरीही पूर्वानुभव आठवून घाबरतच म्हणालो,
“माझ्याकडे एक संहिता आहे. पण आधी आवडत आहे का नाही ते पाहा. मी म्हणतोय म्हणून हो म्हणू नका.”
असं म्हणून ती हसलिखित संहिता झेरॉक्स काढायला जुनियर मंडळींना दिली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या सिनियरचा मला फोन
“रोबा (आणि काही लिहिता येणार नाहीत अशा शिव्या) आधी रूपा मध्ये ये”
रूपा म्हणजे आम्हा कलाकारांचा अड्डा. गेल्या गेल्या त्याने प्रश्न टाकला
“ही तुझी स्क्रिप्ट आहे?”
“हो” मी जरा दबकत म्हणालो
एक धुराचा पफ सोडत सिनियर म्हणाला “(शिव्या) आधी का नाही सांगितलंस कधी? केवढी चांगली स्क्रिप्ट आहे!”
मी म्हणालो “अरे एकदाच ऐकवली पण इतकी वाईट प्रतिक्रिया होती की सरळ माळावर टाकून दिली”
असो.. तर सांगायचा मुद्दा काय की कोणत्या गोष्टीला लोक कला समजतील आणि कोणत्या गोष्टीला नाही हे सांगणं कठीण आहे. कला म्हणजे काय? हा मूलभूत प्रश्न अनेक वेळा अनेक ठिकाणी आणि अनेक लोकांनी विचारलेला आहे. आपल्या परीने त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मी देखील स्वतःला हा प्रश्न अनेकदा विचारतो. कला म्हणजे आविष्कार.. पण केवळ आविष्कारच का? आणि प्रत्येक आविष्कार म्हणजे कला असतो का? सगळी गुंतागुंत आहे. कलेचे प्रकार आहेत. त्यांची उदाहरणे देता येतात. कधी कधी त्यांच्यातून होणाऱ्या रसनिष्पत्तीचे वर्णन करता येते. कधी कधी नाही येत. अत्यंत किचकट असा हा प्रश्न आहे. याचे कारण असे की अनुभूतीला शब्दात कसे मांडणार?
माऊली जेव्हा “विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशिलें” म्हणतात तेव्हा त्यालाही “म्हणजे काय?” असा प्रश्न विचारला जाऊ शकतोच. कारण जी अनुभूती माऊलींना आली ती आपल्याला आलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत ती अनुभूती आपल्याला येणार नाही तोपर्यंत ही पंक्ती समजत असूनही दुर्बोध राहणार. आता हेच पहा. खालील श्लोक नंदिकेश्वर यांनी आपल्या अभिनयदर्पण या ग्रंथात मांडलेला आहे.
यतो हस्ताः ततो दृष्टिः
यतो दृष्टिः ततो मनः
यतो मनः ततो भावो
यतो भावो ततो रसः॥
म्हणजे जिथे हात आहे तिथे दृष्टी असते, जिथे दृष्टी असते तिथे मन असते, जिथे मन असते तिथे भाव असतो आणि जिथे भाव असतो तिथे रस असतो.
किती सुंदर श्लोक आहे. अनेक कलाकार आणि शास्त्रीय नृत्य करणारे कलाकार याच सूत्राच्या मार्गाने आपली कला सादर करतात. पण मला सांगा सध्या सुरु असलेले नाचाचे प्रकार वरील श्लोकाप्रमाणे आपली मांडणी करतात का? (मी याला धांगडधिंगा म्हणतो. पण हे माझे वैयक्तिक मत आहे) मुद्रा आणि अंगविक्षेप यातला माझा माझ्यासाठी मी ठरवलेला फरक मला चांगलाच माहित आहे. पण या नव्या जमान्याचा नाचाला देखील कला म्हणतात. यात चूक आणि बरोबर हा प्रश्न नाहीये. फक्त उदाहरण देत आहे.
पहिल्या ट्विटच्या निमित्ताने दोन गोष्टी आठवल्या. त्यातली एक म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांची चित्रे. त्या चित्रांचे खरं तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण झाले पाहिजे तरच त्यातील कलेचे धागे शोधता येतील. त्या चित्रांसाठी विकत घेणाऱ्यांनी काही कोटी मोजले होते असं वाचनात आलं. तेव्हा देखील सगळ्यांना असाच अचंबा जाहला होता! तेव्हा देखील “खरंच ही कला आहे का?” वगैरे प्रश्न विचारले गेले होते. (चित्र संदर्भ – टेलिग्राफ इंडिया)
मला तर कधी कधी वाटतं की कला कशी आहे? यापेक्षा कलाकार कोण आहे? यावरून कलाकृतीची किंमत ठरत असावी. अनेक महाग महाग चित्रे, मला रस्त्यावर कोण्या गरीब, निनावी चित्रकाराने तुटके फुटके ब्रश आणि जुने पुराणे रंग घेऊन काढलेल्या चित्रांपेक्षा सुमार दर्जाच्या वाटतात.
असेच एक उदाहरण म्हणजे १९७० च्या दशकातील असेच एक Modern Art म्हणजे आधुनिक कला! काहींच्या मते आणि माझ्याही मते याला कला किंवा कलाकृती म्हणणं जरा फारच झालं. याला जास्तीत जास्त, “सोपी मांडणी करून, सावरून ठेवलेल्या वस्तू” म्हणता येऊ शकते. पण पुन्हा हा झाला माझा विचार कदाचित काही लोकांना त्या कालच्या काही लोकांप्रमाणे यात एखादा छुपा अर्थ सापडेल. किंवा आत्तापर्यंत कुणालाही न दिसलेले कलात्मक मूल्य म्हणजे Artistic Value दिसेल. काय सांगता यावं. तर सांगतोच ती कलाकृती काय होती…
Carl Andre’s या Minimalist शिल्प-कलाकाराचे Equivalent VIII. म्हणजेच ५ x २७ x ९० १/४ इंच आकाराच्या भट्टीच्या १२० विटांचा एक संच किंवा त्या कालच्या टीकाकारांच्या भाषेत विटांची थप्पी “The Pile of Bricks”
त्या काळी म्हणजे १९७२ साली Tate Gallery नावाच्या एका कलादालनाने अमेरिकन शिल्पकलाकार Carl Andre यांच्या कलाकृतींचा संच त्या काळच्या २२९७ पाऊंड म्हणजेच त्याकाळच्या जवळजवळ ६००० अमेरिकन डॉलर्स ना विकत घेतले. असे विटांचे एकूण आठ संच होते. Carl यांना या विटांच्या रचनांमधून शांती चे अंग दर्शवायचे होते. १९७४-७५ पर्यंत या कलाकृतींकडे कोणीही फारसे बघत नव्हते. १८७६ मध्ये जेव्हा या कलाकृतींपैकी एकही कलाकृती किंवा संच विकला गेला नाही तेव्हा मात्र या कलाकृती किंवा विटांचे संच Tate Gallery मध्ये दाखवणे थांबवले. हे संच कलादालनात नाहीत म्हटल्यावर लोकांनी टीका करायला सुरुवात केली. लोकांनी या घटनेवर तीव्र आक्षेप नोंदवला. याचे कारण असे की Tate Gallery ला आर्थिक पुरवठा करदात्यांच्या पैशांतून होत असे. लोकांनी आपल्या पैशांचा अपव्यय केल्याची झोड उठवली. सर्वत्र टीका होऊ लागली.
या कलाकृतीला नावे ठेवणारेही खूप होते आणि त्याची बाजू घेणारे देखील अनेक होते. अजूनही आहेत. पण अशा कलाकृती विकल्या जातात समजल्यावर काही लोक स्वतःला विटांची थप्पी रचून कलाकार म्हणायला लागले. त्या वेळच्या बातम्यांमध्ये देखील दोन्ही बाजूंनी वाद विवाद सुरु झाले. मग शेवटी प्रश्न तोच उरला “कला म्हणजे नक्की काय?” सध्या या वीटा किंवा कलाकृती Tate Modern या कलादालनात आहेत.
अशी खूप उदाहरणे आहेत ज्यांना कला म्हणावं की नाही? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. प्रत्येक पिढी पुढच्या पिढीत रूढ झालेल्या कलांना “छे ही काही कला नाही” असं म्हणतात. काही परंपरावादी असतात, काही नसतात. तसं पाहायला गेलं तर पाश्चात्त्य विचारपद्धती भारतात येण्याआधी कलेचे पूर्वीचे नियम बऱ्यापैकी जपले गेले होते. पण कलेला नियमात बांधले पाहिजेच का? वगैरे मूलभूत प्रश्न येतात. कलेला अध्यात्मिकतेशी न जोडल्यास असे प्रश्न पुरोगामित्वाचे, नवकल्पनांचे, नवसंवेदनांचे झेंडे घेऊन डोळे वटारून उभे राहतात. यातूनच आधुनिक कवी, कलाकार इत्यादी संज्ञा जन्माला आल्या. पण प्राचीन कला देखील अजून तग धरायचा प्रयत्न करत आहेत. कला म्हणजे काय या प्रश्नाने निर्माण होणाऱ्या वादाला काही अंत नाही! कोणाच्या संवेदनांना काय उमगेल? आणि कोणाच्या इंद्रियांना काय अनुभव येतील? काही सांगता येत नाही.
कला म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर हे वैयक्तिक आहे आणि अनुभूतीच्या मार्गातून मिळणारे आहे. त्यामुळे इथेही त्याचे उत्तर मी देऊ शकणार नाही! फक्त काही विचार मनात आले ते मांडले.
शेवटी हे मुक्तांगण आहे! आणखीनही असे विचार वाचा आणि अभिप्राय कळवा! 🙏🏻