कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी अनेक अन्योक्ति रचल्या त्यांच्यापैकी एक अत्यंत प्रसिद्ध अन्योक्ति म्हणजे “कोकिलान्योक्ति”. संस्कृतप्रचुर मराठी म्हटलं की काही हिमालयासम उत्तुंग नावे प्रकर्षाने मनात येतात त्यांच्यापैकी मोरोपंत, वामन पंडित, स्वातंत्र्यवीर सावरकर, आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर. अर्थातच ही यादी इथे संपत नाही पण ही हिमालयाची शिखरे आहेत हे मराठीचा रसिक नक्कीच मान्य करेल. आपल्या गंगोत्रीचा हात धरून ज्यांनी मराठीला आपल्या वाङ्मयीन अंगणात आणले, एखाद्या कृष्णवेलीसारखे जातं केले, संगोपन केले, कधी लाड केले आणि मस्तकावर ठेवले त्यांच्यापैकी एक म्हणजे चिपळूणकर शास्त्री. या महान लोकांची नावे घेतली तरीही मराठी शुभ्रवसना शारदेचे रूप घेऊन समोर आल्यासारखी दिसते आणि मुखातून आपोआप “वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्” ही पंक्ती येते.
अन्योक्ति शब्दालंकार मराठीला नवीन नव्हता पण त्याला जेवढी प्रसिद्धी कृष्णशास्त्री चिपळूणकरांमुळे मिळाली तेवढी क्वचितच कुणामुळे मिळाली असेल. अन्योक्ति हा अन्य आणि उक्ति या दोन शब्दांची संधी आहे. जेव्हा कोणाला त्याच्या मूळ गुणधर्माचा आधार करून विरोधाभासी उपदेश करायचा असेल किंवा उक्ति करायची असेल तेव्हा ती अन्योक्ति होते. थोडक्यात लेकी बोले, सुने लागे. संस्कृतमध्ये सांगायचे झाल्यास “सा सहोक्तिः सहार्थस्य बलादेकं द्विवाचकम्।” एखाद्या गोष्टीच्या गुणविशेषाचा उपयोग करून त्याच्या नैसर्गिक क्रियेच्या विरुद्ध (दुसराच) अर्थ सांगणारी रचना.
कोकिलान्योक्ति, ही कोकिळेला उद्देशून रचलेली अन्योक्ति आहे ज्याच्या मुळाशी गेल्यास मानवी स्वभावाचे स्वप्नाळू रूप, निष्ठुर समाजाचे मानसशास्त्र आणि एक करूण प्रार्थना हे स्पष्टपणे दिसतात. वस्तुतः कोकिळेने मंजुळ गावे आणि लोकांनी ते ऐकून आनंदी व्हावे हा सामान्य नियम आहे. पण अशी कल्पना करू की कोकिळा जिथे गात आहे तिथे जर त्या गाण्याचे महत्त्वच कुणाला कळत नसेल तर? त्या कोकिळेचे गाणे व्यर्थ जाईलच पण तिला निराशा देखील पदरी पडेल. त्या निराशेपासून वाचवण्याची धडपड कवी करत आहे!
कोकिलान्योक्ति कडे वळण्याआधी एक प्राचीन सुभाषित वाचूया..
अस्यां सखे बधिरलोकनिवास भूमौ
किं कूजितेन किल कोकिल कोमलेन |
एते हि दैवहतकास्तदभिन्नवर्ण
त्वां काकमेव कलयन्ति कलानभिज्ञा ||
कवी म्हणतो की हे सखे कोकिळे, या प्रदेशात बहिरे राहतात तू (इथे) कोमल स्वरात का गात आहेस? हे विवेकशून्य अभागी लोक तुझ्या वर्णाकडे बघून तुला कावळा समजतील इतके हे कलेपासून अनभिज्ञ आहेत!
तसेच आणखीन एक सुभाषित वाचनात येते..
रसालशिखराSSसीना: शतं सन्तु पतत्रिणः |
तन्मञ्जरीरसाSSमोदबिन्दुरेव कुहूमुखः ||
म्हणजे आंब्याच्या झाडाच्या शिखरावर शेकडो प्रकारचे पक्षी येऊन बसतात पण, कोकिलाचं एक असा पक्षी आहे जो आंब्याच्या रसाने आणि सुगंधाने मंत्रमुग्ध होऊन कोमल कुहूकुहू स्वरात गातो.
कृष्णशास्त्री चिपळूणकरांची कोकिलान्योक्ति, या शुभाषितावर आधारित आहे की नाही किंवा आहे तर किती आहे हे सांगणे कठीण आहे कारण सुभाषिते आणि काव्यातील दोन कडव्यांच्या खूप जवळचा संबंध येतो. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे चिपळूणकर शास्त्रींनीं आपल्या काव्यात समाजाच्या निष्ठुरतेचे आणखीन विस्ताराने वर्णन केलेले आहे. जे त्याकाळच्या भारतीय समाजाला उद्देशून होते असे म्हटले तरी अयोग्य ठरणार नाही.
आता आपण कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची कोकिलान्योक्ति पाहूया
[वसंततिलका]
येथे समस्त बहिरे वसताति लोक
कां, भाषणे मधुर तूं करिशी अनेक ?
हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक
वर्णनावरून तुजला गणतील काक
[शार्दूलविक्रीडित]
या माळावरि वृक्ष एकहि नसे, बाळा खुळ्या कोकिला
येथें मंजुळ शब्द काढूनि गळा कां शोषिशी आपुला ?
जेथे बोल अमोल वाटति तुझे, तो देश, बा वेगळा
तेथें आम्र फुलोनि गंध विखरे चोहिंकडे आगळा
[पृथ्वी]
वसंतसमयीं फुले, परिमळें दिशा व्यापि जो
जयास अवलोकुनी सुरतरूहि चित्तीं थिजो
तया सतत सेविती विहग आम्रवृक्षा किती
परी पिकचि एकला मधुर वाणि लाघे कृती
[शार्दूलविक्रीडित]
कां, बा सुस्वर काढिशि पिका ? राहें उगा, काळ हा
लोटतों तरुकोटरीं लपुनियां कोठें तरीही रहा
पानें तीव्र हिमें गळोनि दिसती झाडें जळाल्यापरी
गर्जे कर्कश शब्द थोर करुनी काकावली त्यांवरी
पहिल्या कडव्यात कवी कोकिळेला उद्देशून म्हणत आहे की रे कोकिळा इथे सगळे बहिरे राहतात तू कशाला गात आहेस? हे मूर्ख आणि विवेकशून्य लोक तुझ्या वर्णनावरून तुला कावळा समजतील. याचा मानवी आयुष्याशी संबंध जोडला तर उपदेश असा आहे की हे मनुष्या तू कितीही चांगले सांगायचं प्रयत्न केलास तरीही इथे सगळे बहिरे आहेत, अविवेकी आहेत. ज्यांना तुझे बोलणे समजणार नाही. उलट तुझ्या विचारांपेक्षा तुझ्या दिसण्याकडे ते बघून तुझा पाणउतारा करतील कमी लेखातील. हा समाज योग्य व्यक्तींचा अपमान करणारा आहे!
दुसऱ्या कडव्यात, पहिल्या कडव्याचा आधार घेऊन कवी म्हणतो की, हे कोकिळा तू अशा देशात गात आहेस जिथे वृक्ष नाही फक्त भकास माळरान आहे. तू उगाच या माळरानात गौण कंठशोष करून घेत आहेस. तसेच तुझ्या गाण्याचे जिथे मोल ओळखले जाईल तो प्रदेश वेगळा आहे. तिथे खारोबर आम्रवृक्ष फुलतात आपला गंध पसरतात. मानवी अनुभव आणि समाज यांचा संबंध जोडायचा झाल्यास हे नक्की म्हणता येईल की कवी म्हणत आहे, रे मनुष्य तुझ्या विचारांसाठी ही जागा योग्य नाही, इथे समर्पक व्यासपीठ देखील नाही, लोक ऐकायला देखील तयार नाहीत, मग तू उगाच का बडबड करत आहेस? तुझ्या विचारांना मोल मिळावे, ऐकून घ्यावे असे तुला जे वाटत आहे तो प्रदेश – समाज वेगळा आहे. तो इथे नाही! तिथे तुझ्या विचारांना ऐकले जाईल, व्यासपीठ देखील दिले जाईल!
तिसऱ्या कडव्यात कोकिळेमुळे आपल्या सुगंधाने अलौकिक वृक्षालाही भुलावं घालेल अशा आम्रवृक्षाला कोकिळेमुळे कसे खरोखर सौंदर्य मिळते याचे वर्णन केलेले आहे. त्या आंब्याच्या झाडावर कितीतरी पक्षी येऊन बसतात. पण त्या आंब्याच्या रसाचे आणि सुगंधाचे खरे मोल कुणाला जर कळत असेल तर ती कोकिळा आहे! त्याचप्रमाणे या जगात कितीतरी लोक येतात आणि जातात. समर्थ म्हणतात तसे “किती एक ते जन्मले आणि मेले” पण ज्याला आयुष्याचा खरा अर्थ समजला तेच या जगाला निर्मल आणि सुंदर बनवू शकतात. ती क्षमता फक्त अशा मनुष्यांमध्ये असते!
चौथ्या कडव्यात कवी म्हणतो हे कोकिळा इथे कोणत्याही प्रकारे तुझ्यासाठी जागा आणि काळ योग्य नाही. तुला आपला गप्प बसून कुठेतरी लपून राहा. नाहीतर उगाच स्वतःचा पाणउतारा करून घेशील. लोकांचे बोल ऐकावे लागतील. तुझ्या कर्कश आवाजाने ही झाडे शिशिरात ज्याप्रमाणे सुकलेली पाने गाळून पडल्यावर जशी शुष्क जळाल्यासारखी आणि भकास दिसतात तशी दिसत आहेत! मानवी रूपात पाहिलं तर कवी म्हणत आहे की तू कशाला सुंदर स्वरांत गट आहेस बाबा? त्यापेक्षा कुठेतरी लपून बस, बोलू नकोस. जगणे निर्भत्सलेल्या योग्य माणसासारखी तुझी झालेली अवस्था मला बघवणार नाही. खरोखर, योग्य माणसाला दुःख भोगावे लागणे म्हणजे फार करूण दृश्य आहे. जणू काही आत काहीतरी जाळून जात आहे, जे जे काही शिव आणि शुचि आहे ते ते शुष्क होत आहे. जिवंतपणा सारून जात आहे!
खरंच असे दुर्दैव कुणाचा वाट्याला येऊ नये.. अरसिकेषु कवित्व निवेदनं, शिरसी मां लिख, मां लिख, मां लिख!
एका अभागी समाजात योग्य माणसाची जी अवस्था होऊ शकते त्याचे अत्यंत वास्तवादी पण करूण वर्णन कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी या कोकिलान्योक्ति मध्ये केलेले आहे. कोकिलान्योक्ति कडे अनेक दृष्टिकोनातून बघता येऊ शकते उदाहरणार्थ अरसिक जगात उत्तम कलाकार, निराश किंवा कुंठित विचारांनी ग्रस्त समाजात विचारवंत इत्यादी! आपापल्या परीने आपण या कोकिलान्योक्ति कडे बघून समजून घेऊ शकतो. कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या इतर अन्योक्ति देखील प्रसिद्ध आहेत. येत्या काही दिवसात त्यांच्याबद्दलही विवेचन करू.
हा ब्लॉग आवडल्यास नक्की पोहोचवा. मराठी भाषेचे सौंदर्य आणि श्रीमंती सर्वदूर पसरायला मदत करा!