December 2, 2024
बुद्धाचा ऱ्हाट – उत्तम कांबळे – पुस्तक परिचय

बुद्धाचा ऱ्हाट – उत्तम कांबळे – पुस्तक परिचय

Spread the love

पुस्तकाचे नाव – बुद्धाचा ऱ्हाट
लेखक – उत्तम कांबळे 
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन (ISBN 9789385266515)
अधिकार – उत्तम कांबळे 

बुद्धाचा ऱ्हाट - उत्तम कांबळे

भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा काळ आहे म्हणजेच साधारण १९५०. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्याबरोबर करोडो अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला या घटनेच्या पार्श्ववभूमीवर ही कथा घडते. देश स्वतंत्र झाला तरीदेखील आपण स्वतंत्र झालेलो नाही, माणूस झालेलो नाही, वर्षानुवर्षांची जातीची जोखडं आपण वाहतच आहोत या विचाराने आंबेडकरांचा कट्टर अनुयायी वृद्ध रानबा अस्वस्थ होतो. रानबा महार समाजात जन्माला आलेला. नागपूरला बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अनुयायांसमवेत धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारण्याचं ठरवतात. रानबाला त्या वेळी तिथे जायचं असतं आणि तो सोहळा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचा असतो. रानबा पायपीट करत नागपूरला पोहोचतो आणि आपल्या डोळ्यांनी तो सोहळा बघतो. धर्मांतर होऊ शकतं, धर्मान्तर आपण करू शकतो याची आणि धर्मान्तर केल्यानंतर आपल्यात काय बदल घडतो? याची तिळमात्रही कल्पना रानबाला नसते.  आंबेडकरांच्या शब्दांनी त्याच्या मनावर एक विलक्षण परिणाम होतो आणि आंबेडकरांबरोबर तोही बौद्ध धर्म स्वीकारतो. 

पण त्याने बौद्ध धर्म स्वीकारला असला तरीही गावासाठी तो रानबा महारच होता. रानबाला अनुभूती होत होती पण त्याला आपण बौद्ध झालोय म्हणजे नक्की काय झालोय? हे त्याला शब्दात सांगता येत नाही. गाव जुन्या विचारांचं आहे जिथे जाती, चाली – रीती वगैरे अजूनही जुन्याच काळच्या पाळल्या आणि मानल्या जातात. पण आता धर्मान्तर केल्यामुळे हे कुठलेच नियम आपल्याला लागू होत नाहीत हे रानबाच्या मनात पक्क होतं. आपण आता महार नाही हे त्याला पटलेलं असतं पण लोकांना ते पटत नाही ‘कारण जात एका दिवसात कशी जाणार?’ 

जाती पातींनी बरबटलेल्या या व्यवस्थेला विरोध करायचा एक आत्मविश्वास रानबाच्या मनात जागा होतो आणि या जातीभेदाचं प्रतीक असलेल्या गावकीच्या विहिरीवर जातो. ही विहीर सवर्णांची असते ज्याच्यातील दलित पाणी समाजाला घेणं वर्ज्य असतं. दलित समाजासाठी वेगळी विहीर असते. गावकीच्या विहिरीवर जायची हिम्मत कोणीही दलित स्त्री करत नसे कारण तसा गावकीचा नियम असतो. रानबा परत आल्यावर आपल्या हाताने गावकीच्या विहिरीत बदली टाकून पाणी उपसतो आणि अंगावर घेतो. गावात हाहाकार होतो आणि गोष्ट भांडणावर – मारामारीवर येते. गावकरी रागावलेले असतात. पण रानबा सरळ सांगतो की आता मी महार नाही आता मी बौद्ध झालो आहे. मला तुमचे नियम लागू होत नाहीत. गावातले सगळे प्रतिष्ठित मंडळी यावर खल करतात, काही लोक रानबाच्या घराला – समाजाला उध्वस्त करण्याचीसुद्धा धमकी देतात. पण रानबा आपल्या मतावर ठाम असतो.  

लोकशाही आणि भारतीय राजकारण नुकतेच कुठे मूळ धरत होते. आंबेडकरी विचार सर्वदूर पसरत होते. आता कायद्याचं पालन होणार होतं आणि जातींच्या आधारावर भेदभाव टिकणार नव्हतं. खूप विचार करून शेवटी निर्णय असा होतो की गावकीच्या विहिरीवर दलित आणि धर्मांतर केलेल्या समाजासाठी एक वेगळा रहाट बांधला जावा. आधी काही उच्चवर्णीय याचा विरोध करतात पण शेवटी तेही ही गोष्ट मान्य करतात. 

हाच तो बुद्धाचा ऱ्हाट!

शब्दयात्रीवर पुस्तकांच्या बद्दल आणखीन वाचण्यासाठी इथे क्लिक करा..

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *