January 12, 2025
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय पालक स्नेह सम्मेलन – एक मुक्तपीठ !

मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय पालक स्नेह सम्मेलन – एक मुक्तपीठ !

Spread the love

पुण्यातील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वार्षिक पालक स्नेह सम्मेलनाला जायचा योग आला. यापूर्वीही डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याने माझ्या अपेक्षा उंचावलेल्या होत्याच. विद्यार्थ्यांची स्नेह सम्मेलने होतात यात काही नवल नाही पण पालकांचे स्नेह सम्मेलन माझ्यासाठी नवीन होते. एक चांगला उपक्रम याच दृष्टीने मी या सोहळ्याकडे बघत होतो. जेव्हा एका ओळखीच्या व्यक्तीने “पालकांचे स्नेह सम्मेलन घडवून आणणारी ही एकच शाळा असेल नाही?!” असा आश्चर्य वाचक प्रश्न केला तेव्हा मा‍झ्या कडून नकळत “आमच्या शाळेत विद्यार्थ्यांचे स्नेह सम्मेलन व्हायचे हीच मोठी गोष्ट होती. पालक तर लांबच राहिले!” मी उत्तर देऊन गेलो खरा पण विचारांनी मनाभोवती पिंगा घालायला सुरुवात केली आणि एक शब्द मनात उमटला “मुक्तपीठ

मा‍झ्या समोर बसलेले काही पालक इतर पालकांनी सादर केलेले कार्यक्रम कौतुकाने बघत होते. त्यांच्या चेहर्‍यावर “मी तिथे असतो तर?” असे भाव स्पष्ट दिसत होते. स्नेह सम्मेलनात आपणही भाग घ्यावा असे त्यांना वाटत नसेल का? निश्चितच हा विचार एकदा तरी त्यांच्या मनात येऊन गेला असणार. हा विचार मनात येताच समोरच्या मंचावर आपला कार्यक्रम सादर करणाऱ्या पालकांकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसले. “आज आपण नुसते समोर बसलेलो नाही. आज आपल्याला व्यक्त होण्याची संधी मिळालेली आहे, मुक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळालेले आहे.” याचे समाधान दिसले. आणि जाणवले की गोळवलकर गुरुजी विद्यालयातील हे पालकांचे स्नेह सम्मेलन सामान्य स्नेह सम्मेलन नाही तर पालकांना लाभलेले एक “मुक्तपीठ” आहे.

मी कलाकार असल्यामुळे मला या मुक्तपीठाचे महत्व समजणं कठीण आहे. कारण आपापले व्यासपीठ आणि मंच शोधण्यासाठी कलाकार तसा तत्पर असतो. आमच्यासारखे लोक काही ना काही धडपड करत व्यक्त होण्याचे मार्ग शोधून काढतात. आमच्यासाठी ज्या गोष्टी सहज वाटतात त्या सगळ्यांसाठी तशा सहज नसतात, हा साधा तर्क आमच्या दंभित कलाकार मनाला स्पर्ष करत नाही. त्याच क्षणी मी माझा “कलाकाराचा सदरा” उतरवून ठेवला आणि कार्यक्रम पाहू लागलो. हळूहळू हे “मुक्तपीठ” मनाचा ठाव घेऊ लागले, मोठे होऊ लागले, आदरणीय होऊ लागले. मंचावर सादरीकरण करणारे पालक “मुक्त” दिसू लागले.

शाळेत असताना प्रत्येक विद्यार्थी कलाकार नसतो, प्रत्येक कलाकाराला योग्य संधी, मंच, व्यासपीठ तसेच प्रोत्साहन देखील मिळत नाही. काही कलाकार व्यक्त होण्याचे मानसिक बळ गोळा करू शकत नाहीत. काहींना तर आपण कलाकार आहोत, आपल्याही परमेश्वराने काही निराळे दिलेले आहे, याचीच जाणीव नसते. लहानपणापासून काही संकल्पनांनी, भितींनी मनात घर केलेले असते. अशा वेळी स्वतःभोवती न्यूनगंडांचे आणि भयांचे धागे गुंडाळून एक कोसला तयार होतो. जसजसे वय वाढते तसतसे आयुष्याचे अनुभव, जबाबदाऱ्यांच्या चौकटी, या कोसल्यात भर घालतात आणि माणूस तिथेच अडकून पडतो. या कोसल्याला छेद देणं तितकंसं सोपं नसतं.. आणि याच कोसल्याच्या बाहेर येण्याची संधी उपलब्ध करून देणारे हे पालकांचे स्नेह सम्मेलन एक मुक्तपीठ नाहीतर आणखीन काय आहे?

एक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील एक गोष्ट जी निश्चित वाखाणण्याजोगी आहे, ती म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला एखादी theme किंवा विषय! शाळा ही केवळ मुलांना शिकवायची जागा नसून समाजाच्या साक्षरतेचे, निर्मळतेचे केंद्र आहे याचा विसर पडत चाललेला आहे. खरं सांगायचं तर आज समाजाला सांस्कृतिक, वैचारिक आणि अध्यात्मिक पातळीवर पुनःसाक्षर करण्याची वेळ आलेली आहे. सर्व कार्यक्रमांप्रमाणे, याही कार्यक्रमाला एक विषय निवडलेला होता “जुनं ते सोनं“. इतकेच नव्हे तर शाळेकडून या विषयाला धरून कार्यक्रम सादर होतील याची पूर्ण काळजी घेतली गेली. ही गोष्ट व्यवस्थापन आणि कार्यक्रमाचे उद्दिष्ट, दोन्हींच्या दृष्टीने निश्चित चांगली आहे. कलात्मक स्वातंत्र्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते.

तरीही, जोपर्यंत नितीमुल्यांच्या रुळांवरून गाडी धावत आहे तोपर्यंत कलाविष्कार स्वैराचारापासून दूर राहील यात शंका नाही. त्यामुळे सौ. मंजूषा ताईंचे विशेष कौतुक करावेसे वाटते, ज्यांनी ही गाडी रुळ सोडणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली. खरं सांगायचं तर यामुळेच कार्यक्रमाचे मांगल्य, निरागसता आणि दर्जा टिकून राहिला. कार्यक्रम बघत असताना ही गोष्ट सतत जाणवत होती की, पालकांच्या सुप्त गुणांना मुक्त होण्यासाठी योग्य प्रमाणात स्वातंत्र्य दिले गेलेले आहे तसेच सादरीकरणाचे भान देखील राखले गेले आहे. सिनेमातील गाणी, वेगवेगळे सामाजिक विषय घेऊनही एखाद्या कार्यक्रमाचा दर्जा आणि मांगल्य टिकून ठेवणे हे आजकाल अवघड होऊन बसले आहे. हे मोठे अवघड आव्हान शाळेने उत्तम रित्या पेलले. त्याबद्दल पुनः अभिनंदन.

तसं पाहिलं तर एकूण २२ कार्यक्रम या मुक्तपीठावर सादर होणार होते, त्यामुळे वेळ लागणार होता हे निश्चित. पण जुन्या गाण्यांच्या विश्वात गेलो की वेळेचे भान कुणाला राहील? पालकांनी देखील गाण्यांची निवड आणि त्यावर सादर केलेला कलाविष्कार जुन्या आठवणींना उजाळा देणारा होता. साध्या, भोळ्या भाबड्या माणसांचा तो काळ. या कार्यक्रमांच्या निमित्ताने पूर्वीच्या संस्कारांचे, संस्कृतीचे स्मरण झाले. रोज “अपडेट” होणार्‍या जगाने जुन्याकडे, “जुनं ते टाकावू” अशा दृष्टीने बघणं घातक आहे हा विचार वाडा, वाण, तिचा प्रवास, आणि एका आजोबांनी सादर केलेल्या लोक प्रबोधन कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला यात शंका नाही. त्यांना जोड ओव्यांवर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण व अध्यात्मिक विचारांतून प्रबोधन करणारे झग्याचे भारूड!

आत्तापर्यंत वाचकांना हा कार्यक्रम फक्त प्रबोधनासाठी होता की काय अशी शंका येईल. पण, तसे वाटायचे कारण नाही. कारण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे फक्त प्रबोधन नाही तर मनोरंजन देखील आहे, हे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय जाणते हे सर्वांना माहीत असेलच. ५० ते ९० च्या दशकातील अर्थपूर्ण, प्रेम आणि शृंगार रसाने युक्त अशा गाण्यांवरील नुत्ये बघताना आणि एकंदरीतच सगळ्या कार्यक्रमांचे सादरीकरण बघताना जाणवलेली गोष्ट म्हणजे, यातले कैक पालक आयुष्यात पहिल्यांदाच रंगमंचावर इतक्या लोकांच्या समोर उभे आहेत, कलाविष्कार सादर करत आहेत. ही साधी गोष्ट नाही! गाण्यांवर आधारित नृत्ये मग ते गाणे, अशी ही बनवा बनवी मधील “चांदण्यात न्या गं” असो किंवा मिस्टर नटवरलाल मधील “परदेसिया” असो, साधी माणसं मधील “ऐरणीच्या देवा” असो की लम्हे मधील “मोरनी बागा मां” असो, फक्त त्यांच्या कुटुंबीयांना किंवा आप्तेष्टांनाच नव्हे तर स्वतः सादर करणाऱ्या पालकांनाही, आपल्यात हे गुण आहेत, याची अनुभूती येऊन चकित व्हायला झाले असणार. इतकेच नव्हे तर एकाच गाण्यावर वेगवेगळ्या दृष्टीने बघता येते हे त्याचं गण्यावरील नृत्याच्या दोन स्वतंत्र कार्यक्रमांना बघून लक्षात आलेच. कलेची आणि व्यक्त होण्याची ही गम्मत आहे.

चित्रपट संगीत, लोकसंगीत यांच्याबरोबर भारतीय शास्त्रीय संगीत देखील आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा एक भाग आहे. तो वारसा आहे ज्याला आधुनिकि‍करणाच्या वावटळीत एखाद्या पणतीप्रमाणे जपणे गरजेचे आहे. वेळेला साजेसा यमन रागावर बेतलेला शास्त्रीय गाण्यांचा गजरा एक समाधानाची झुळूक घेऊन आला. कैक दिग्गज आणि श्रेष्ठ गायकांचे व संगीतकारांचे स्मरण झाले. अशातच गीत रामायणाचे स्मरण झाले नसते तर कदाचित कार्यक्रमच अपुरा राहिला असता! प्रभू श्रीरामचंद्रांच्या आयुष्यातील क्षण, गीत रामायणाच्या पार्श्वभूमीवर कथक नृत्या द्वारे सादर झाले. यामुळे वातावरणात निर्माण झालेला सोज्वळ व सात्विक भाव शब्दात मांडण्याजोगा नाही. ९० च्या दशकातील वेगवेगळ्या मालिकांच्या शीर्षक गीतांच्या माध्यमातून काही क्षणांपूरते का होईना बालपण पुन्हा एकदा जगता आले. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत.. खरं आहे. मातीतच जर मायेचा आणि संस्कारांचा ओलावा नसेल तर बीजाला अंकुर फुटणार तरी कसे? याचे निश्चित भान शाळेला आहे ही आणखीन सुखावह गोष्ट!

कार्यक्रमाची रूपरेषा चांगली असणे याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या हे कार्य लयास नेणे देखील तितकेच अवघड आहे. मुख्यत: हौशी कलाकारांना घेऊन! व्यावसायिक मंडळी पोटासाठी ज्या गोष्टी करतात त्या गोष्टी अशा कार्यक्रमांतून हौशी मंडळी आनंदासाठी करतात. ते करत असताना काही वेळा मतभेद होणार हे नैसर्गिक आहे. तरीही, ही सगळी उठाठेव कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी केली जाते. ज्याची परिणीती कार्यक्रम बघताना आली जेव्हा प्रत्येक कार्यक्रमाला प्रेक्षक भरभरून दाद देत होते, वन्स मोर च्या मागण्या करत होते! निवेदक सर आणि मॅडम यांनी समर्पक शब्दात, सुयोग्य विचारांत या कार्यक्रमांची मोट बांधून ठेवली होती. निवेदक जर खंबीर, धीराचे आणि समयसूचक नसतील तर कार्यक्रमाची फजिती होते. म्हणूनच की काय त्यांना anchor म्हणतात. त्यांचे देखील कौतुक करणे क्रमप्राप्त आहे.

एकूणच कार्यक्रम यशस्वी झाला हे म्हणताना मला अतिशय आनंद होत आहे. व्यासपीठाचे मुक्तपीठ झाले! तरीही या कार्यक्रमाने काय दिलं? हा प्रश्न कोणी विचारलाच तर त्याला नक्की उत्तर देता येईल की, “ज्या पालकांना आपण कधी मंचावर येऊन काही सादर करू शकू याबद्दल खात्री नव्हती; त्यांना आजन्म पुरतील अशा आठवणी या मुक्तपीठाने दिलेल्या आहेत.” स्वयंप्रेरणा आणि प्रोत्साहनाचा ओलावा मिळाल्यावर या बीजालाही अंकुर फुटतील यात शंका नाही. यावरून या मुक्तपीठाचे महत्व समजून घ्यावे लागेल. ऋग्वेदातील एका उत्तम श्लोकासह, स्वतःचा शोध घ्यायची संधी देणारे हे मुक्तपीठ पालकांना असेच मिळत राहो ही प्रार्थना करतो 🙏

आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतोऽदब्धासो अपरीतास उद्भिदः।
देवा नोयथा सदमिद् वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवेदिवे॥


Loading

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *