November 8, 2024
कावळे

कावळे

Spread the love

गॅलरीतून बाहेर डोकावलं तेव्हा झाडामध्ये फडफड होताना दिसली. काही कावळे तोंडात मांसाचा भलामोठा तुकडा असणाऱ्या कावळ्याला, वेढून बसले होते. आपल्या तीक्ष्ण नजरेने जणू ते धमकी देत होते. त्यांच्या त्या बघण्याची मला नेहमीच भीती वाटत आलेली आहे. कारण मी एका कावळ्याने दुसऱ्या कावळ्याला ठार मारताना बघितलेलं आहे. वेढ्यातल्या प्रत्येक कावळ्याला त्या तुकड्यामधला हिस्सा हवा होता. माझ्या मनात प्रश्न चमकला की, जर या कावळ्यांनी हा मांसाचा तुकडा मिळवलेला नव्हता तर ते त्याचा हिस्सा कसा मागू शकतात? ही तर सरळ सरळ गुंडगिरी झाली! मला त्या कावळ्याचं वाईटही वाटलं आणि थोडा रागही आला. कारण त्याने जर या कावळ्यांना हिस्सा दिला नाही तर ते कावळे याला मारून टाकायलाही देखील पुढेमागे बघणार नाहीत. मग का हा मूर्ख कावळा आपल्या चोचीत पकडून बसलाय? पण दुसऱ्या बाजूने हाही विचार मनात आला की एवढ्या कष्टाने मिळवलेला हा मांसाचा तुकडा त्याने इतक्या सहजासहजी का सोडावा? मला मिळालेले पैसे मी असे सहज कुणाला घेऊन देईन का? मी विचार करत होतो आणि इतर कावळे त्या बिचाऱ्या कावळ्याला चोचीने मारत होते, पंखाला पायाला ओढून पडायचा प्रयत्न करत होते. मी विचार करत होतो माणसं आणि कावळे सारखेच.. 

ऑफिसवरून आलो तेव्हा सूर्यास्त नुकताच झालेला होता पण, अंधार झालेला नव्हता. बुडणारा सूर्य मी कॅबमधून बघितलेला होता. सामान्य लोकांना किती माहित आहे, माहित पण पुण्याच्या लकडी पुलावरून सूर्यास्त चांगला दिसतो. फक्त त्या पुलावरून चालणाऱ्यांच्या धक्क्यांना, फाटकी गोधडी किंवा घोंगडी घेऊन आयुष्याबरोबर अंगावरही काळी पुटं चढलेल्या माणसांना आणि मुठा नदीतून येणाऱ्या गटारासारख्या वासाला सहन करता आलं पाहिजे. असो.. कॅबमधून आलो. तसा मी हल्ली रोजच कॅबने ऑफिसला जातोय. मला दुखापत झाली आहे हे पाहिलं कारण आणि रस्ता अत्यंत गजबजाटीचा आहे हे मनात ठेवलेलं कारण.

पण, मी जरी गाडी चालवत नसलो तरी गाडीच्या खिडक्या उघड्या असतातच! या खिडक्यांच्या मर्यादीत चौकटींमधून मला रोज नवनवीन चेहरे दिसले, तरी घटना तशाच दिसतात. म्हणजे कलाकार वेगळे पण पात्र तीच आणि नाटकही तेच! माझ्या लहानपणापासून आजपर्यंत जो एक मोठा फरक पुण्यात झालेला मला रोज जाणवतो तो हा की, लोकांना इतकं वखवखायला झालंय काय? प्रत्येकाला लवकर पोहोचायचं असतं? इतकी घाई की लोक दुसऱ्यांच्या तर सोडाच पण स्वतःच्याही जीवाची पर्वा करत नाहीत! कोणीही कुणाशीही शब्द शांतपणे बोलत नाही. आपल्याखेरीज जगात इतरही लोक आहेत याचा विचारदेखील सध्या कुणाच्या डोक्यात नाही. जवळपास प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या विवंचनेत दिसतो, स्वतःवर किंवा दुसऱ्यावर चिडलेला असतो. मला तर हल्ली प्रत्येक माणूस फक्त एक बेट न वाटता त्या बेटावरचा ज्वालामुखी वाटतो जो कुठल्याही क्षणी फुटू शकतो आणि कुणालाही भस्म करू शकतो. 

नेहमीप्रमाणे आजही रस्त्यावर दोन तीन ठिकाणी बाचाबाची बघीतली. वास्तविक पूर्वी फक्त “काय हे? बघून चालवा की!” एवढेच शब्द कानावर पडायचे आणि चूक करणारा चूक मान्य करायचा आणि दोघे आपापल्या वाटेने निघून जायचे. आज दोघांपैकी कुणालाही आपलं चुकलं आहे हे मान्यच नसतं. प्रत्येकाला वाटतं की त्याचंच बरोबर आहे आणि प्रकरण हमरी तुमरी वर येतं. सध्या तर एका झटक्यात लोळवता येतील असली मुलंही अरेरावी करतात. कोणालाही वयाचा मुलाहिजा राखण्याचा आणि अदबीने वागण्याचा वेळच नाहीये. खरं सांगायचे तर संस्कारच नाहीयेत.

बस चालवणारा पॅसेंजरवर डाफरत असतो, कॅबवाला दुचाकीवर  विचकवत असतो, दुचाकीस्वार रस्त्यांबरोबर फूटपाथदेखील आपल्या तिर्थरुपांचा असल्यासारखे असतात आणि पायी चालणाऱ्यांनाच दम देत असतात, पोलीस हताश तर कधी निर्विकार चेहऱ्याने हे सगळं बघत असतात. रस्त्याच्या कडेला उघड्यावर संसार थाटलेली माणसे, त्यांची शेम्बडी उघडीवाघडी बाळे आणि त्यांच्याचपैकी काहींनी चौकाचौकात हातात घेतलेल्या वस्तू! त्या मुलांचं गाडीच्या मागे धावत जावून रस्त्यावरचे पैसे गोळा करणं. त्यांच्याचपैकी आपलं एखादं नागडं भावंडं घेऊन भीक मागणं. लोकांनी त्यांना झुरळासारखं झटकणं. त्यांच्यातील मुलींकडे वासनेने भरलेल्या त्या नजरा. कधी कधी वाटतं  मुळांसकट  काढावेत. पण माझ्या मध्यमवर्गीय नीतिमत्तेला अनुसरून मी याकडे कानाडोळा करतो. 

दररोज अशी किती प्रकारची माणसं दिसतात. चिडणारी, भुंकणारी, गुरुगुरणारी, सहन करणारी, त्रास देणारी. पण या सगळ्या काळाच्या चक्रात प्रत्येकाला पंख मिळाले आहेत ते स्वार्थाचे. कोणीही कुणालाही जुमानत नाही घाबरत नाही. दुसऱ्याची निंदा करायला मागेपुढे बघत नाहीत, पाय खेचण्याला “करावंच लागतं” या कारणाचा मुलामा चढवलेला असतो. काही जणांना दुसऱ्याचं नुकसान झालं हे जाणून घेण्यातच रस असतो. पैसा, वासना, लोभ या त्रिशुळाने आजच्या माणसाच्या बुद्धीला असा काही छेदला आहे की आता त्यात सद्सद्विवेकबुद्धीला तोंड लपवायला देखील जागा सापडत नाही. 

प्रत्येक लाचार माणूस मला त्या अडकलेल्या कावळ्यासारखा दिसतो. त्याच्याच आजुबाजूचे त्याला फाडून खायला देखील कमी करायचे नाहीत! मग प्रश्न पडतो की मी रस्त्यात जे बघितले ती माणसे होती की कावळे?

वळणावळणांवर तटून बसलेले
टोकदार चोचींचे आणि
धूर्त नजरांचे कावळे …

काही पडत्याला हसणारे
काही न पडत्याला पाडणारे
काही मारून खूष होणारे
काही खूष होऊन मारणारे कावळे …

काही दुःखात सुखाचा शोध घेणारे
काही सुखात दुःख मागून घेणारे
काही हताश होऊन रडणारे
काही हताश करून हसणारे कावळे …

काही पोटाच्या भुकेने आसुसलेले
काही डोळ्यांच्या भुकेने वखवखलेले
एका तुकड्यासाठी हपापलेले
काही मध्यस्थालाच ठार मारणारे कावळे …

काही काचेमागे दडणारे
काही उघड भांडणारे
काही कागदांशी खेळणारे
काही मनाशी खेळणारे कावळे …

ईंचाईंचावर प्रश्न विचारणारे
प्रत्येक उत्तराला दात दाखवणारे
शंकांचं वादळ उठवणारे
कोणाकोणाला पुरता उठवणारे कावळे …

सगळीकडे मुखवटे घातलेले
टपून बसलेले कावळे …

रोज संध्याकाळी घरी येताना
मी आणि माझी थकलेली सावली
मोजदाद करतो की आज
माणसे किती भेटली आणि कावळे … ते किती दिसले ?

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *