बाजार बुणगे .. (गैर) समज
बाजार बुणगे! हे विशेषण राजकारणाच्या कर्दमी वाटांवर वारंवार ऐकायला मिळते. मी देखील बाजार बुणगे हा शब्द लहानपणापासून ऐकत, वाचत आलेलो आहोत. पण, साधारण अर्थ समजला तरीही नेमका अर्थ कधी कळला नाही. ज्या वयात वाचन कमी होते त्या काळी बाजार बुणगे, या शब्दांचा अर्थ समजून घेताना “बाजार” या शब्दावर देखील अधिक जोर दिला. अर्थातच हा शब्द कोणाचे कौतुक करण्यासाठी वापरलेला दिसून येत नाही. त्यामुळे काही काळ माझा बाजार बुणगे म्हणजे दलाल असा झाला होता.
सुदैवाने गेली ५-७ वर्षे इतिहासाचा अभ्यास सुरु असल्याने या शब्दाचा अर्थ तो नाही जो मी समजत होतो हे स्पष्ट झालं. कधी कधी तर जे लोक दुसर्याला बाजार बुणगे म्हणतात त्यांना तरी या शब्दाचा खरा अर्थ माहित आहे का? असा प्रश्न पडतो. असो, या ब्लॉग मध्ये मी बुणगे या शब्दाचा आणि बाजार बुणगे या विशेषणाचा मूळ अर्थ सांगण्याचा आणि पुढे जाऊन त्यांचा उपयोग दूषण म्हणून का करण्यात आला असावा याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करेन.
शब्दार्थ आणि व्युत्पत्ति
बुणगा किंवा काही वेळा बुनगा या शब्दाचे दोन अर्थ शब्दकोषांमध्ये आणि वाङमयामध्ये दिलेले आढळतात.
१. छोटा किंवा बुटका
२. सैन्यातील उदमी किंवा गैर लढाऊ लोक
या दोघांमध्ये दुसरा अर्थ “सैन्यातील उदमी किंवा गैर लढाऊ लोक” या अर्थानेच बुणगे हा शब्द वापरला जातो. यात देखील जेव्हा उदमी हा शब्द वाचतो तेव्हा काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. उदमी म्हणजे उद्योग धंदे करणारे किंवा व्यापारी. यांच्यामध्ये बलुतेदार मंडळी म्हणजे लोहार, सुतार, शिंपी, कासार इत्यादी मंडळी असणे अगदीच नैसर्गिक आहे. कारण सैन्याला या सगळ्यांची वेळोवेळी गरज पडत असते. कमी अधिक फरकाने आजही आजच्या सैन्यामध्ये अशी “सैन्योपयोगी” कामे करणारे लोक असतात. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास केला तर बुणग्यांमध्ये यांचा समावेश असणे अगदीच स्वाभाविक आहे. बाजार बुणगे म्हणजे सैन्यासाठी लागणाऱ्या इतर सामानाची तयारी करणारे असा सरळसावत अर्थ आपण घेऊ शकतो.
आता प्रश्न पडतो की सैन्यामध्ये व्यापार्यांचे काय काम?
इतिहासाचा आणि बखरींचा अभ्यास अशा वेळी उपयोगी पडतो. कवींद्र परमानंद यांनी आपल्या “अणूपुराणांत” गोपीनाथ पंतांनी अफजल खानाकडच्या व्यापार्यांना शिताफीने कसे प्रतापगडावर आणले? हे सांगितले आहे. जेव्हा अफजल खानाच्या परवानगीने रत्नांचे व्यापारी प्रतापगडावर आले. महाराजांनी त्यांच्याकडून रत्ने घेतली आणि त्यांना गडावरच ठेवले. बखरीतला अध्याय असला तरीही, सैन्यामध्ये व्यापारी देखील असत हे दर्शवण्याचा हा प्रयत्न.
ऐतिहासिक संदर्भ आणि उदाहरणे
अशा बुणग्यांचे अनंत ऐतिहासिक संदर्भ देता येतील. उदाहरणार्थ
श्री शिंदेशाही इतिहासाची साधने मधील खालील लेखांक पाहा. (यात बुणगे ऐवजी बुनगे असा उल्लेख केलेला आहे)


श्री शिवाजी महाराजांच्या बखरीतील ३२ व्या कलमात अफजल खानाबरोबर येणाऱ्या खंडोजी खोपडेची यांची हकीकत वाचायला मिळते

याच बखरीत ८३ व्या कलमात महाराजांच्या दक्षिणेकडील स्वारी बाबतीत उल्लेख सापडतो

पुढचा दाखला होळकरांची कैफियत मधील आहे

अशी उदाहरणे वाचल्यावर सैन्यामध्ये बुणग्यांचा समावेश असणे हे काही नवीन नव्हते किंवा काहीच सेनानी आपल्या सैन्यात बुणगे ठेवायचे असेही नव्हते.
इतिहासकारांचा दृष्टिकोन, बदनामी आणि वास्तव
गेल्या काही दशकात, म्हणजे साधारणपणे १८८० च्या नंतर बाजार बुणगे म्हणजे एक प्रकारचे दूषण किंवा निरुपयोगी व्यक्तीचा उल्लेख किंवा कार्यात अडथळा बनलेले लोक, अशी लोकांची समजूत झालेली आहे. याला मूळतः भारतीय इतिहासकारांचा पानिपत युद्धाकडे बघण्याचा दृष्टिकोन कारणीभूत आहे.
हे सांगण्याचा उद्देश असा की अनेक इतिहासकार पानिपतच्या लढाईतील पराभवाला, मराठ्यांच्या सैन्यातील बाजार बुणग्यांच्या भरण्याला देखील जबाबदार ठरवतात. पण इतिहासाचा सारासार विचार करता, एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की लष्कर जर मोठे असेल आणि प्रवास खूप मोठा असेल तर सैन्यात बाजार बुणगे ठेवणे क्रमप्राप्त होते. बाजार आणि बुणगे नसतील तर मोठे सैन्य खूप काळ केवळ स्वतःच्या जीवावर लढू शकत नाही. पेशव्यांना दोष देणारे इतिहासकार काहीही सांगो पण सत्य हेच आहे की बाजारबुणगे यांच्याशिवाय बराच काळ चालणाऱ्या मोठमोठ्या स्वाऱ्या आणि लढाया अशक्य ठरतात.
आता तुम्हाला प्रश्न पडेल असे का? (कदाचित कपाळावर आठ्या देखील पडतील)
आता तुम्हाला माहित नसलेल्या इतिहासातील एक उदाहरण देतो.
श्रीरंगपट्टणच्या स्वारी मध्ये इंग्रज अधिकारी कार्नवालीस नेतृत्व करत होता. बाजार बुणगे या विषयावरून पेशव्यांवर टीका करणारे इतिहासकार इंग्रजांच्या बाजार बुणगे नसलेल्या, सुटसुटीत आणि जिंकताना मिळालेल्या लुटीवर पुढे जाणाऱ्या सैन्याचे कौतुक करताना दिसतात. या श्रीरंगपट्टण च्या स्वारीमध्ये कार्नवालीसने, आपण जिंकून लुटलेल्या शस्त्राचा आणि इतर सामानाचा वापर करून पुढे जाऊ असा विश्वास ठेवून कूच केले. पण स्वारीत त्याला अपयश येत गेले. इतपत वेळ आली की त्याच्या सैन्याची खायची भ्रांती झाली. शेवटी परशुरामपंत पटवर्धन जे आपल्या सैन्याबरोबर बाजार बुणगे बाळगत, त्यांनी अडीचशे मेल जाऊन कार्नवालीसच्या सैन्याला खायला देऊन जगवलं.
यावरून हे लक्षात येतं की, सैन्यात फक्त लढाऊ लोक किंवा सैनिकच नव्हे तर या बुणग्यांची सुद्धा आवश्यकता असते.
इतकेच नव्हे तर परदेशातही सैन्यामध्ये बाजार बुणगे असत हे सत्य आहे. अर्थातच त्यांना वेगळं काहीतरी म्हणत असावेत. १४ व्या शतकातील इंग्रज विरुद्ध स्कॉटिश युद्धाचे वर्णन पाहा.

माझ्या मते आत्तापर्यंत मी बुणगे किंवा बाजार बुणगे या शब्दांचा खरा अर्थ समजावण्यात आणि इतिहासाबद्दल असलेल्या काही गैरसमज दूर करण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असेन अशी आशा करतो.
ही माहिती आवडली असल्यास शेअर करून अनेकांपर्यंत पोहोचवा!
इतर रोचक ब्लॉग्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा.