देशी गनिमी उत्पात । स्वकीयांनी केला घात
राहिली ना अब्रू घरात । जावे कोठे ?।।
देवळे जाहली माती । संतांच्या जाळील्या पोथी
स्वधर्म सोडूनी जाती । केविलवाणे ।।
मावळ रक्तात न्हाता । सह्याद्री क्षीण होता
जाहली तयांची माता । शिवनेरी ।।
सांडोनी स्वतःचे जगणे । हिंदवी राज्य कारणे
राज्याची बांधिली तोरणे । कडेकपारी ।।
कुणी उमराव सरदार । पातशाहीचे जे चाकर
आपुल्यांसी धरिले वैर । रक्त नात्यांनी ।।
ताडीला यवनांचा दोष । सोडीला शरणागतास
वाचविला ज्याने सत्पुरुष । असा मायबाप ।।
गानिमाशी गनिमी चाल । मित्रास पहाडी ढाल
घेऊन एकटा मशाल । निघाला कर्मयोगी ।।
धैर्य स्फूर्ती पराक्रम । दानशूर जो पुरुषोत्तम
राजा असोनि संयम । सन्यस्त योगी ।।
स्वधर्मा नेई लयास । परधर्मा करी न दास
असा राजा तो खास । शिवछत्रपती ।।
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]