“नेणीव म्हणजे काय?” हा एक पुरातन पण महत्वाचा प्रश्न आहे. अनेक अतार्किक वाटणाऱ्या प्रश्नांची आणि अनुभूतीच्या देखील पलीकडच्या अमूर्त अस्तित्वाची उकल या प्रश्नाच्या गर्भात दडलेली आहे. खरं तर नेणीव म्हणजे जाणिवेची शून्यता किंवा जाणिवेचा अभाव अशी सरळसोट व्याख्या आहे. पण, इतकेच सांगून नेणिवेच्या बोटाला अगर पदराला धरून चालता येईल असे नाही. कारण नेणीव म्हणजे बुद्धाच्या गोष्टीतील हत्तीप्रमाणे आहे. आपण सगळे आंधळे आणि केवळ आपल्या संवेदनांच्या आधारे तिच्या एकेक अंगाची फक्त लक्षणे सांगू शकतो. बाकी खरे ज्ञान तर आत्मज्ञानच आहे. आणि त्याच्याद्वारेच नेणिवेबद्दल चिंतन होऊ शकते. या ब्लॉगमध्ये मी नेणीव या शब्दाचे अध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून संदर्भ देणार आहे. तसेच माझे स्वतःचे नेणिवेबद्दलचे चिंतन देखील मांडणार आहे.
पुढे जाण्या आधी ज्या गोष्टीबद्दल अध्यात्मिक संत, गुरू आणि मानसशास्त्र त्यांचे एकमत आहे ते म्हणजे जाणीव आणि नेणीव या प्रत्यक्षात मनाच्या अवस्था किंवा मनाचेच दोन भाग आहेत.
नेणीव आणि अध्यात्म
अध्यात्मिक चिंतनाच्या प्रदेशात जाणीव आणि नेणीव यांच्याबद्दल विवेचन ऐकायला मिळते ते मुख्यत्वेकरून अद्वैत सिद्धांताच्या वाटेने निर्गमन करणाऱ्या संतांकडून. त्यांच्या रचनांचा आणि सारांशाचा अभ्यास केला तर ठळकपणे जाणीव – नेणीव यांच्याबद्दल त्यांचे दोन मुख्य अभिप्राय आलेले दिसतात.
१) आत्मरूपाची, परमात्म्याची जाणीव
२) मी पणाची “मायारूपी भौतिक अस्तित्वाची” जाणीव
यातील पहिल्या अभिप्रायावर संतांचा अधिक भर दिसतो कारण त्यांचे विवेचन मुख्य करून आत्मरूपाच्या शोधाकडे घेऊन जाणारे आहे. तरीही दुसऱ्या अभिप्रायाची देखील काही उदाहरणे आहेत ज्यांचा संदर्भ माणसाच्या भौतिक अस्तित्वाशी जोडलेला आहे.
आत्मरूपाची, परमात्म्याची जाणीव
कोणत्याही मराठी माणसाचा नेणीव या शब्दाशी पहिला संपर्क येतो तो श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या खालील ओवीमधून
“जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा”
तसेच त्यांच्या भावार्थदीपिकेच्या १८ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी बोलणे न बोलणे, जाणीव नेणीव यांच्याही नेणिवेच्याही पलीकडे आहे.
न बोलणेंहीं न बोलौनि। तैं बोलिजें तोंड भरूनि ।।
जाणीव नेणीव नेणोनि। जाणिजें तैं।।१८-१२१४ ।।
किती वेगळी अनुभूती आहे.. नेणिवेची देखील नेणीव! हे फक्त चिंतन आणि साधनेद्वारेच अनुभवता येणे शक्य आहे.
त्याचप्रमाणे नेणिवेबद्दल इतर अनेक संतांनी आपले विचार मांडलेले आहेत उदाहरणार्थ
संत एकनाथ महाराज म्हणतात
जाणीव नेणीव हे वाड । कल्पनेचे समूळ झाड । तुझे तुजचि आड । उभे ठाकती ।।
नानां हेतु विंवेचना । सांडूनिया कल्पना । एकाजनार्दना । शरण रिघे
जाणीव नेणीव भगवंती नाही । विज्ञान जे तेहि लया जाय ॥
आणि
सर्वे कर्म भावे विठ्ठळ नामा गावें ॥ जाणिवे नेणिवेचे हावें पडू नये ॥
तर संत नामदेव महाराज म्हणतात
जाणीव नेणीव तरीच शोभे सर्व । जरी होय अयुर्भाव वैराग्याचा
आणि
चहूंचें बोलणें सहाचें नेणिव ॥ अठराची जाणीव केची तेथें ।।
आणि मृत्युंजयस्वामी म्हणतात
जंव विपरीत ज्ञान न सुटे । अज्ञानें नेणीव न तुटे ।
ज्ञानरूप अदटे । उरते आपण आपें ॥
तर मुकुंदराज म्हणतात
जाणिवा नेणिवा । दोही विरहित भावां ॥
दोही बीजां ओलावा | विस्तारिता तो ॥
अदटे म्हणजे निष्प्रभावी होणे, निरुपाय होणे.
श्री समर्थ रामदास स्वामीं नी नेणिवेबद्दल जितके विवेचन केलेले आहे तितके क्वचितच कोणत्या साधूंनी अथवा संतांनी केलेले असेल. दासबोधाचे समास च्या समास केवळ जाणीव आणि नेणीव यांच्या चिंतनाबद्दल आणि त्यांच्या लक्षणांबद्दल मांडलेले आहेत. त्यांचे मुख्य विवेचन मूळमाया आणि तिच्या गुणांच्या अवलोकानाभोवती फिरते. अगदी सोप्या आणि ढोबळ अर्थाने सांगायचे झाले तर मूळमाया म्हणजे सर्व चराचर सृष्टीच्या मर्मस्थानी असणारी चेतना. ज्या प्रमाणे निराकार आकाशात जसा वायू विचरण करतो त्याचप्रमाणे मूळमाया देखील देहात आणि देहाच्या सर्व अवस्थांत विचरण करते. ज्याप्रमाणे वायूचे वाहणे जिवंतपणाचे लक्षण आहे त्याचप्रमाणे मूळमायेचा संचार जाणिवेचे लक्षण आहे. त्याच्या विपरीत ज्याप्रमाणे वायूचे थांबणे मृतावस्था असते त्याचप्रमाणे मूळमायेचे थांबणे म्हणजे नेणीव! समर्थांनी जाणीव नेणीव मिश्रित मनाच्या एकूण तीन अवस्था आणि त्यांचे गुण सांगितलेले आहेत. जाणीव – सत्वगुण, जाणीव नेणीव मिश्रित रजोगुण आणि नेणीव – तमोगुण.
दासबोधातील नवव्या दशकातील (गुणरूप) सहाव्या समासात (गुणरूपनिरूपण) मूळमाया आणि जाणीव नेणिवेबद्दल फार सुंदर विवेचन आहे. त्यातील काही पंक्ती देत आहे. पण वाचकांनी दासबोधातील हा संपूर्ण समास नक्की वाचावा.
॥ श्रीराम ॥
आकाश जैसें निराकार । तैसा ब्रह्माचा विचार । तेथें वायोचा विकार । तैसी मूळमाया ॥ १ ॥
हें दासबोधीं असे बोलिलें । ज्ञानदशकीं प्रांजळ केलें । मूळमायेंत दाखविलें । पंचभूतिक ॥ २ ॥
तेथें जाणीव तो सत्वगुण । मध्य तो रजोगुण । नेणीव तमोगुण । जाणिजे श्रोतीं ॥ ३ ॥
म्हणाल तेथें कैंची जाणीव । तरी ऐका याचा अभिप्राव । पिंडीं माहाकारण देहीं सर्व । साक्षिणी अवस्था ॥ ४ ॥
तैसी मूळप्रकृती ब्रह्मांडींचें । देह माहाकारण साचें । म्हणोन तेथेंजाणीवेचें । अधिष्ठान आलें ॥ ५ ॥
असो मूळमायेभीतरीं । गुप्त त्रिगुण वास करी । पष्ट होती संधी चतुरीं । जाणावी गुणक्षोभिणी ॥ ६ ॥
जाणीव म्हणिजे जाणतें चळण । तेंचि वायोचें लक्षण । वायोआंगीं सकळ गुण । मागां निरोपिलें ॥ १९ ॥
म्हणोन जाणीवनेणीवमिश्रीत । अवघें चालिलें पंचभूत । म्हणोनियां भूतांत । जाणीव असे ॥ २० ॥
कोठें दिसे कोठें न दिसे । परी तें भूतीं व्यापून असे । तिक्षण बुद्धी करितां भासे । स्थूळ सुक्ष्म ॥ २१ ॥
पंचभूतें आकारली । भूतीं भूतें कालवलीं । तरी पाहातं भासलीं । येक स्थूळ येक सूक्ष्म ॥ २२ ॥
वरील दिलेल्या विवेचनात नेणिवेचे स्वरूप हे आत्मज्ञानाच्या जाणीव नेणिवेशी संबंधित आहे हे उघड आहे. आता याच नेणीवेबद्दल भौतिक अर्थासंबंधी विवेचन पाहू.
मी पणाची “मायारूपी भौतिक अस्तित्वाची” जाणीव
माणसाला आत्मज्ञान नसले की तो मायेला सत्य आणि भौतिकाला सत्व मनू लागतो. आणि त्यातून निर्माण होते अज्ञान आणि अज्ञानामुळे अहंकार! ज्याप्रमाणे आत्म्याच्या जाणिवेची गरज आहे त्याचप्रमाणे संसारात जगत असताना देखील वास्तविकतेचे भान असणे गरजेचे आहे. ते नसेल तर माणूस अज्ञानाच्या आणि अहंकाराच्या वाटेने जाऊन स्वतःची फसगत करून घेतो. एक सोपे उदाहरण देतो म्हणजे माझे पुढील विवेचन समजायला मदत होईल.
समजा स्व. लता दीदींना किंवा स्व. पंडित भीमसेन जोशींना कोणी “अमुक स्वर असा लावावा किंवा तमुक राग असा गावा” असे सांगू लागला असता तर आपण त्या सांगणाऱ्याला चक्क “मूर्ख” म्हटलो असतो. हो ना? याचे कारण त्याचे सांगणे नसून तो कोणाला सांगत आहे याबद्दल त्याच्या अज्ञानात आहे! हीच वास्तविकतेची नेणीव..
संत मुक्तेश्वरांनी आपल्या मुर्खांच्या लक्षणात याची फार सुंदर उकल दिलेली आहे.
मी श्रेष्ठ श्रेष्ठाचा कुमर । धरी विद्येचा अहंकार ।
सुज्ञ सुविद्या न करी नर । तो शतमूर्ख जाणावा ॥ १ ॥
साखरेतें स्वादिष्ट करणें । कर्पुरातें सुवास देणें ।
चतुरपुरुषातें शिकविणें । हेचि नेणिव सांगतिया ॥ २ ॥
आणि खालील अभंगात संत एकनाथ महाराज नेणीवेचे एक निराळे रूप दाखवतात जिथे या सत्याच्या जाणिवेच्या अभावामुळे जडलेले अज्ञान आणि “मी पण” यांमुळे कशी आत्मिक फसगत झाली..
जाणीव फेडा जाणीव फेडा । जाणिवेनें वेडा लावियेलें ॥१॥
नेणपणें मज होता जो भाव । जाणीवेनें कैसें मज नागविलें ॥२॥
नेणपणें मी सर्वांसी मानी । जाणीव येतां कोण्हा न मानी ॥३॥
जाणीण नेणीव नेणेंचि कांहीं । एक जनार्दनीं लागला पायीं ॥४॥
इथे महाराज म्हणतात जाणीव फेडा! म्हणूनच मी नेणिवेच्या अध्यात्मिक विवेचनाचे दोन भाग केले कारण. वरील भागात जाणिवेला सात्विक, योग्य आणि इष्ट मानले गेले आहे. तर खालील अभंगात चक्क जाणीव सोडण्याची गोष्ट आहे. पण वाचकांनी दिशाभूल करून घेऊ नये. खालील अभंगात संत एकनाथ महाराज जाणीव म्हणजे “मी पणाच्या” जाणिवेबद्दल बोलत आहेत. एकदा हे ध्यानात ठेवले की अभंग सुकर होऊन जाईल.
एव्हाना वाचकांना नेणीव म्हणजे काय? या प्रश्नाचे अध्यात्मिक संदर्भातून उत्तर मिळाले असावे अशी आशा करतो! (नसेल तर कृपया कंमेंट्स मध्ये प्रश्न विचारू शकता)
आता “नेणीव म्हणजे काय?” या प्रश्नाचे मानसशास्त्राच्या दृष्टीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू.
नेणीव आणि मानसशास्त्र
जाणीव नीणिवेसंदर्भात गॉल, फ्लोरेन्झ, बुइलो, हॉल्ट आणि हार्टमन इत्यादी मानसशास्त्रज्ञ मंडळींनी बरेच संशोधन केलेले आहे. यात मुख्यतः अबोध मनाच्या विश्लेषणाचा भाग येतो! यांच्यात अग्रक्रम लागतो सिग्मन्ड फ्रॉईड यांचा. मानसशास्त्रज्ञांनी मनाचे दोन प्रमुख भाग केलेले आहेत. Conscious आणि Unconscious Mind किंवा सबोध आणि अबोध मन! यालाच आपण जाणीव आणि नेणीव असे म्हणतो.
स्टॅन्ले हॉल म्हणतात की सबोध किंवा जाणिवेने युक्त मन म्हणजे हिमनगाचे पाण्याच्या वर दिसणारे अंग आहे. त्या हिमनगाचे दडलेले अंग म्हणजे अबोध मन. त्यांच्या मते माणसाच्या जाणिवांचे मूळ स्रोत शोधले तर ते या अबोध मनातील तरंगांमध्ये सापडतील. फ्रॉईड देखील हेच सांगतात की तार्किक मनाच्या मागे अतार्किक मन दडलेले असते. थोडक्यात मनात जे अमूर्त, अतार्किक आणि अबोध असे सूक्ष्म तरंग उठतात त्यांच्या स्पंदनांमधून नेणीव जन्म घेते. नेणिवेच्या लहरी जाणिवेच्या प्रदेशात येण्याचा प्रयत्न करत असतात.
सिग्मन्ड फ्रॉईड च्या मते माणसाने झाकलेल्या किंवा प्रयत्नपूर्वक दाबलेल्या ज्या काही लैंगिक भावना असतात त्यांच्या मूलभूत अनुभवांच्या सूक्ष्म विस्फोटात नेणिवेचे मूळ आहे. आपल्या तार्किक किंवा अतार्किक जाणिवांची रीघ मागे मागे ओढत गेलो तर तिथे यांचे मूळ सापडेल.
नेणीव म्हणजे..
एक गोष्ट मला इथे प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे वाचकांना सांगायची आहे. नेणीव म्हणजे काय? या प्रश्नावर मी अनेक वर्षे चिंतन करत आहे. अगदी सिग्मन्ड फ्रॉईड चे लिखाण वाचण्याआधी पासून. कारण “नेणिवे”शी माझा संपर्क आधी संत साहित्यामुळे आला. आणि त्यानंतर “माझ्या कवितेच्या जन्माविषयी माझे आकलन” हा दुसरा आवडता विषय. त्यामुळे माझे विचार सिग्मन्ड फ्रॉईड शी अल्प प्रमाणात मिळते जुळते आहे. पण, माझे चिंतन संपूर्णपणे माझे आहे. यात कुठल्याही संत विचाराचा आणि मानसशास्त्रीय प्रमेयांचा आधार घेतलेला नाही. कारण प्रत्येक अनुभववादी माणसाला आपल्या वाटा आणि वाटेवरून मागुते आलेल्या पाऊलवाटा स्वतःच चाचपडून बघाव्या लागतात!
तसेच जाणीव-नेणिवेबद्दल बोलत असताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मानसिक जाणीव सापेक्ष आहे. संवेदशील माणसात या प्रखर असू शकतात. त्यामुळे कधी कधी अशा लोकांचे बोलणे सामान्य लोकांना अतार्किक वाटू शकते!
मूळतः मी एक हाडाचा कवी आहे. म्हणजे असे की मी कविता “लिहीत” नाही, कविता माझ्यात कुठेतरी “घडते” आणि मी केवळ तिला एक मूर्त स्वरूप देतो. त्यामुळे जाणीवपूर्वक “कविता लिहिण्याचा” मी कधी प्रयत्न केला नाही आणि करत देखील नाही. सुचलं तर सुचलं, नाही तर नाही असे माझे आणि कवितेचे नाते आहे. त्यामुळे माझी कविता तिचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. माझा प्रामाणिकपणा इतकाच की ती घडते तेव्हा तिला जन्म देण्यासाठी माझ्या शब्दांची ओंजळ मी करतो.
आता कवितेच्या या उद्गमाविषयी जेव्हा मी विचार करू लागलो, तेव्हा असे लक्षात आले की, माझ्या कवितेचे दोन ठळक रंग आहेत. एक रंग तिने अनुभवसिद्ध, इंद्रिये आणि संवेदनांच्या विश्वातून उचललेला आहे. त्या कागदावर जन्म घेतल्यावर जेव्हा ते शब्द डोळ्यांखालून जातात तेव्हा त्यांच्या जन्माचा कार्यकारणभाव अनुभवाच्या रूपाने दिसून येतो, “जाणवतो”
याचे एक छोटे उदाहरण खाली देत आहे. सकाळी पुण्यात चालत असताना, कचरा घेऊन जाणाऱ्या एका दीनवाण्या माणसावर कुत्री भुंकत होती आणि लोक त्याला टाळून दुरून जात होते. त्या माणसाचा मी फोटो काढला. आणि तो फोटो काढल्या काढल्या काही ओळी दाटून आल्या ज्या मी उतारवूं घेतल्या. या कवितेच्या बाबतील हे मी निश्चित सांगू शकतो की मानवी जाणिवेतून स्फुरलेली ही कविता आहे. जिचे मूळ अनुभव, मानवी आयुष्याबद्दल जाणीव आणि पंचेंद्रिये यांच्या समीकरणात आहे.
पण कधी कधी काही ओळी एखाद्या उल्केप्रमाणे मनात चमकून जातात. त्यांचा वेग आणि आयुष्य इतके कमी असते की काही समजायच्या आत त्यांचा अस्त झालेला असतो. अशा वेळी मन बेभान होऊन त्या उल्केच्या वाटेवर जाते आणि तिच्या तुटण्याच्या जागेपासून ते तिचा जिथे असत झाला त्या जागेपर्यंत प्रवास करते. यात मनाला शब्द दिसत नाहीत, अनुभवसिद्धता पडताळून बघता येत नाही आणि पंचेंद्रियांची चौकट मांडता येत नाही. कारण जे काही घडते ते Abstract, अमूर्त, अशब्द, अव्यक्त आणि अतार्किक असते. ते घडत असताना मनाच्या जाणिवांना त्याचा यत्किंचितही थांगपत्ता लागत नाही. किंबहुना ती घडतेच अशा ठिकाणी जिथे जाणीव, तर्क, कारण, मीमांसा या गोष्टींच्या अस्तित्वाचा लवलेश देखील नसतो. काहीच नसते! फक्त एक पोकळी जिथे ही गोष्ट, हे स्फुरण स्वयंभू ध्वनिप्रमाणे जन्म घेते. याला मी “नेणीव” म्हणतो आणि जिथे या उल्का जन्म घेतात तो नेणिवेचा प्रदेश. मन या नेणिवेच्या प्रदेशात त्या उल्केचा माग घेत घेत अपरिहार्यतेमुळे आपल्या जाणिवांचा आधार घेऊन तिच्या मुळे निर्माण झालेल्या अनुभूतीला शब्दात मांडण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी त्याचे सामर्थ्य मिळते मूलाधारातून. तिथे सगळ्यात प्रथम या उल्केच्या सूक्ष्म स्फोटाची अशब्द, अव्यक्त प्रतिमा उमटते. पुढे मेंदूपर्यंत जाणारा प्रवाह वाटेत मूर्त स्वरूपासाठी लागणारी सामग्री गोळा करत जातो. आणि अखेर त्या मूलाधारातील प्रतिमेला मूर्त किंवा शब्दरूप मिळतं. तेव्हा कविता जन्म घेते आणि या सगळ्याचा मुख्य कारक म्हणजे मन. इथे मन आणि मूलाधार यातला फरक लक्षात घेतला पाहिजे.
मन एखाद्या संगीतकाराप्रमाणे आहे ज्याला काही सांगायचे आहे आणि मूलाधार वादक आहे ज्याला संगीतकाराच्या सांगण्याचे पृथक्करण करून संगीताच्या निर्मितीचे मूळ निर्माण करायचे आहे. त्या उल्केचे किंवा नेणिवेच्या प्रदेशातून आलेल्या अमूर्त आलापांचे मनावर उमटलेले ठसे आणि शब्दांत केलेले त्याचे वर्णन यात तफावत कवीला देखील जाणवत असते. पण त्याचा देखील निरुपाय असतो. त्यामुळेच कदाचित काही वेळा कवीला जे जाणवलं ते वाचकांना जाणवेलच याची खात्री देता येत नाही.
माझ्या काही कवितांची मीमांसा करताना मला हा प्रदेश दिसतो आणि त्यांचे आलाप दिसतात.. माझ्यापुरते! जिथे अनुभव, जाणीव आणि इंद्रिये यांचे आधार घेऊन कविता जन्म घेते पण तिथे मूळ दुसरीकडेच कुठेतरी आहे.
या नेणिवेच्या आलापांना जाणिवांच्या प्रदेशातील शब्द देऊन देखील त्या नेणिवेतील गंगोत्रीची अनुभूती करून देणारी फार अप्रतिम उदाहरणे मला माझ्या लाडक्या कवींच्या रचनेत मला सापडतात. अर्थात हे माझे आकलन आहे. इतरांची मते भिन्न असू शकतात. तशी खूप उदाहरणे आहेत पण त्यातील काहीच देता येणं इथे शक्य आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलीं यांच्या “मोगरा फुलला, मोगरा फुलला” किंवा “विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले” या रचना
कवी ग्रेस यांच्या “भय इथले संपत नाही” किंवा “तुला पाहिले मी” या रचना
आरती प्रभू यांची “ये रे घना” ही रचना किंवा त्यांचीच “अजगर” ही कादंबरी
त्याचप्रमाणे सुहास शिरवळकर यांच्या “जाई” कादंबरीतील जाई!
आणखीन एक उदाहरण ज्याने मला कायम प्रभावित केलेले आहे. ते म्हणजे रामानुजन यांनी अंतिम समयी सांगितलेली समीकरणे! त्यांचे म्हणणे होते की ही समीकरणे त्यांना कशी सुचली माहित नाही. त्यांची “देवी” त्यांना ही समीकरणे सांगत आहे आणि ते शब्दात मांडत आहेत. ही नेणीव नाही तर आणखीन काय आहे?
या सगळ्यांमध्ये एक धागा सामान आहे की शब्द जाणिवांचे असले तरीही या सगळ्यांच्या मुळाशी कार्यकारणभाव नाही केवळ एक तर्करहित अंतर्ज्ञान (Logicless Intuitions) आहे. जिथे व्यक्तीला देखील “असे का घडले किंवा घडत आहे?” याचे उत्तर जाणिवांच्या आणि अनुभूतींच्या माध्यमातून देखील देता येत नाही. अनुभूती देखील नेणिवेच्या एक पायरी वर आहे. कारण अनुभूतीच्या मुळाशी देखील अनुभवांचे गाठोडे पडलेले असतेच.
इथे मला श्री मद्भगवद्गीतेतील एक श्लोक आठवतो
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्य: परं मन: |
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे: परतस्तु स: || ३.४२ ||
सृजनशील आणि संवेदनशील मन जाणिवेच्या प्रदेशातून नेणिवेच्या शून्य प्रदेशाकडे सतत आशेने बघत असते. कारण, कधी उल्का दिसेल याचा नेम नाही! ती लोप पावण्याआधी झेलण्याचा प्रयत्न मन करत असते. या प्रदेशात जे काही घडते त्याला तर्कशुद्ध शब्दात आणि संपूर्ण मूर्त स्वरूपात मांडणे अशक्य आहे. त्यांची कारणमीमांसा आणि कार्यकारणभाव हाताशी लागणे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे मी नेणिवेच्या प्रदेशात घडणाऱ्या घटनांच्या उगमांना “दैवी समीकरणे” म्हणतो.
मुक्तांगण मध्ये मी माझ्या मनातले विचार मुक्तपणे आणि प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न करतो. यातील इतर ब्लॉग वाचण्यासाठी या लिंक वर क्लीक करा. इथे संपूर्ण यादी आहे.