“खुळा पाऊस”, खरे तर प्रत्येकाने लहानपणी अनुभवलेली ही कवी गिरीश यांची कविता. कवी गिरीश म्हणजेच शंकर केशव कानेटकर. कवी गिरीश, रविकिरण मंडळाचे सदस्य होते. आजच्या पिढीला दुर्दैवाने त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. जी काही माहिती आहे ती इंटरनेट वर सापडणारीच. पण कावीळ समजून घ्यायचे असेल तर कोण्या त्रयस्थ माणसाने केलेले वर्णन वाचण्यापेक्षा त्या कवीने लिहिलेली कविता वाचणे अधिक योग्य ठरते. त्या नियमाने, मानवी स्वभाव व त्याचे कंगोरे तसेच निसर्गाचे नियम व त्यांचे कंगोरे यांची सांगड घातलेली कवी गिरीश यांच्या काव्यात तुम्हाला आढळेल. आता “खुळा पाऊस” याच कवितेचे पाहा. एका छोट्याशा मुलाच्या खुल्या कल्पनेत, तो पाऊसही खुळा झाला! अलंकाराच्या भाषेत याला “समाधि” म्हणतात. त्या लहान, का मुलाच्या डोळ्यांतून पाहाल तर त्याला हा पाऊस खुळा का वाटतोय याचे उत्तर मिळेल.
पाऊस खुळा । किती पाऊस खुळा!
शिंपडून पाणी, आई! भिजवि फुला ।।ध्रु.।।
लहान मुलांना निसर्गाचे नियम आणि वास्तव समजेपर्यंत थोडा वेळ लागतो. त्यामुळे ते ज्ञान येईपर्यंत आजूबाजूला जे घडत आहे, त्याच्याबद्दल त्यांना जबरदस्त कुतूहल असते. पण कुतूहलाचे निरसन झाले नाही तर ते मात्र आपल्या बाळबोध आकलनात याचे उत्तर शोधू लागतात. इथे लहान मुलगा आईला सांगतोय, पाहा ना हा खुळा पाऊस फुलाला भिजवतोय. वास्तविक पाहता पाऊस पडला की सगळे जग भिजणार पण मुलाचा जीव वेली-कळ्या-फुलांत अडकला असल्याने फक्त फुलाचे भिजणे दिसते आहे. त्याला फक्त इतकेच ठाऊक की ही वेल म्हणजे आई आणि कळ्या तिची बाळे! आणि हा धटिंगण पाऊस विनाकारण त्यांना त्रास द्यायला आलाय! किती सुंदर कल्पना!?
नाचे किती वेड्यापरी,
बडबडे कांहींतरी
झोडपतो उगाच हा वेलीच्या मुला ।।१।।
हा पाऊस म्हणजे मोठा धटिंगण आहे असं मुलाला वाटणं साहजिकच आहे, कारण त्याने नुसता थयथयाट मांडला आहे, बडबड केल्यासारखा अविश्रांत आवाज करत आहे. खरे तर हे गन लहान मुलाला अधिक लागू पडतात. हीच “समाधि” ची खासियत आहे. या खोडसाळ पावसाने वेलीच्या मुलाला झोडपायला सुरुवात केलेली आहे. खरे तर हा लहान मुलगाच पावसात भिजत आहे किंवा भिजायची इच्छा आहे असं म्हणायला हरकत नाही. बिचार्या लहान मुलाला सुकुमार फुलावर, पावसाचे थेम्ब वेगाने पडताना पाहून कसेसेच झाले हे उघड आहे.
दीनवाणी वेलीबाई,
पांघराया नाहीं कांहीं
काय करूं, उघडा हा राहे छकुला! ।।२।।
इथे पुन्हा एकदा लहान मुलाची अगतिकता दिसून येते. वेल जर आई असेल आणि फुले जर तिची मुले असतील, तर कल्पना करा कोणी आई आपल्या मुलांना भर पावसात भिजत भिजत घेऊ जातानाचे दृश्य पाहून कुणाचे मन वितळणार नाही? तसेच या मुलाचे देखील झाले. जसे मोठ्यांचे मोठ्यांशी जमते (अधून मधून) तसेच लहान मुलांचे दुसऱ्या लहान मुलांशी सूत लगेच जुळते! मग या मुलाला, आपल्यासारख्याच त्या वेलीच्या मुलाबद्दल सहानुभूती का वाटू नये?
उचलून आणूं काय,
पुसूं डोकें, अंग, पाय?
काकडून गेला किती बघ माकुला! ।।३।।
निजवूं या गादीवर,
पांघरूण घालू वर,
देऊं काय, सांग आई, आणून तुला? ।।४।।
धिंगाणा घालणाऱ्या पावसात ती फुले भिजत आहेत. जणू एखादे मूल, पावसात भिजलेल्या कुत्र्याच्या किंवा मांजरीच्या पिल्लाला रस्त्यावर पाहून कळवळेल त्याचप्रमाणे हा मुलगा त्या भिजलेल्या मुलांना बघून म्हणतो “आई गं त्या बीच्या फुलांना घरी आणू का? तू जसे भिजून आल्यावर माझे केस पुसतेस, अंग पुसतेस त्याचप्रमाणे मी देखील त्याचे लाड करेन. किती बिचारा कुडकुडतोय पावसात. (माकुला म्हणजे गोंडस!) पाण्यात भिजून मी घरी आल्यावर मला कशी थंडी वाजते तशी त्यांनाही वाटेल. मग जशी तू मला छान पांघरूण घालून झोपवतेस तसे मी त्या भिजलेल्या फुलांना, कळ्यांना झोपवेन. सांग ना आई, आणू का त्यांना घरी !!?” एका कोवळ्या आणि भाबड्या बालमानाची किती सुंदर कल्पना.
काय – “नको तोडूं फूल,
वेल – पावसाचें मूल?
ऊन येतां चमकेल त्याचा डोळुला?” ।।५।।
आणि “येऊं मी घरांत?
भिजूं नको अंगणात?”
नको आई-! चमकेन मीही आपुला! ।।६।।
समाधि अलंकाराचे उत्तम उदाहरण पाहा. लहान मुलाची आत्ममग्न, बालसुलभ कल्पना कशी समोर येते पाहा. स्वतःच कल्पना करत आहे लहान मूल की, आई म्हणत आहे “चला आता घरी!” असे शब्द ऐकल्यावर जगातले असे कोणते लहान मूल असेल जे घरी न येण्यासाठी करणे देणार नाही. अशाच मनस्थितीत ते लहान मूल आहे. तेव्हा या कवितेत देखील लहान मूल म्हणत आहे, की “आत्ताच संपेल हा पाऊस आणि पाऊस संपून ऊन येताच फुलांवरील पाण्याचे थेम्ब चमकतील आणि फूल आणखीन सुंदर दिसेल. तसाच मी देखील सुंदर दिसेन भिजून झाल्यावर. मी देखील चमकेन, नको का?”
मज वेडा म्हणतील?
फूल शहाणें होईल?
मग वेडा म्हणतील सगळे तुला!।।७।।
आणि हे ऐकल्यावर आई मुलाला म्हणतील “मला कशाला सगळे वेडे म्हणतील? फुल शहाणे आहे ते आपल्या आईपाशीच राहील आणि तू मात्र आईचे न ऐकता तिकडे दूर उभा राहशील. मग लोक तुलाच वेडा म्हणतील”
खुळ्या पावसात घडलेली ही भाबडी गोष्ट.. “खुळा पाऊस”!