February 15, 2025
लघुलेखन उद्गम आणि इतिहास – सर आयझॅक पिटमन

लघुलेखन उद्गम आणि इतिहास – सर आयझॅक पिटमन

Spread the love

इतिहासाची पाने चाळत असताना “सर आयझॅक पिटमन” यांचे नाव समोर आले. Onthisday च्या मते १२ जानेवारी १८९७ ला मृत्यू झाला आणि विकिपीडिया नुसार त्यांच्या मृत्यू २२ जानेवारी १८९७ रोजी झाला. इंग्रज मंडळी सुद्धा स्मृतिदिन तिथीनुसार आणि तारखेनुसार असे पाळतात की काय!? असो, विनोदाचा भाग सोडून देऊ पण, सर आयझॅक पिटमन यांच्याबद्दल माहिती वाचली तेव्हा मात्र अचंबा जाहला. सर आयझॅक पिटमन इंग्रजी शॉर्टहँड म्हणजेच “लघुलेखन” चे जनक आहेत! “लघुलेखन” बद्दल मी लहानपणापासून ऐकून आहे. लुघुलेखन एखादे वाक्य अत्यंत कमी वेळात लिहिण्यासाठी वापरली जाते, पत्रकार आणि स्टेनो मंडळी लघुलेखन वापरतात इत्यादी. पण एवढे माहित असूनही त्या लेखनतंत्राचे जनक असे अनपेक्षितपणे समोर (सांकेतिक अर्थाने) येतील असं वाटलं नव्हतं.

“वेळ वाचवणे म्हणजे आयुष्य वाढवणे!”

सर आयझॅक पिटमन यांचा जन्म ४ जानेवारी १८१३ साली इंग्लंडमध्ये झाला. कोणत्याही सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे सर आयझॅक पिटमन यांचे शिक्षण झाले. घरी शिक्षणाबद्दल आवड होतीच. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इंग्रजी शिक्षकाची नोकरी पत्करली. त्यांना इंग्रजी भाषेबद्दल आस्था तर होतीच. पण, इंग्रजी भाषेची मांडणी कालानुरूप आणि अपेक्षित (सहज अंदाज लावण्याजोगी) याबद्दल ते आग्रही होते. याचाच एक भाग म्हणून त्यांनी English-language spelling reform या चळवळीत आयुष्यभर सहभाग घेतला. इंग्रजी भाषेच्या लिहिण्याच्या पद्धतीत बदल करण्यासाठी, क्लिष्ट आणि अनेकदा अतर्क्य spelling सोडून, सुगम मांडणीकडे जावे यासाठी सर आयझॅक पिटमन आग्रही होते. “वेळ वाचवणे म्हणजे आयुष्य वाढवणे” (Time saved is Life gained) हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. हे कार्य करत असताना त्यांनी वेळोवेळी अनेक पत्रके प्रसिद्ध केली.

लघुलेखन शॉर्टहँड इतिहास
सर आयझॅक पिटमन यांचा लघुलेखन तक्ता

याच ब्रिदवाक्यातून लघुलेखन पद्धतीचा उद्गम झाला. कारण लिहिताना जितका कमी वेळ खर्ची जाईल तितका उरलेला वेळ इतर विधायक कामांसाठी वापरता येईल, हा त्यांचा विचार होता. सर आयझॅक पिटमन यांनी उच्चरांवर आधारित इंग्रजी भाषेसाठी लिहिण्याची एक नवी पद्धत निर्माण केली. तीच ही लघुलेखन पद्धत. १८३७ साली “Sound Hand” या पत्रकात त्यांनी सगळ्यात आधी ही लघुलेखन पद्धत लोकांसमोर मांडली. या पत्रकात त्यांनी Psalm 100Lord’s Prayer, आणि Emanuel Swedenborg यांचे Rules of Life लघुलेखन पद्धतीने लिहून प्रसिद्ध केले. १८४४ साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ छपाईच्या व्यवसायाला देऊ लागले. १८८६ साली त्यांनी आपल्या “Phonographic Teacher” या पुस्तकाच्या १० लाखांहून अधिक प्रत विकल्या.

लघुलेखन इतिहास
सर आयझॅक पिटमन यांच्या लघुलेखन पद्धतीत इसाई प्रार्थना.

इतिहासकारांच्या मते सर आयझॅक पिटमन यांच्याही आधी जगाच्या विविध भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात लघुलेखन या विषयावर संशोधन आणि काम केले गेले होते. पण तरीही आधुनिक काळात आणि अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने लघुलेखन पद्धत लोकांसमोर मांडणारे सर आयझॅक पिटमन पहिलेच. त्यामुळे त्यांना इंग्रजीच्या लघुलेखनाचे जनक म्हणावयास काहीही हरकत नाही.

इतकेच नव्हे तर सर सायझॅक पिटमन यांना आधुनिक काळातील दूरस्थ शिक्षण म्हणजेच Distance Learning चे देखील जनक मानले जाते. याचे महत्वाचे कारण असे की, सर सायझॅक पिटमन यांचे लघुलेखनाचे विद्यार्थी इंग्लंडमध्ये विविध भागात राहात होते. सगळ्यांच्या घरी जाऊन शिकवणे अशक्य असल्याने त्यांनी १८४० च्या दरम्यान आपल्या विद्यार्थ्यांशी लघुलेखनात लिहिलेल्या पत्राद्वारे संवाद साधला. त्यांचे विद्यार्थी लघुलेखनात लिहिलेले पत्र वाचून त्याचे उत्तर पुन्हा लघुलेखनात देत असत. विद्यार्थ्यांबरोबर साधलेला संवाद आणि त्यांची अभिप्राय सर आयझॅक पिटमन यांना लघुलेखन पद्धतीच्या प्रगतीमध्ये खूप उपयोगी पडले.


ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. असेच इतिहासातील रोचक किस्से, माणसे आणि घटना यांच्याबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *