ही एक फार जूनी कथा आहे, एका माणसाला त्याच्या बायकोचे भूत दिसत असे. तर झालं असं की.. एक तरुण बायको आजारामुळे मरणासन्न झालेली होती. तिचे तिच्या नवऱ्यावर अतोनात प्रेम असते. जेव्हा तिला जाणीव होते की, मरण जवळ येऊन ठेपलेली असते तेव्हा ती नवऱ्याला सांगते,
“माझे तुमच्यावर अतोनात प्रेम आहे. मला तुम्हाला सोडून जायचं नाहीये आणि तुम्ही देखील माझ्यापासून दूर जाऊ नका. मला वचन द्या की, मी गेल्यावर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवणार नाही. जर तुम्ही वचन मोडलंत तर मी भूत होऊन तुमचा पाठलाग करेन आणि तुम्हाला खूप त्रास देईन!”
काहीच दिवसांनी बायको वारते. नवरा तिला दिलेल्या वचनाचे पालन करायचा प्रयत्न करतो. पण, साधारण तीन महिन्यांनी त्या माणसाची एका स्त्रीशी गाठ भेट घडते. त्यांचे एकमेकांवर प्रेम जडते आणि लगेचच ते लग्न करतात. पण, लग्न केल्याकेल्या त्याच्या पहिल्या बायकोचे भूत त्याच्या स्वप्नात येते आणि त्याला वचनभंग केल्यामुळे वाईट साईट बोलते.
हे भूत हुशार असते. नवऱ्याला त्रास द्यायचा एक वेगळा मार्ग हे भूत शोधून काढते. असा की, नवरा आणि बायकोमध्ये जे घडले असेल ते सगळं काही, हे भूत त्या नवऱ्याला ऐकवत असते अगदी तंतोतंत. इतकेच काय तर त्या नवऱ्याने आपल्या नव्या बायकोसाठी जर काही भेटवस्तू आणली असेल तर त्याचेही वर्णन हे बायकोचे भूत अगदी तपशीलवार करत असे. कधीकधी तर ते भूत आधी सांगून झालेल्या घटना पुन्हा पुन्हा सांगत असे. या सगळ्या प्रकारामुळे, त्या माणसाची झोप उडाली. या सगळ्या प्रकाराचा त्याला भयंकर त्रास होऊ लागला आणि त्याचा परिणाम त्याच्या वैवाहिक जीवनावर होऊ लागला.
शेवटी एका मित्राने त्याला गावाबाहेर राहणाऱ्या एका झेन गुरूंना भेटून त्यांचा त्यांचा सल्ला घ्यायला सांगितले. मित्र लगेच झेन गुरूंना भेटायला त्यांच्या आश्रमात गेला. त्या माणसाची हकीकत ऐकून झेन गुरूंनी टिप्पणी केली,
“तर, तुझी निवर्तलेली बायको आता भूत झालेली आहे आणि तिला तू जे काही करतोस त्याची आधीच माहिती मिळालेली असते. तू जे काही बोलणार असशील, करणार असशील त्याबद्दल या भूताला आधीच समजलेलं असतं.. हुं .. म्हणजे एकंदरीत हे भूत हुशार आहे म्हणायचं. खरं तर तू त्या भुताच्या हुशारीचे कौतुक केले पाहिजेस.”
झेन गुरूंच्या चेहऱ्यावर शांत स्मित होते. ते उद्गारले,
“असो. आता पुढच्या वेळी जर तुझ्या बायकोचे भूत तुला दिसले तर त्याला थोडं आव्हान दे. तिला सांग की खरंच जर तुला मी जे करतोय ते सगळं माहिती असेल तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. जर माझ्या प्रश्नाचे तू योग्य उत्तर दिलेस तर मी नवीन बायकोचा त्याग करेन आणि आजन्म एकटा राहीन”
“कुठला प्रश्न विचारू मी गुरूजी?” माणसाने गुरूंना विचारले
गुरू शांतपणे म्हणाले
“तुझ्या हातात भरपूर दाणे घे आणि त्या भुताला तुझ्या हातात किती दाणे आहेत ते विचार. जर त्या भुताला उत्तर देता आलं तर, ते भूत दुसरं तिसरं काहीही नसून तुझ्या मनाचा भ्रम आहे हे सिद्ध होईल आणि इथून पुढे ते भूत तुला कधीही त्रास देणार नाही”
दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा ते भूत माणसाला दिसले. भूत दिसल्यावर माणसाने बायकोच्या भुताचे कौतुक करायला सुरुवात केली आणि त्याने भुताला विचारले
“तुला सगळं काही माहित आहे ना?
“अर्थात!, मला हे ही माहित आहे की तू एका झेन गुरूंना भेटायला गेला होतास..” भुताने उत्तर दिले
“आता तुला एवढं सगळं माहित आहे तर..” दाण्यांनी भरलेल्या हाताची मूठ पुढे करत माणसाने भुताला प्रश्न विचारला, “माझ्या हातात किती दाणे आहेत सांग?”
कोणीही उत्तर दिले नाही आणि ते भूतही गायब झालेले होते!
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..