October 28, 2025
अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग- भावार्थ

अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग- भावार्थ

Spread the love

अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥१॥
मी तूंपण गेले वायां ।पाहतां पंढरीचा राया ॥२॥
नाही भेदाचें तें काम ।पळोनि गेले क्रोध काम ॥३॥
देही असोनि विदेही ।सदा समाधिस्त पाही ॥४॥
पाहते पाहणें गेले दूरी ।म्हणे चोखियाची महारी ॥५॥

कोणताही रसिक मराठी माणूस जेव्हा “अवघा रंग एक झाला” हे शब्द स्मरतो किंवा वाचतो तेव्हा चटकन मनात घुमतो तो म्हणजे स्वर्गिय किशोरीताई आमोणकर यांचे स्वर. लहानपणापासून या अभंगाची ओळख किशोरीताईंच्याच स्वरांनी होत राहिलेली आहे. ही त्यांची साधना आहे की या अभंगातली आर्तता तसूभरही कमी झाली नाही उलट संपूर्ण रूप घेऊन समोर आली. 

हा अभंग संत सोयराबाई यांचा. त्या मानाने कमी परिचित (अभ्यासू भक्तांसाठी संत सोयराबाई अपरिचित नाहीत!) पण तरिही शब्द, कर्म आणि भक्ती यांचा परमोच्च बिंदू गाठणाऱ्या संत सोयराबाई, एक श्रेष्ठ संत, पांडुरंग भक्त आणि संत चोखामेळा यांच्या पत्नी व शिष्या होत्या. महार समाजात जन्माला आलेल्या संत सोयराबाई आणि त्यांचे यजमान म्हणजेच संत चोखामेळा यांना अनेक यातना, उपेक्षा आणि प्रसंगी प्रतारणा देखील भोगाव्या लागल्या.

इथे एक सांगणं माझं कर्तव्य आहे. काळ कुठलाही असो, अधर्म हा अधर्मच राहतो ही सनातनची शिकवण आहे (म्हणूनच सनातन) त्यामुळे आज का होईना पण माझ्याकडून संत सोयराबाई आणि संत चोखामेळा यांची चरणवंदना करून समस्त समाजाने केलेल्या अत्याचारांबद्दल माफी मागतो आणि संतांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहील ही प्रार्थना करतो. हा अभंग समजून घेताना, हे नुसते शब्द नाहीत तर जीवनातील अनुभवांचे देखील प्रतिबिंब आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे.

“अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥”

उद्घोषातच संत सोयराबाईंनी त्यांच्या मनाची अवस्था प्रकट केलेली आहे. अवघा म्हणजे मजजवळ असलेले सर्व काही.  आता रंग म्हणजे फक्त इंग्रजीत ज्याला colour म्हणतो तोच अर्थ नाही. या वाक्याचा दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ समजून घेता येऊ शकतो. 

सरळसोट अर्थ घ्यायचा झाला तर, माझा सर्व रंग, म्हणजे अस्तित्व एक झाला कारण या रंगांत श्रीरंग म्हणजेच परमेश्वराचा निवास झालेला आहे! पण आणखीन वेगळ्या पद्धतीने पाहिलं तर रंग या शब्दाचा संस्कृतमध्ये आणखी एक अर्थ म्हणजे रंगमंच (theatre) देखील होतो. म्हणजे आपण या पंक्तीचा असाही आस्वाद घेऊ शकतो की संत सोयराबाई जणू स्वतःला आणि जमलेल्या/ऐकणाऱ्या सगळ्यांना उद्देशून म्हणत आहेत की हा संबंध परिसर, वातावरण आता सर्व भेदाभेद विसरून एक होऊन त्याच्यामध्ये एकच तत्त्व उरलेले आहे ते म्हणजे श्रीरंग म्हणजे विष्णू किंवा विठ्ठल! 

पूर्वीच्या काळी संत मंडळी कीर्तन करीत, आपले अभंग लोकांसमोर गात असत त्यामुळे बऱ्याचदा जमलेल्या विठ्ठल भक्तांना उद्देशून देखील त्यांनी लेखन केलं असावं हे माझं मत आहे. कीर्तनात समोरच्या व्यक्तींना सामील करून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद हाच उत्तम मार्ग आहे.

आणखी एक अर्थ जो मला सुचला तो म्हणजे रंग हा शब्द रूप या अर्थाने देखील वापरण्याची पद्धत आहे. संत सोयराबाई ज्या समाजातील होत्या त्या समाजाला जवळजवळ टाकाऊ समजले जात असे, अस्वच्छ समजले जात असे. गरिबीत आयुष्य जगणाऱ्या या लोकांच्या दिसण्यावरून देखील कुचेष्टा केली गेली. त्यामुळे कदाचित त्या कुचेष्टा करणाऱ्यांना उद्देशून तर संत सोयराबाई अभिमानाने हे म्हणत नसाव्यात ना की ‘माझे रंग रूप कसेही असले, मी कशीही दिसत असले तरीही आता यात विठ्ठलाचे रूप दिसू लागेल’ ? संतांच्या शब्दांचे अनेक अर्थ निघू शकतात! 

“मी तूंपण गेले वायां । पाहतां पंढरीचा राया ॥”

ज्यांना संत साहित्याची थोडीफार माहिती आहे त्यांच्यासाठी, पहिली पंक्ती तशी समजायला सोपी आहे.  मी तूंपण म्हणजे भेदाभेद. वास्तविक वारकरी हे विष्णुभक्त आणि अद्वैत सिद्धांताचे पुरस्कर्ते. अद्वैत सिद्धांतानुसार संपूर्ण चराचर सृष्टीचा आत्मा एकच आहे आणि तोच परमात्मा आहे. त्यामुळे जर सर्व आत्मा एक आहे तर यात मी आणि तू या भेदाचे काय काम? तर हा भेदाभेदविचार संपला असं संत सोयराबाई म्हणतात. पण केव्हा? .. पाहतां पंढरीचा राया!

अनेक जणांना यात नवल वाटणार नाही. पांडुरंगाला पाहिल्यावर ही अवस्था होणं स्वाभाविक आहे. पण, आधीच नमूद केल्याप्रमाणे संत सोयराबाईंचे शब्द हे असेच आलेले नाहीत त्यांच्यामागे अनेक दुःख आणि यातना दडलेल्या आहेत. जातीने महार असल्यामुळे संत सोयराबाई आणि संत चोखामेळा याना पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश निषिद्ध होता! कल्पना करा, ज्याचे तुम्ही भक्त आहात, ज्याला बघण्याची आस दिवसरात्र लावून ठेवलेली आहे त्याचे दर्शन घ्यायची परवानगी तुम्हाला नाही! आता पाहतां पंढरीचा राया या शब्दांमागील आर्तता व करुणा तुमच्या लक्षात येईल. हे दुःख त्यांचे यजमान संत चोखामेळा यांनी देखील

“उंभरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन” 

या शब्दांत मांडलेले आहे! आता तुमच्या लक्षात येईल की फक्त दर्शनाने संत सोयराबाईंच्या मनाची ही अवस्था कशी झाली असेल. करुणेने भरलेले हे शब्द!

“नाही भेदाचें तें काम । पळोनि गेले क्रोध काम ॥”

आधी सांगितल्याप्रमाणे वारकरी संप्रदाय आणि आपली संत मंडळी अद्वैत सिद्धांत मानणारे असल्याने. जर सर्वाभूती आत्मा एकच आहे तर यात भेदाभेद कुठून आला. अस्तित्वाच्या वेगवेगळ्या व्याख्यांनी माणसामाणसात आणि सजीव-निर्जीव यांच्यात भेदाचे, वेगवेगळे करण्याचे काम केलेले आहे. हे संत सोयराबाई सांगतात.

या शब्दाचा एक अर्थ असाही होतो की आधीच्या पंक्तींचा साधारण जर अर्थ पहिला तर मी-तू पण जाणे हे जो भेदाभेद करतो किंवा त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे काम नाही! संत तुकाराम म्हणालेच आहे

“येरागबाळ्याचे काम नोहे !” 

त्यामुळे भेदाभेदाची ही भावना संपुष्टात आली/येते जेव्हा, क्रोध आणि काम पळून गेले किंवा संपुष्टात आले/ नाहीसे झाले. क्रोध म्हणजे राग आणि काम म्हणजे वासना, हव्यास, एखादी गोष्ट आपल्याला हवी ही भावना. थोड्या प्रासादिक अर्थाने मी या पंक्तीला षड्रिपु मानतो. थोडक्यात षड्रिपुंचा नाश झाला आणि भेदाभेद नष्ट झाले! कारण षड्रिपु नाहीत म्हणजे माणूस स्थितप्रज्ञ झाला.

“देही असोनि विदेही । सदा समाधिस्त पाही ॥”

ही पंक्ती म्हणजे परमेश्वराची थोरवी. देही असोनि विदेही म्हणजे देहात असूनही विदेही म्हणजे देहाच्या अस्तित्वाच्या जाणिवेचा लावलेष नसणे. थोडक्यात देहाच्या कुडीतून मुक्ती, निर्विकार-निर्गुण अशी अवस्था. हे म्हणजे निःशंक परमेश्वराचेच वर्णन. ज्याला संत सोयराबाई सदा समाधिस्त बघत आहेत. थोडक्यात हा परमेश्वर, देहात (चर सृष्टीत) असूनही विदेही आहे आणि सदैव त्यांच्यामध्ये स्थिर, अचल आणि संपूर्ण मूळ रूपात आहे!

“पाहते पाहणें गेले दूरी । म्हणे चोखियाची महारी ॥”

या अभंगात एक गोष्ट तर नक्की झाली की हा अभंग म्हणजे, आपल्या ईष्टदेवतेचे, पांडुरंगाचे दर्शन घडल्यावर संत सोयराबाईंच्या मनाची अवस्था आहे. एकदा परमेश्वराचे रूप पाहिले की जगात आणखीन बघण्यासारखे काय उरते? हे ही लक्षात घेण्याजोगं आहे की पूर्वीच्या काळी जोपर्यंत माणूस स्वतः एखादी वस्तू किंवा जागा बघत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल फक्त वर्णनच ऐकावं लागत असे. संत चोखामेळा आणि संत सोयराबाई अनेकदा पंढरपूरला गेले असणार आहेत, कारण दोघांवर संत नामदेव यांचा स्नेह होता. पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन नाही! असे कैक वेळा घडले असणार आहे. 

त्यामुळे ज्याचे रूप बघण्याची आस होती ते पाहिल्यानंतर आता बघण्यासारखे जगात काहीही उरलेले नाही म्हणजेच “पाहते पाहणें गेले दूरी” ते जे काही पाहणे राहिलेले होते ते आता संपूर्ण झाले. म्हणे चोखियाची महारी. पतिव्रता आणि पतिभक्त संत सोयराबाई स्वतःला संत चोखामेळा यांची महारी (महार वरून महारी) म्हणत असत. कारण संत सोयराबाई संत चोखामेळा यांच्या फक्त पत्नीच नव्हे तर शिष्या देखील होत्या! 

तर हा संत सोयराबाई यांचा “अवघा रंग एक झाला” या अभंगाचा मला समजलेला अर्थ.. पांडुरंग, पांडुरंग!  

Click to rate this post!
[Total: 5 Average: 4.2]

6 thoughts on “अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग- भावार्थ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *