नुकतीच दासनवमी होऊन गेली. श्री समर्थ रामदास स्वामींचे आयुष्य आणि व्यक्तिमत्व इतके अगाध आणि प्रचंड आहे की, आमच्या मते अजूनही त्यांची योग्यता पूर्णतः लोकांच्या लक्षात आलेली नाहीये. ऐकीव माहिती, राजकीय कारस्थाने आणि ऐतिहासिक अभ्यासाचा अभाव या विखारी त्रयीनीं अनेक महापुरूषांप्रमाणे समर्थ रामदास स्वामींचे चरित्र देखील सामान्य माणसाच्या आकलनापासून दूर नेवून ठेवलेले आहे. तरीही समर्थांचे इतके शिष्य आहेत, त्यांचे नाव घेतले जाते ही परमेश्वरी कृपाच म्हणावी लागेल. कारण, “जय जय” म्हटल्यावर आपसूक मुखातून “रघुवीर समर्थ” न निघणारा मराठी विरळाच असेल. असो, लोक काय म्हणतात यापेक्षा आम्हाला “समर्थ काय सांगतात?” याकडे जास्त लक्ष देण्याची इच्छा आहे.
समर्थ रामदास स्वामींचा थोरल्या महाराजांवर म्हणजेच शिवाजी महाराजांवर किती स्नेह होता हे आपण जाणतोच. समर्थ, शिवाजी महाराजांना साक्षात प्रभू श्रीरामाचा अवतार समजत असत. राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण यांमध्ये जागृत व प्रभावी मत असू शकणारे संत विरळा असतात. समर्थांच्या ठायी या तिन्ही विषयांचे अधिष्ठान होते. त्यामुळेच समर्थ महाराष्ट्राच्या राजकारणाशी निगडित योग्य ते सल्ले महाराजांना देत असत. तो काळ लक्षात न घेता, गुप्ततेचे नियम, राजकारण व त्या काळाच्या सीमा लक्षात न घेता तर्क झिडकारण्यांना देव सद्बुद्धि देवो.
१६८० साली थोरले महाराज निवर्तले. तेव्हा समर्थांना हळहळ तर झालीच पण त्यांनी सिंहासनारूढ छत्रपती संभाजी महाराजांना उपदेश पर एक प्रसिद्ध पत्र पाठवले. राजाची मानसिक अवस्था, राज्यव्यवस्था, राजाचे प्रजेप्रती कर्तव्य, राजाचे चारित्र्य-वागणे-बोलणे अशा अनेक विषयांवर समार्थांनी संभाजी महाराजांना उपदेश केलेला आहे. खरं तर हा उपदेश कोणत्याही काळातल्या राज्यकर्त्याला लागू पडावा असा आहे. इथेच समर्थांचे माहात्म्य सिद्ध होते! “शिवराजांचे आठवावे रूप, शिवराजांचा आठवावा प्रताप” या सुप्रसिद्ध पंक्ती याच पत्रातील आहेत. पण आपले ज्ञान केवळ या पंक्तींपुरते सीमित न ठेवता संपूर्ण पत्र वाचावे आणि समजून घ्यायचा प्रयत्न करावा या हेतूने हे सबंध पत्र खाली देत आहोत. नक्की वाचा, समजून घ्यायचा प्रयत्न करा! 🙏🏻
अखंड सावधान असावें । दुश्चित कदापि नसावे ।
तजवीज करीत बसावें । एकांत स्थळीं ॥ १॥
कांहीं उग्र स्थिति सोडावी । कांही सौम्यता धरावी ।
चिंता लागावी परावी । अन्तर्यामी ॥२॥
मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे ।
सुखी करून सोडावे । कामाकडे ॥ ३ ॥
पाटांतील तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना ।
तैसे जनांच्या मना । कळलें पाहिजे ॥ ४ ॥
जनाचा प्रवाहो चालला । म्हणजे कार्यभाग आटोपला ।
जन ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे खोटें ॥ ५ ॥
श्रेष्ठी जे मेळविळें । त्यासाठीं भांडत बैसले ।
तर मग जाणावें फावले । गनीमासी ॥ ६ ॥
ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडता तिसऱ्याचा जय ।
धीर धरूनी महत्कार्य । समजूनी करावें ॥॥ ७॥
आधींच पडली धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ति ।
या कारणें समस्ती । बुद्धि शोधावी ॥ ८॥
राजी राखितां जग । मग कार्यभागाची लगबग ।
ऐसें जाणोनि सांग । समाधान करावें ॥ ९ ॥
सकळ लोक एक करावे । गनिम लोटोनि काढावे ।
एणें करितां कीर्ति धावे । दिगंतरीं ॥ १० ॥
आधी गाजवावे तडाखे । तरी मग भूमंडळ धाके ।
ऐसें न होतां धक्के । राज्यास होती ॥। ११ ॥
समय प्रसंग ओळखावा । रांग निपटून सांडावा ।
आला तरी कळों न द्यावा । जनामध्यें ॥ १२॥
राज्यामध्ये सकळ लोक । सलगी देऊनि करावे साक ।
लोकांचे मनामध्ये धाक । उपजेंचि नये ॥ १३ ॥
बहुत लोक मेळवावे । एक विचारें भरावे ।
कष्ट करोनि घसरावे । म्लेंच्छांवरी ॥ १४ ॥
आहे तितुकें जतन करावें । पुढें आणीक मेळवावें ।
महाराष्ट्रराज्यचि करावें । जिकडे तिकडे ॥ १५ ॥
लोकी हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी ।
चढती वाढती पदवी । पावाल येणे ॥ १६॥
शिवराजास आठवावें । जीवित तृणसमान मानावे ।
इहलोकी परलोकीं तरावें । कीर्तिरूपें ॥ १७ ॥
शिवराजाचे आठवावें रूप । शिवराजाचा आठवावा साक्षेप ।
शिवराजाचा आठवावा प्रताप । भूमंडळीं ॥ १८॥
शिवराजाचें कैसें बोलणें । शिवराजाचें कैसें चालणें ।
शिवराजाची सलगी देणें । कैसी असे ॥ १९ ॥
सकळ सुखाचा त्याग । करोनि साघिजे तो योग ।
राज्य साधण्याची लगबग । कैसी केली ॥ २० ॥
याहुनि करावें विशेष । तरिच म्हणावें पुरुष ।
या उपरि आतां विशेष । काय ल्याहावें ॥ २१ ॥
आणखीन ऐतिहासिक विषयांवरील ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा