तर आज जागतिक पुरुषदिन! काहीही लिहायच्या आधी हे सांगणं आलंच की मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीयेत. कारण स्वतः उदास झालेला माणूस कोणाच्या भावना कसा दुखवू शकतो !?
कोणाला माहित आहे का काही याच्याबद्दल? अर्थात, मी हा प्रश्न विचारल्यावर बरेच जण गुगल वर शोधतील! हे ही साहजिकच आहे म्हणा. खरं तर हे असले पुरुषदिन साजरे करायची गरजच काय असते? युगानुयुगे इतरांवर अन्याय करणाऱ्या या नीच प्राण्यासाठी एखादा दिवस पाळणे म्हणजे जरा अतीच होतंय नाही का? आम्ही तरी हेच ऐकत आलो आहोत की दुसऱ्यांवर अन्याय आणि अत्याचार करण्याचं “सोल कॉन्ट्रॅक्ट” पुरुषांनी घेतलेलं आहे (होतं?).
माझ्या मते दरवर्षी पुरुषदिन अधिकच उदास होतो. या दिवशी मला याची अधिक प्रकर्षाने जाणीव होते की मी एक पुरुष आहे! इतर दिवशी मी मुलगा, मॅनेजर, बाबा आणि नवरा असतो. खरं तर हे सगळं असल्यामुळे मी या गोष्टींवर लिहिणं टाळतो. कारण चुकून कोणाच्या तरी भावनांच्या मुलायम काचेच्या भांड्याला धक्का लागायचा आणि मी वरचं सगळं सोडून पुन्हा पुरुष होऊन जायचो! कायदा वगैरे माणसांना लागू होतो पुरुषांना नाही. UN ला कोणीतरी सांगा आम्हाला मुलगा, बाबा वगैरेच राहू दे, पुरुष नको आणि तो पुरुषदिन नको! आम्हाला आमची जबाबदारी जास्त महत्वाची आहे या दिवसांपेक्षा. कशाला ऊगाच उदासी?
मग अशा बीभत्स प्राण्यासाठी कोणी कशाला वेळ दवडावा? मी प्राणी हा शब्द मुद्दाम वापरला आहे. कारण मानव हा जरी एक प्राणी असला तरी तो पुरुषांना उत्तम लागू पडतो असा एक प्रमाद आहे. खरं तर श्वापद किंवा जनावर म्हणणार होतो पण आदिमानवाने जंगलात राहणे सोडून दिल्यामुळे ते बरोबर ठरणार नाही. अधून मधून वर्तमानपत्रात ही बिरुदावली पुरुष लोक आपल्या कर्तृत्वाने कमावतातदेखील. फक्त गमंत अशी की कळपात एक श्वापद दिसला म्हणून पूर्ण कळप श्वापदांचा ठरतो. बाकी आम्ही सध्या तरी बोकड किंवा झुरळं वगैरे या प्राण्यांच्या रांगेत मोडतो.
मला तर सध्याचे कायदे, बातम्या पाहून फारसं आश्चर्य वाटत नाही. कारण पुरुषाने पुरुष असण्याचा न्यूनगंड बाळगला पाहिजे ही प्रगत जगासाठी एक गरज आहे. गेल्या २०-३० वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर सरकारे आणि इतर लोक (मी कोण ते सांगणार नाही, मी एक नोकरी करणारा माध्यम वर्गीय पुरुष आहे आणि मी कायद्यांना घाबरतो) पुरुषांना पुरुष असण्याबद्दल न्यूनगंड आणि पुरुषांच्या श्वापदीय इतिहासाबद्दल शरम वाटून देण्यात यशस्वी झालेले आहेत.
माझ्या मते देवाची मनुष्य प्राण्याला (किमान) स्त्री आणि पुरुष या दोन लिंगांमध्ये विभागण्याची एक चूक केलेली आहे. पण, माझी आशा आहे की, येत्या काही लाख वर्षात देव उत्क्रांतीच्या मार्गाने हळू हळू आपली चूक दुरुस्त करेल. तो पर्यंत माझ्याकडे पर्याय नाही आणि तुमच्याकडेही नाही!