“सर्सर सर्सर वाजे” आरती प्रभू यांची एक अप्रतिम निसर्गकविता जिला मानवी अनुभवविश्वाचे संदिग्ध गोंदण लाभले आहे. आरती प्रभू म्हणजे अर्थातच खानोलकर यांच्या कवितेत कायमच एक प्रकारची अस्वस्थता, उणीव आणि रुखरुख जाणवते. आरती प्रभू अस्सल हाडाचे कवी आणि कलावंत होते. एखाद्या कलावंताचे दुःख त्यांनी डोळसपणे पाहिले आणि अनुभवले. कोकणच्या मातीत जन्माला आलेला हा मनस्वी कवी नेहमीच परिस्थितीने सतावलेला होता. जगाच्या रहाटगाडग्यात त्यांच्यातला कलावंत भरडला जात होता.
तरीही भूक होतीच, कौटुंबिक जबाबदारी होतीच आणि त्यासाठी होणारी फरफट सुद्धा होती. कदाचित त्यामुळेच असेल पण आरती प्रभू यांच्या कवितेत एक प्रकारची अपूर्णतेची जाणीव होते, नियतीच्या विचित्र खेळाचा लपंडाव दिसून येतो. विशेषतः त्यांच्या निसर्गकवितेत तर या सगळ्याला एक प्रकारची संदिग्धतेची झालर देखील लाभलेली दिसते. “सर्सर सर्सर वाजे, पत्ताच पत्ताच नाही” या कवितेत सुद्धा तीच संदिग्धता, अपूर्णता, हुरहूर, अस्वस्थता आणि या सगळ्यांमुळे झालेला एक विचित्र कोंडमारा समोर येतो.
सर्सर सर्सर वाजे…
पत्ताच पत्ताच नाही;
वाऱ्याशी निरोप आला:
आत्ताच आत्ताच नाही
टप्पोर टप्पोर कळ्या
विलग झाल्यात काही;
नुस्ताच हलून वारा
सुगंध हलत नाही
झंझन झंझन झाले,
पाखरू उडत गेले;
उलट उलट झाड
तळ्यांत बुडत गेले
झर्झर झर्झर गेली
घाईत घाईत कोण?
गवतपातींत सर
उन्हांत पाडीत सोनं
थर्थर थर्थर शुभ्र
झाडून उदास पंख,
तळ्याशी अनाम पक्षी
झालेला निव्वळशंख
परिस्थिती कशीही असली तरीही मानवी मनाला उभारी घेण्याची एक ओढ असतेच. आपण जेव्हा आपल्या वाईट किंवा पडत्या काळात उभारी घेण्याचा विचार करत असतो तेव्हा आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक हालचालीकडे जाणीवपूर्वक सकारात्मक दृष्टीने बघण्याचे वेड लागते. छोट्या छोट्या घटनांना मन काहीतरी चांगले घडण्याची चाहूल समजू लागते.
सर्सर सर्सर वाजे…पत्ताच पत्ताच नाही; पण अखेर जेव्हा हे समजते की ही चाहूल फक्त चाहूलच आहे आणि ती देखील आभास असू शकते तेव्हा हुरहूर वाढत जाते. तशीच काहीशी अवस्था होते जेव्हा पहिल्या कडव्यात आरती प्रभू म्हणतात, वाऱ्याशी निरोप आला: आत्ताच आत्ताच नाही
टप्पोर टप्पोर कळ्या, विलग झाल्यात काही माझ्या मते या कळ्या म्हणजे मानवी स्वप्ने आणि आकांक्षा ज्या उमलू पाहात आहेत. खरे तर कळीच्या आयुष्याचा पुढचा टप्पा म्हणजे फुलून फुल होणे. फुल होण्यात कळीचे पूर्णत्व आहे. पण कळी उमलली हे समजण्यासाठी फुलाचा सुगंध दरवाळावा लागतो. पण इथे आरती प्रभू यांची हुरहूर दिसून येते की नुस्ताच हलून वारा सुगंध हलत नाही वारा हलला म्हणून सुगंध हलत नाही. म्हणजे पूर्णत्वाला न जाणारी स्वप्ने निव्वळ स्वप्नेच बनून राहतात. अपूर्णता!
ही अपूर्णता माणसाच्या मनाला अस्वस्थतेने वेढते. यात भय, शंका, अपयश, अपेक्षाभंग इत्यादींचे विचित्र मिश्रण बनते.
अखेर वाट बघून बघून एखाद्या गोष्टीवरून मन उडून जाऊ पाहाते झंझन झंझन झाले, पाखरू उडत गेले सगळं काही सोडून जावंसं वाटतं. तेव्हा मनाचे झाड उदासीच्या वजनाने खाली खाली वाकू लागते. अपेक्षाभंगाचे आणि अपयशाच्या भयाचे पाणी देखील वाढू लागते उलट उलट झाड तळ्यांत बुडत गेले. आरती प्रभू निसर्गाच्या मदतीने मनाची अवस्था समोर आणू पाहतात.
सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे! आयुष्याच्या विचित्र, संभ्रमित आणि उदासी वळणांवर काही चांगलं घडलं तरीही ते क्षणिक आहे की काय असं वाटतं. एखाद्या अल्लड सरीप्रमाणे सुख येते आणि झर्झर झर्झर गेली घाईत घाईत कोण? विचारेपर्यंत निघून जाते. आणि मागे उरतात ती फक्त गवताची काही ओली पाती व समोर उन्हात तरळणारे पावसाचे सोने.. गवतपातींत सर उन्हांत पाडीत सोनं
आरती प्रभू यांच्या कवितेतील आणखीन एक घटक म्हणजे अनाम पक्षी. त्यांच्या अनेक कवितांमध्ये याचे उल्लेख दिसतात. मला अनाम पक्षी म्हणजे कधी मन तर कधी मनात खोल लपवून ठेवलेल्या अव्यक्त इच्छा वाटतात. जेव्हा सगळ्या चाहुली फोल ठरतात, काळ आला तरी वेळ आलेली नसते, तेव्हा मन उदास होते. पण तरीही जगले तर पाहिजेच अशा वेळेस ही उदासी पुन्हा एकदा झटकावी लागते कारण वेडी आशा थर्थर थर्थर शुभ्र, झाडून उदास पंख अशा वेळेस मन स्वतःला पुन्हा सावरून घेते आणि आपल्याभोवती एखादे कवच गोळा करते तळ्याशी अनाम पक्षी, झालेला निव्वळशंख
एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारी ही कविता.. शब्दयात्रीवर आणखीन अनेक कवितांचे रसग्रहण पोस्ट केलेले आहे. या दुव्यावर नक्की वाचा.