भारतीय इतिहास आणि सरदार त्र्यंबकजी डेंगळे
भारतीय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये १८०० ते १८२० दरम्यानचा महाराष्ट्राचा इतिहास केवळ आणि केवळ भारतीयांना, इथल्या शूरवीरांना आणि मराठ्यांच्या साम्राज्याचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांना दूषण दिल्याचेच दिसते. माझ्या मते इतिहासकारांनी आपल्या वीरपुरुषांबद्दल अफवा आणि अपप्रचार करून मोठा अन्याय केलेला आहे. त्यात भर पडली सामाजिक द्वेषाची. त्यामुळेच आजकाल भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जनतेला बाहेरून आलेल्या आक्रांत्यांची नावे माहित आहेत, भारताला गुलाम करणाऱ्या ब्रिटिशांनी पेरलेला खोटा इतिहास घेऊन आपल्याच लोकांच्या नावाने खडे फोडणे जमत आहे. पण त्यांच्या विरुद्ध शस्त्र उचलणाऱ्यांची नावे आणि त्यांचा इतिहास देखील माहित नाही. हे दुर्दैव नाही तर आणखीन काय आहे?
त्यातील एक नाव म्हणजे सरदार त्र्यंबकजी डेंगळे! त्यांच्याबद्दल कोणताही इतिहासकार काही बरे लिहिताना दिसत नाही. याचे मुख्य कारण ब्रिटिशांची आणि मांडलिकांची चाकरी होय. त्यांच्याशौर्यगाथा जणू काही गुन्हा केल्यासारख्या सांगितल्या जातात. त्यांच्यावर खूनाचा खोटा आरोप लावण्यात आला. ज्याच्या आधारे ब्रिटिशांना मराठ्यांच्या राज्यात ढवळाढवळ करायची संधी मिळाली. पण कोणालाच त्यांच्या पराक्रमाबद्दल माहित नसते. जिथे सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांचाच विसर मराठी मनाला पडलेला आहे तिथे त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाबद्दल काय बोलणार?
सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांची वीरपत्नी
त्या काळातील इतिहासाबद्दल संशोधन करत असताना आ. बा. जोशी आणि आबा चांदोरकर यांच्या “श्रीशिवशाहीचा लेखनालंकार” हा ग्रंथ वाचनात आला. सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांच्या एका पत्रासंबंधित माहिती वाचल्यावर एक घटना वाचनात आली. आणि थक्क व्हायला झालं. आजतागायत वाचलेल्या कोणत्याही पुस्तकात या घटनेचा उल्लेख आलेला दिसलेला नाही. इतकेच काय कोणीही याबद्दल बोललेले ऐकिवात नाही. ही शौर्यगाथा आहे सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांच्या वीरपत्नीची. घटना खालीलप्रमाणे
कोरेगांव युद्ध होऊन अलपिष्टणांचा (Elphinstone ब्रिटिशांचा सेनापती) धांडोरा सर्वत्र प्रसिद्ध होऊन सर्व मराठे सामंत इंग्रजास मिळाले होते. तरी ही यांनी (सरदार त्र्यंबकजी डेंगळे) साम्राज्य तगविण्याचे प्रयत्न चालू ठेविले. हे, अहिरगावी सासुरवाडी भुयारांत गुप्तपणे राहात. त्यांच्या एका सेवकाने भेद करून इंग्रजास सूचना दिली. स्वान्स्टनने एक घोडदळ घेऊन घरास वेढा दिला. त्र्यंबकराव भिंत फोडून बाहेर जात असतां सोपानाच्या वर एक पुरुष उभा राहून त्याने वर येणाऱ्या तीस रावतांना भाल्याने एकामागून एक यमसदनास पाठविलें. शेवटी त्या पुरुषास गोळ्या घालून मारले आणि पाहिले तो, तो पुरुष नसून त्र्यंबकरावांची पत्नी होय ! !
केवढे हे शौर्य! केवढे हे बलिदान!
दुर्गादेवीचे रूप
आजपर्यंत इतिहासाचा अभ्यास करत असताना, अनेक वीरांगनांचा इतिहास वाचनात आला. पण कधीही या माऊलीचा इतिहास वाचनात आला नाही. याचे मला अपार दुःख आहे. आपले पती मराठ्यांचे साम्राज्य वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या मागे शत्रू आहेत आणि आता आपण त्यांच्या साठी ढाल बनणे गरजेचे आहे, शत्रूंचा संहार करणे गरजेचे आहे, हा विचार येऊन ही माऊली हातात भाला घेऊन उभी राहिली. हातात भाला घेऊन राक्षसांचा संहार करणाऱ्या दुर्गादेवी सारखी!
मी खूप शोधले पण या माऊलीचे या वीरांगनेचे नाव सापडले नाही. आपल्याला माहित असल्यास नक्की सांगा. जेणे करून या देवीचा योग्य पद्धतीने जागर करू शकू 🙏🏻
कृपया हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आपले आदर्श कोण असले पाहिजेत, ब्रिटिशांना मदत करणारे की त्यांच्या विरुद्ध लढणारे याचे उत्तर आम्ही वाचकांवर सोडून देतो.
शब्दयात्रीवरील इतर ऐतिहासिक ब्लॉग्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा.