पहाटे उठल्या उठल्या आधी खिडकीतून बाहेर बघितलं, कुठेही ढग दिसत नव्हते! ताबडतोब आवरून बाहेर पडलो. कुठे ते बाहेर पडेपर्यंत निश्चित माहित नव्हतं. बाहेर पडताना प्रभात रोडच्या दिशेने जायचं मनात होतं पण बिल्डिंगबाहेर पाय पडताच, ते सरळ अलका टॉकीज चौकाकडे चालू लागले. आणि मनातल्या मनात एक Google Map तयार झाला. अलका चौक, डेक्कन, जंगली महाराज रस्ता आणि ओंकारेश्वर.. पुढचं पुढे बघू! मुद्दाम मोठा कॅमेरा घेतला नव्हतो कारण, बाहेर पाडण्याचे काही खास कारण नव्हते. फक्त एक ‘फेरफटका’ मारायचा इतकंच नक्की होतं. पण ही, चौकट लाभेल असं वाटलं नव्हतं..
अलका चौकापर्यंत रस्त्यावरून चालताना, गणेशोत्सव जवळ आलेला आहे हे स्पष्ट जाणवत होतं. जागोजागी जाहिराती, नेत्यांची तोंडे दाखवणारे फलक आणि त्या गर्दीत अधून मधून दिसणारे बाप्पाचे चित्र! हे नेते लोक तरी रस्त्याचं असं विद्रुपीकरण का करतात देव जाणे? असो.. तर थोडक्यात सांगायचं झालं तर इथपर्यंत प्रवास चांगला झाला आणि माझा निर्णय योग्य आहे याची खात्री पटली.
तसाच पुढे चालू लागलो. लकडी पूल आला. तिथेही काही चांगल्या चौकटी हाती लागल्या. त्यात एक आई-मुलगी यांची जोडी सरळ चालली होती. त्यांच्याकडे बघून त्या कोणत्यातरी मोहिमेवर जात आहेत हे नक्की वाटत होतं. एक कावळा दातात गवताची काडी जणू काही, कडुनिंबाची काडी घेऊन दात घासावे तसा घेऊन बसला होता. बाकी लकडी पुलावरून, मेट्रोचा पूल छान दिसतो.
असो हे सगळे विषय नंतर. कारण ते देखील रोचक आहेत. पण आत्ता पुढे जाऊ. डेक्कन, जंगली महाराज रस्ता आणि ओंकारेश्वर झाल्यावर, अचानक वरच्या दिशेने वळलो. ही गल्ली थेट शनिवार वाड्याकडे जाते. तिथे एक वीर मारुती मंदिर आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूला एक वाडा आहे. जुना आहे आणि मी देखील कैक वेळा त्याचे फोटो काढलेले आहेत. तर नेहमीप्रमाणे याही वेळी मी मोबाईल बाहेर काढला आणि एक फोटो काढला. नेहमीप्रमाणे आनंद वाटला!
मोबाईल हातात घेऊन वरील फोटो न्याहाळत होतो. लागलीच Instagram वर टाकायचं ठरवलं “पुण्याचा भूतकाळ” वगैरे काहीतरी नावाखाली. आणि तितक्यात एक आजोबा वाड्याच्या समोरून चालत जाताना दिसले. क्षणार्धात एक अदृष्य चौकट डोळ्यांसमोर उभी राहिली आणि काही समजायच्या आत, जणू काही प्रतिक्षिप्त क्रिया असल्यासारखा मोबाईल वर आला आणि एक फोटो टिपला. नशीब इतकं चांगलं की त्या क्षणाला आजुबाजूला कोणीही नव्हतं. ना कोणी चालत होतं, ना कुठली गाडी. फक्त तो वाडा आणि ते आजोबा.
आणि दोन शब्द मनात उमटले “आजचा काल”. काहीच क्षणात माझ्या आधीच्या फोटोचे सिंहासन या फोटोने हस्तगत केले. त्या क्षणी मला फक्त याचा आनंद झाला की एक चांगली चौकट नशिबाने लाभली! पण हे रक्त जरा ओसरल्यावर जाणीव झाली की ही चौकट बरेच काही सांगते आहे. हा दैवी योग आहे. वाड्याचा आजचा काल, आणि हे आजोबा जे आजच्यासाठी त्याचा काल आहेत, दोघे एकमेकांना नजर न भिडवता आयुष्याच्या चक्रात वाहत आहेत. आजोबांनी न जाणो किती दशके हा वाडा बघितलाय? त्या वाड्याचा तरुणपणीचा दिमाख बघितलाय? वाड्याने देखील आपल्या अंगणात खेळणाऱ्या लहान लहान मुलांना, आपल्या डोळ्यांदेखत वयोवृद्ध होताना बघितलं आहे. आता दोघेही सूर्यास्ताच्या वाटेवर आहेत. सरतेशेवटी सगळ्यांना जायचे आहेच म्हणा..
ही चौकट म्हणजे, कुठेही नोंद होणार नाही असा हा त्या दोघांच्यामधला इतिहास आहे! जो फक्त त्या दोघांनाच ठाऊक आहे. कदाचित त्यामुळेच एकमेकांकडे बघणं टाळत आहेत. ज्या गोष्टीचा तरुणपणी सहवास लाभलेला आहे, त्याचे म्हातारपण बघवत नाही. चालणारे आजोबा चालत आहेत, बघणारा वाडा बघत आहे. बाकीचं विश्व सुद्धा कोणासाठी थांबत नाही हे त्यांना ठाऊक आहे. तरीही त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकातलं एक पान बहुदा माझ्या हाती लागलं असावं!?
अजून ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा..