दसरा आला की मला आपट्याच्या पानांपेक्षा जास्त आठवण येते ती कांचनाच्या पानांची! कवी ग्रेस यांचे एक वाक्य आहे, “रामाच्या वनवासाची खरी भागीदारीण झाली उर्मिला”. कांचनाच्या पानांची मला थोडी फार तशीच गत वाटते. वर्षानुवर्षे लोक आपट्याची पाने म्हणून कांचनाची पाने ओरबाडत आहेत, बाजारात विकत आहेत आणि विकत घेणारे विकत घेत आहेत. एखाद्याने अभागी असावे तरी किती?
सोनियाच्या दिवशी त्यांनी, ओरबाडले सोने म्हणुनी प्रतिरूप देवानेही दिधले, कांचने जाणो कोणत्या क्षणी रडते द्विदल कवेत घेऊनि ,अपुले देह शुष्क नी जीर्ण पुन्हा उगवतील नवी अंकुरे, आणि होतील भग्न विदीर्ण सहज घेतला जन्म तरी त्या, नशिबाने का अनाथ केले कर्णाला तरी होते कुंडल, कांचन व्याध नागवे सापडले सोसावे किती बलात्कार हे, नशिबाचे अश्राप जिवांनी अभाग्यांच्या ऐकेल का हो, आर्त बिचाऱ्या हाका कोणी?
कांचनाला जन्म सहज, नैसर्गिक पण अभाग्याचा मिळाला आणि कर्णासारखी कवचकुंडले देखील मिळाली नाहीत. अशीच असतात काही माणसे. जे बिचारे विनाकारण भोग भोगण्यासाठीच जन्म घेतात. अशी किती उदाहरणे देता येतील? आपल्यालाही कधी ना कधी अशा दुःखाला जावू लागते. दररोज सोशल मीडिया, बातम्या यांच्यात अशा निष्पाप जीवांचा नाहक बळी जाताना दिसतो. काळीज पिळवटून निघतो. तेव्हा मात्र कांचनाच्या पानांची आठवण येते. निव्वळ दिसायला सारखे म्हणून कांचनाच्या पानांची दरवर्षी होणारी कत्तल जीवाला चटका लावून जाते.
अशा वेळी परमेश्वराला ओरडून ओरडून विचारावंसं वाटतं “देवा जन्मच कशाला दिलास रे त्यांना?” किती असे जीव जन्माला येतात फक्त मरण्यासाठी. मरणही कसले? जगण्याची शिसारी येईल असे.. देवा.. देवा..