ही झेन कथा आहे एशुन नावाच्या झेन शिष्येची. कथा छोटी आहे पण मानवी मनाच्या भित्रेपणाबद्दल, स्वतःची फसवणूक करण्याबद्दल आणि सत्यनिष्ठतेबद्दल बरंच काही सांगणारी आहे. कथा अशी..
एका झेन मठात, अनेक शिष्य जमत असत. एकदा झालं असं की एके वर्षी त्या झेन मठात २० पुरुष शिष्य आणि एकच स्त्री शिष्या होती. ती शिष्या म्हणजे “एशुन”! एशुन एक अत्यंत सुंदर आणि मोहक तरुण स्त्री होती. झेन पंथात स्त्रियांचे देखील वपन करतात. ते वपन करूनही एशुनच्या सौंदर्यात काही फरक पडला नव्हता. त्या मठातील जवळजवळ सगळेच पुरुष शिष्य तिच्यावर लपून प्रेम करत. त्यांना तिच्याबद्दल आकर्षण वाटायचे.
एकदा त्या पुरुष शिष्यांपैकी एका झेन शिष्याने तिला प्रेमपत्र लिहिले. त्यात खालील मजकूर होता
“एशुन, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला कधी एकांतात एखाद्या खाजगी ठिकाणी भेटशील का?”
एशुन, ते पात्र वाचते पण उत्तर देत नाही. एशुन ही झेन पंथाची कट्टर शिष्या होती. झेन पंथात स्त्री पुरुष यांनी शारीरिक दृष्ट्या जवळ येण्यावर बंधने आहेत. त्याप्रमाणे एशुन वागत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी झेन मठात गुरूंचे प्रवचन झाल्यानंतर, एशुन आपल्या जागेवरून उठली. तिच्या हातात ते प्रेमपत्र होतं. एशुन सगळ्यांच्या समोर गेली आणि ज्याने ते पात्र लिहिले होते त्याला उद्देशून म्हणाली,
“तुझे माझ्यावर जर खरोखर प्रेम असेल तर आत्ताच्या आत्ता इथे ये आणि मला कवेत घे. मला आलिंगन दे!”
अर्थात शिष्यांमधून कोणीच आले नाही!
तात्पर्य:
झेन पंथ वास्तव जसे आहे तसे स्विकरण्याची दीक्षा देतो. हे वास्तव कोणते रूप घेऊन तुमच्या समोर येईल सांगता येत नाही. प्रेम, जरी त्या मठात अपेक्षित नसले तरी देखील, ते वास्तव आहे या नात्याने त्याला स्विकारायला जर कोणी पुढे येत नसेल तर झेन काय कळणार? जो पर्यंत आपण आपल्या वास्तवाला भले ते कितीही लाजिरवाणे, वाईट इत्यादी असो, मान्य करत नाही तोपर्यंत आपण स्वतःला फसवत राहू!
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.