February 17, 2025
घटकंचुकी – एक अपरिचित अचर्चित शाक्त प्रथा

घटकंचुकी – एक अपरिचित अचर्चित शाक्त प्रथा

Spread the love

घटकंचुकी – आमचा संदर्भ

घटकंचुकी, दोन तीन दिवसांपूर्वीच हा शब्द प्रथम वाचनात आला. इतिहासाबद्दल वाचन करत राहणे हा आमचा आवडता उद्योग. एका बहुचर्चित मराठे – इंग्रज युद्धाच्या पाऊलखुणा आणि सत्यता शोधत होतो. तेव्हा दुसरे बाजीराव पेशवे त्यांच्याबद्दल काही साधने वाचत असताना इतिहासाचार्य राजवाडे यांचे “भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास” हे पुस्तक वाचनात आले. त्या पुस्तकात भारतातील विवाहाच्या, समागमाच्या अतिप्राचीन व अपरिचित प्रथांबद्दल माहिती वाचायला मिळाली. त्यात द्वितीय बाजीराव पेशव्यांच्या बाबतीत मथळ्यात “घटकंचुकी” चा उल्लेख आला1.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे

वरकरणी अत्यंत अश्लील अशी वाटणारी घटकंचुकी ही प्रथा. पण अगदी सत्य सांगायचं तर, आजच्या काळात देखील असल्या स्वैर समागमाच्या पार्ट्यांबद्दल मी ऐकून असल्यामुळे मला या प्रथेबद्दल विशेष आश्चर्य वाटत नाही. मोठमोठ्या लोकांच्या, अति श्रीमंत लोकांच्या अशा पार्ट्या प्रत्येक शहरात चालतात हे एक सत्य आहे. आपल्यासारख्या सामान्य लोकांना बीभत्स, अश्लील आणि अश्लाघ्य वाटणाऱ्या कैक गोष्टी या “मोठ्या” लोकांच्या आयुष्याचा एक नैसर्गिक घटक आहे.

घटकंचुकी आणि शाक्त संप्रदाय

घटकंचुकी ही एक वाममार्गी शाक्त संप्रदायाची प्रथा आहे. काही लोक या प्रथेला अघोरी परंपरेशी जोडतात. काही साम्य असू शकते पण, मला त्यात तथ्य वाटत नाही कारण शाक्त संप्रदाय आणि अघोरी पंथ यात तात्विक फरक आहेत. शाक्त पंथात मूलतः शक्तीची उपासना करतात. शाक्त संप्रदायातील लोक “आदी शक्ती” ला संपूर्ण विश्वाचे मूळ, सर्वशक्तिमान आणि सर्वगतिमान मानतात. त्या शक्तीला साध्य समजतात. त्यामुळे या संप्रदायातील सगळ्या प्रथा जीवन संचार करणाऱ्या शक्तीच्या उपासने भोवती आणि त्या शक्तीच्या समागम साधने भोवती फिरतात. शाक्त संप्रदायाचे दोन पंथ आहेत.

  • साममार्गी – सात्विक उपासना, मंत्रोच्चार आणि पूजा पद्धतीने केलेली उपासना
  • वाममार्गी – तामसी मार्गांनी शक्तीची केलेली उपासना ज्यात पाच “म”कार किंवा पंचमकार म्हणजे मंत्र, मांस, मीन, मद्य आणि मैथुन, यांचा समावेश होतो. वाममार्गी पांथांना कोणतीही गोष्ट अथवा मार्ग वर्जित किंवा अश्लील नसते.

अर्थातच आत्तापर्यंत तुम्ही वाममार्गी शाक्त संप्रदायाबद्दल मनाची धारणा करून घेतली असेलच! त्याबद्दल थोडे सांगावेसे वाटते की नीती-अनीती, श्लील-अश्लील या गोष्टी बऱ्याच प्रमाणात कालसापेक्ष असतात. पटत नसेल तर आजकाल सिनेमात, टीव्हीवर दाखवले जाणारे अर्धनग्न नाच आपल्या आजी – आजोबांना अश्लील वाटतात का? ते विचारा. असो, मुद्दा इतकाच की कोणताही ग्रह करून घेण्याआधी सगळ्या बाजूंनी विचार करणे गरजेचे असते. विशेषतः ऐतिहासिक आणि पारंपरिक प्रथांबद्दल मत बनवताना!

घटकंचुकी प्रथा

वर नमूद केल्याप्रमाणे शाक्त परंपरेत मैथुन हा साधनेतील एक भाग समजला जातो. घटकंचुकी याच शाक्त परंपरेतील कांचुलिया, कांचलिया किंवा काचोळी या वाममार्गी संप्रदायातील एक प्रथा2. घटकंचुकी हा शब्द घट (माठ, कुंभ) आणि कंचुकी (चोळी) या दोन शब्दांची संधी आहे. या प्रथेचे स्वरूप समारंभाचे असे. या समारंभात समसमान स्त्री आणि पुरुष सहभाग घेत असत. मद्य, मांसाचे सेवन होत असे. काही ठिकाणी शाकाहारी प्रसाद किंवा भोगचे सेवन केले जात असे. जमलेल्या प्रत्येक स्त्रीची कंचुकी पाण्याने भरलेल्या घटात टाकली जात असे. स्त्रिया त्या घटाची पूजा करत आणि एखाद्या वस्त्राने आपले शरीर झाकीत असत. त्यानंतर एक एक पुरुष त्या घटातून एक कंचुकी उचलत असे. ज्या स्त्रीची ती कंचुकी असेल, त्या स्त्रीने त्या पुरुषाबरोबर रात्र घालवायची / रममाण व्हायचे असे3. शाक्त पंथात वीर्य आणि स्त्री स्त्राव दोन्ही पूजनीय मानले जातात. दैहिक अनुभवांतून, काम भावाच्या मार्गाने आदिशक्ती आणि निर्माणशक्तीची अनुभूती घेणे यासाठी या प्रथा जन्मास आल्या असे मानले जाते.

असे म्हणतात की या प्रथा आणि हे संप्रदाय खूप प्राचीन आहेत. पण १४ व्या शतकात त्यांना मोठे स्वरूप आले. या परंपरेत कालानुरूप आणि जागेनुरूप बदल झालेले समजायला मिळतात. राजस्थान पासून दक्षिण भारतापर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात या प्रथेचे निर्वहन केले जात असे4. या प्रथेला कधी कधी चक्र-मार्ग किंवा चोली-मार्ग असेही म्हणत5,6.

कधी या समारंभात कोणी एक पुरुष कोतवाल किंवा गुरु म्हणून यजमानपद सांभाळत असे. ज्या स्त्रीची कंचुकी निवडली जाईल ती कदाचित त्या पुरुषाची नातलग असू शके किंवा परजातीय असू शके. अनेक जोडपी या समारंभात भाग घेत चक्राकार आकारात उभे राहत असत. मध्यभागी एक कुमारी उभी असे व तिचे पूजन केले जाई. त्याला चक्रसेवा म्हणत. संपूर्ण जागेत अनेक समागम एकाच वेळी गुरु (स्त्री किंवा पुरुष) यांच्या देखरेखेखाली घडत. सगळे नियम कडक असत आणि स्वैराचाराला वाव नसे8. कधी वीर्य ग्रहण करत असत (याबद्दल फक्त आख्यायिका ऐकायला मिळाल्या).

काही इतिहासकारांच्या मते काही पंथांच्या पद्धती (ज्यात बौद्ध पंथाचा देखील अंतर्भाव होतो) अत्याधिक कठोर आणि सर्वसामान्य सामाजिक जीवनभोगाच्या एका बाजूला झुकणाऱ्या आहेत. त्यांची प्रतिक्रिया म्हणून अशा वाम मार्गी प्रथा निर्माण झाल्या7 यावर कितपत विश्वास ठेवायचा हा निर्णय आम्ही वाचकांवर सोडतो. मुळात तंत्र कोणतेही असो त्याला वाम मार्गाने देखील वापरले जाऊ शकते. कोणी प्रकाशात अनंत शोधत असतो तर कोणी अंधःकारात शून्य! निव्वळ कामवासना आणि स्त्री – पुरुष समागमात जन्म घेणारी मूलभूत, अबाध्य शक्तीची अनुभूती यांच्यामधली सीमारेषा अत्यंत पुसट आहे. वाम मार्ग मूलतः साम किंवा योग्य मार्गाने घातलेले सगळे नियम अमान्य करतो. त्यामुळे त्याला ना सामाजिक बंधने आहेत, ना सांप्रदायिक, ना नैतिक. विशेष म्हणजे या मार्गात कौटुंबिक नाती आणि जाती देखील आड येत नाहीत. एकंदरीतच आपल्या सामाजिक आणि नैतिक जाणिवांना छेद देणाऱ्या या गोष्टी आहेत!

मुळात तंत्र कोणतेही असो त्याला वाम मार्गाने देखील वापरले जाऊ शकते. कोणी प्रकाशात अनंत शोधत असतो तर कोणी अंधःकारात शून्य!

लक्ष्मी सहस्त्रनाम मध्ये देवीचे एक नाव ॐ चक्रमार्गप्रवर्तिन्यै नमः।चक्रमार्गप्रवर्तिनी” असे देखील आहे. म्हणजे मानवी शरीराच्या चक्रांमधून मार्गक्रमण करणारी. देवीचे एक नाव चक्र-मार्ग प्रवर्तिनी असणे आणि या शाक्त प्रथेचे नाव चक्र-मार्ग हा एक विशेष योगायोग आहे.

एकुणातच या प्रथांमध्ये अत्यंत गडद आणि सामान्य समाजाला अनुसरून नसलेल्या गोष्टी घडत. काळानुरूप या प्रथेत बदल होत गेले आणि लुप्त देखील झाले. आजकाल जर अशा प्रथा घडत असतील तर त्याबद्दल ऐकिवात येत नाही.

शेवटी..

पूर्वीच्या काळी वाममार्गी संप्रदायांत असे समारंभ/ प्रथा होत असत. अर्थातच त्यांना सामान्य समाजात कधी फारशी मान्यता मिळाली नाही. आजही मिळत नाही. मानवी मन कायमच अंधाराला घाबरते. त्यामुळे या सगळ्या परंपरा, प्रथा लपून छपून किंवा एकांतात पाळल्या जात असत. भारतात आणि जगात अशा अनेक प्रथा आहेत ज्यांना आपण वाम किंवा इंग्रजीमध्ये dark म्हणू शकतो. घटकंचुकी अशीच एक अपरिचित अचर्चित शाक्त प्रथा. पुस्तके, साधने धुंडाळताना अनेक गोष्टी वाचनात येतात ज्यांच्याबद्दल लिहिणे देखील अवघड आहे. कारण आपल्या सामाजिक जाणिवांमध्ये त्या प्रथांना अत्यंत अनैतिक मानले जाते. घटकंचुकी किंवा चक्रमार्ग किंवा चोलीमार्ग कोणाला किती नैतिक आणि अनैतिक वाटते ते आम्ही वाचकांवर सोडतो. ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करत असताना या प्रथेबद्दल माहिती मिळाली ती आपल्यासमोर आणण्यासाठी हा ऊहापोह.

त्याचप्रमाणे सध्या घटकंचुकी च्या अनुषंगाने सुरू असलेल्या उथळ व हीन चर्चांना विराम मिळावा हा देखील उद्देश आहे.

संदर्भ

  1. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास – इतिहासाचार्य राजवाडे
  2. भारतीय संस्कृतीकोश भाग १
  3. महाराष्ट्र शब्दकोश भाग २
  4. राजस्थानी शब्दकोश
  5. Cult Of Radha-Krishna In Indian Art And Literature (पृ २५०)
  6. The Proceedings of the Indian History Congress, Sixth Session, 26, 27 and 28 December, 1943 (पृ २०१, २०२)
  7. भारतीय समाजसंस्थाएँ और संस्कृती ~ रामनाथ शर्मा, राजेंद्र कुमार शर्मा, (पृ ५०)
  8. Demons Of The Flesh ~ Nikolas & Zeena Schreck (भाग १३४)

ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कळवा. आणि इतर ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

8 thoughts on “घटकंचुकी – एक अपरिचित अचर्चित शाक्त प्रथा

  1. अत्यंत नाविन्यपूर्ण माहिती. सर्वप्रथम मी घाईत असताना हा लेख उडता वाचला होता, पुन्हा वेळ मिळाला तसा प्रत एकदा वाचला. आपल्या इतिहासात अशीही एक प्रथा होती हे वाचून कुतूहल वाटले. इतिहासात संस्कृती, लढाया, आक्रमणे ह्यांच्या वर हजारो पाने लिहिली जातात पण अशा एखाद्या लुप्त झालेल्या प्रथेबद्दल क्वचितच वाचायला मिळते.

  2. I will suggest you to read Joseph Conrad’s The Heart of Darkness’, rituals are near about same in African countries also!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *