साटं-लोटं आणि मराठी
लहानपणापासून साटं-लोटं हा शब्दप्रयोग कानावर पडत आलेला आहे. माझ्या मते प्रत्येक मराठी माणसाने कधी ना कधी हा “साटं-लोटं करणे” हा वाक्प्रचार उपयोगात आणलेला आहे किंवा ऐकलेला आहे. मी सर्वप्रथम “साटं-लोटं” शब्दप्रयोग ऐकला तो लग्नाच्या बाबतीत. माझ्या नातेवाईकांमध्ये एका कुटुंबात असे झालेले आहे. दोन कुटुंबातील मुलामुलींचे विवाह एकमेकांच्या कुटुंबात होणे म्हणजे साटं-लोटं! थोडक्यात एका कुटुंबातील एका मुलाने दुसऱ्या कुटुंबातील मुलीशी लग्न केले आणि त्याच वेळेस पहिल्या कुटुंबातील मुलीने दुसऱ्या कुटुंबातील मुळाशी लग्न केले की त्याला “साटं-लोटं” केलं असं म्हणतात. आता प्रश्न येतो की हशब्दप्रयोग आला कुठून? याचा इतिहास काय? व्युत्पत्ति काय आहे? भरपूर शोधल्यानंतर काही धागे दोरे हाती लागले ज्यावरून साटं-लोटं च्या व्युत्पत्तिची उकल होते. हीच शब्दयात्रा आहे आणि आपण सगळे शब्दयात्री!
“साटं” असा वेगळा शब्द जेव्हा मराठीत शोधला तेव्हा फार काही सापडलं नाही. ऐतिहासिक दस्तऐवज, पत्रे, ग्रंथ यात देखील साटं-लोटं हा शब्दप्रयोग वाचायला मिळत नाही. त्यामुळे हा शब्दप्रयोग निश्चितपणे अर्वाचीन असला पाहिजे. मराठीच्या अनेक वाटा धुंडाळल्यानंतर थोडं शेजारच्या घरी डोकावून बघितलं आणि अहो साक्षात्कार झाला! शेजारी म्हणजे “गुजराती”. मराठी आणि गुजराती या सख्ख्या शेजारणी. वारंवार राजकीय भांडणे समोर आणली जात असली तरीही, या दोघींमध्ये मुक्त संवाद होत असतो! तेव्हा संशोधन करताना गुजरातीच्या घरी साटं या शब्दाची उकल झाली तो अशी..
साटं-लोटं ची व्युत्पत्ति
गुजराती भाषेत साटु म्हणजे अदलाबदली किंवा विनिमय. (साटानो करार म्हणजे विनिमयाचा करार) गुजरात व्यापार आणि उदीम यांसाठी प्रसिद्ध. आधी म्हटल्याप्रमाणे मराठी आणि गुजराती सख्ख्या शेजारणी असल्याने एकमेकींच्या भाषेचा प्रभाव एकमेकींवर होणे यात काहीही अनैसर्गिक नाही. पटत नसेल तर खालील शब्दांचा इतिहास बघा लफडा, फाफडा, साकर (गुजराती मध्ये साखर), कचोरी इत्यादी. त्यामुळे साटु शब्दाचे एक रूप साटं मराठीत येणं यात काही विशेष वाटण्यासारखं नाही. आणि मराठीने आपल्या भाषिक तोऱ्यात साटं ला लोटं जोडलं असेल तर ते ही विशेष नाही. कारण काही-बाही, पोरं-बिरं, काळं-बिळं इत्यादी निरर्थक पुरवणी शब्द मराठीत सर्रास वारपले जातात. जेव्हा कधी अशा प्रकारचे विवाह होत असतील तेव्हा बोली भाषेत सरळ त्याला साटं किंवा देवाणघेवाण म्हणण्यापेक्षा साटं-लोटं असा जोडशब्द वापरणं अधिक पसंत केलं असावं!
जाता जाता थोडी अधिक माहिती देतो, मराठीत, गुजराती साटं शब्दावरून साटणे म्हणजे सर्व माल घाऊक विकत घेणे हा शब्द निर्माण झालाय. हा देखील एक अर्वाचीन शब्द आहे.
तसेच राजकरणात देखील जर दोन गट, पक्ष किंवा कुटुंबे यांच्यामध्ये एकमेकांचे हितसंबंध जपण्यासाठी कुठला करार झाला तर त्याला साटं-लोटं म्हणतात. बऱ्याचदा याचा उपयोग वाईट अर्थानेच केला जातो किंवा त्यात एक प्रकारचे व्यंग किंवा कटाक्ष असतो!
आता, अनेकांना माहित आहे की विवाह हा पूर्वीपासून राजकारणाचा देखील एक भाग आहे. पूर्वीच्या काळापासून आपल्या मुलीने किंवा मुलाने कुणाशी लग्न करायचे हे कुटुंब ठरवत असे. त्यात काहीसा सामाजिक विचार असे आणि काही राजकीय. राजकीय विचार करण्यासाठी राजकारणीच असले पाहिजे असे नव्हे हे इथे आवर्जून सांगावेसे वाटत आहे. कारण आपण सगळेच कधी ना कधी राजकारण म्हणजे कूटनीती वगैरे वापरतो. हे पूर्वीपासून घडत आलेले आहे आणि हा मानवी स्वभाव आहे.
हे फक्त भारतातच घडतं का?
पण, एक गोष्ट जी सांगणं गरजेचं आहे ती म्हणजे राजकारणाचा भाग असला तरीही आपल्या मुलीच्या भल्यासाठी लोक असे करतात.. अजूनही! भारतीयांना इतर अनेक गोष्टींप्रमाणे ही गोष्ट देखील फक्त भारतातच घडते असे वाटते. मी सांगू इच्छितो असे अजिबात नाही. आधी नमूद केल्याप्रमाणे हा मानवी स्वभाव आहे, समाजाचे मानसशास्त्र आहे. मुळात लग्न किंवा विवाह हेच मुली राजकारणासाठी जगभरात होत आलेले आहेत हे इतिहासाची थोडी फार जाण असणाऱ्यांना माहित असेल. साटं-लोटं फक्त भारतीय समजत होतं असं म्हणणाऱ्यांसाठी युरोपातील एक ठळक उदाहरण देतो.
१२ एप्रिल १३८५ रोजी जॉन द फिअरलेस या बरगंडीच्या (John the Fearless, Duke of Burgundy) अत्यंत प्रभावी फ्रेंच सरदाराने राजकारणाचा भाग म्हणून बव्हेरिया च्या सरदाराच्या मुलीशी म्हणजे मार्गारेटशी (Margaret, daughter of Count Albert I of Holland) लग्न केले, त्याचबरोबर आपल्या बहिणीचे मार्गरेटचे लग्न बव्हेरियाच्या सरदाराच्या मुलाशी म्हणजे विल्यमशी लावून दिले.
तेव्हा कुठलेही गैरसमज बाळगू नका आणि हा व्युत्पत्ति विषयक ब्लॉग आवडला असेल तर लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा!
आणखीन रोचक इतिहासविषयक ब्लॉग्स इथे वाचा.