देवाशप्पथ सत्य सांगेन आणि फक्त सत्यच सांगेन! पण, काही योगायोगसुद्धा इतके विचार असतात की स्वतःलाच विश्वास बसत नाही. दुसऱ्यांनी शंका घेतली तरी वाईट वाटत नाही. तसंच काहीसं झालं आज सकाळी. सोशल मिडीयावर शेतकरी वर्गातील श्रीमंत शेतकऱ्यांना उत्पन्न कर (Income Tax) लावणे अथवा न लावणे यावरून खल सुरु होता. अनेक जणांचं मत कर न लावण्याच्या बाजूने होते. त्याची मुख्य कारणे अशी की, स्लॅब्स कोण ठरवणार? शेतकरी अन्नदाते आहेत, शेतकरी प्रत्येक वर्षी पैसे कमवत नाही इत्यादी थोडक्यात “तुम्हाला वाटतात तितके पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत”. हा खल बाजूला सारून घरगुती कामांसाठी बाहेर निघालो. रिक्षात बसून जात होतो. मला अप्पा बळवंत चौकात काही कामासाठी जायचे होते. नारायणपेठेतील न. चिं. केळकर रस्त्यावर आमच्या समोर एक पिवळ्या पाटीची कॅब जात होती जिच्यावर “कृषीधन” लिहिलेले होते. गाड्यांच्या मागे इतर स्टिकर्स असतात तसे हे एक म्हणून मला काही विशेष वाटले नाही. पण तेवढ्यात माझे रिक्षावाले काका म्हणाले
“कृषीधन लिहिलंय.. बहुतेक शेतकरी असेल. शेतीच्या उत्पन्नातून गाडी घेतलेली दिसते आहे”
प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्यासाठी हा प्रकार नवीन होता.
“हो का!?” मी चकित होतो हे त्यांना समजलं असावं, त्यामुळे ते म्हणाले
“होय. शेतीच्या उत्पन्नातून काही घेतलं की त्याला कृषीधन म्हणतात” अजूनही मी विशेष चकित झालेलो नव्हतो पण एखाद्या शेतकऱ्याने शेतीच्या उत्पन्नातून गाडी घेतली हे कौतुकाचे वाटले.
“अरे वा! चांगलं आहे की” मी म्हणालो
“आमच्या एका पाहुण्याने शेतीच्या उत्पन्नातून बंगला बांधला” रिक्षावाले काका संवाद साधत होते. अर्थातच माझे कुतूहल जागृत झाले
“अरे वा! सहीच की” मला पुन्हा एकदा कौतुक वाटले
“चांगला दोन माजली बांधलाय मोठा च्या मोठा..” काका सांगत होते “दोन- अडीच कोटी खर्च केले बंगला बांधायला”
अर्थातच मी चकित झालो आणि नैसर्गिक प्रश्न विचारला
“मोठे शेतकरी आहेत म्हणायचं”
“दोन एकर शेतजमीन आहे शिराळ्याला, सांगलीच्या जवळ. आम्ही पण तिकडचेच” काका सहज म्हणाले. काका सहज म्हणाले खरे पण आता मात्र मी संपूर्णपणे आश्चर्यचकित झालेलो होतो.
“दोन एकर जमिनीतून एवढे उत्पन्न कसे मिळाले?!” मी प्रश्न केला
“तो हुशार आहे. संपूर्ण शेतात एकच पीक घेत नाही” रिक्षावाले काका
“म्हणजे?” मी, कारण अर्थातच माझ्याकडे या विषयातलं ज्ञान फार नाही
ती कृषीधन स्टिकर लिहिलेली गाडी ओमकरेश्वरच्या दिशेने निघून गेली. पण आमचा विषय न. चिं. केळकर रस्त्यावरच सुरु होता.
“अहो तो काय करतो, त्याने १६-१६ गुंठ्याच्या जागेत वेगवेगळ्या गोष्टी लावल्या आहेत. काकडी, लिंबू, टोमॅटो आणि मिरची बारमाही घेतो. सीजन ला झेंडू आणि शेवंती फुलं. बागायती आहे आणि ऊस नाही लावत” काका सांगत होते मी ऐकत होते.
“अहो पण तरी एवढ्या कमी जमिनीतून पैसे मिळत नाहीत, मी हे ऐकलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ तो काहीतरी बरोबर करतोय, किंवा योग्य करतोय. ज्याचा फायदा मिळत आहे” मी सरळ माझे शहरी ज्ञान पाजळलं
“तेच सांगतोय साहेब, तो हुशार आहे. तो काय करतो काही पिकं वर्षभर घेतो. नुसत्या ३-४ महिन्यापुरतं नाही करत. आता एखाद्या भाजीला.. समजा मिरचीला १-२ महिने भाव कमी असला तरी बाकी वर्षभर भाव इतका कमी नसतो. ३-४ महिन्यात भाव वाढले की सगळे पैसे भरून निघतात” रिक्षावाले काका सांगत होते आणि मी मनातल्या मनात गणित करत होतो.
एक मात्र खरं आहे की प्रत्येक भाजीचा भाव वर्षभर कमी राहात नाही! कधी कमी, कधी जास्त कधी अति जास्त असं वर्षभर सुरु असतं. माझ्या मनात हा विचार सुरु होता. रिक्षा लोखंडे तालमीच्या गल्लीपाशी आलेली होती. लवकरच अप्पा बळवंत चौक येणार आणि माझे कृषीधन विषयक ज्ञानसंपादन संपणार याची भीती वाटत होती. आणि तितक्यात काका उद्गारते झाले,
“आता टोमॅटोचं बघा कधी भाव अगदीच २ रुपये किलो असतो. पण तो वर्षभर नसतो. मधूनच ३-४ महिने पार ६०-८० पर्यंत जातो, बाकी वर्षभर ५०-६० च्या आजूबाजूला असतो”
काका तसं खरंच सांगत होते, “खरंय, काही दिवसांपूर्वी लिंबू कसले महाग झाले होते. आत्ताही महागच आहेत”
“तेच ना. आणि त्याने काय केलंय हॉटेलवाले आणि कार्यालय यांना बांधून घेतलंय. माल जातोय कुठं? तशी खटपट खूप करतो. हुशार आहे.” काका सांगत होते आणि मी ऐकत होतो.
हे निश्चित होतं की काका ज्याच्याबद्दल सांगत आहेत तो निश्चितच काहीतरी योग्य करत आहे. He must be doing something good!
“नक्कीच ते इतरांपेक्षा काहीतरी चांगलं करत आहेत, यशाचं काहीतरी गमक निश्चितच त्यांना समजलेलं आहे” असं म्हणत मी रिक्षातून खाली उतरलो.
खरं तर त्या काकांशी मी अजूनही गप्पा मारायच्या होत्या पण तितक्यात आम्ही अप्पा बळवंत चौकाच्या इथे पोहोचलो. रसिक समोर मी उतरलो. पैसे दिले, ते काकांनी घेतले.
कृषीधन लिहिलेल्या स्टिकरपासून सुरु झालेला हा छोटासा संवाद. कुणालाही खरा वाटणार नाही. पण मी जे सांगेन ते सत्यच सांगेन असं मी आधीच म्हटलेलं आहे. बाकी या सत्यघटनेवर विश्वास ठेवणे न ठेवणे, मी वाचकांवर सोडतो. 🙏🏻
या आधी लिहिलेले ब्लॉग्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा.