February 18, 2025
(दुसऱ्याच्या) अंगणातील फुले, मंदिर आणि प्रार्थना फुले

(दुसऱ्याच्या) अंगणातील फुले, मंदिर आणि प्रार्थना

Spread the love

सकाळी सकाळी फिरण्याचे शारीरिक आरोग्याला फायदे होतात (होऊदे बापुडे!) पण मी फिरतो ते मानसिक आणि वैचारिक आरोग्य चांगले राहावे म्हणून. काही छोट्या घटना पाहून एक विचार मनात येतो. मग तो विचार स्वतःबरोबर अनेक विचारांना ‘मागुते या’ करत घेऊन येतो. चकरा मारता मारता या उप-विचारांचा एक विचित्र गुंता बनतो आणि मग एक खेळ सुरू होतो. खेळ, या गुंत्यातून तर्काच्या धाग्याला अलगदपणे बाहेर काढण्याचा! असंच काहीसं घडलं आज जेव्हा दोन दृष्ये समोर आली. पहिले दृष्य असे की, एक आजोबा, एका कुंपणावरून बाहेर डोकावणाऱ्या वेलीची फुले काढण्याचे प्रयत्न करताना दिसत होते. दुसरे दृष्य म्हणजे आमच्या कॉलनीतील मोकळ्या जागेत जवळजवळ बांधून पूर्ण झालेलं (मंडळाचं) मंदिर.

“जी गोष्ट तुमची नाही, ती गोष्ट तुमची नाही! त्या गोष्टीला, मालकाच्या परवानगी शिवाय हात लावायचा नाही”

खरं तर नुसते ‘फुले काढत होते’ हे म्हणणं योग्य ठरणार नाही, वेलीला लोम्बकळून फुलांना ओरबाडून काढत होते. (पुणेकरांना हे दृष्य नवीन नाही) पण हे बघताना नेहमी एक प्रश्न डोक्यात चमकून जातो की “अशा प्रकारे जमा केलेली फुले वाहिलेली देवाला चालतात का?”. लहानपणापासून आम्हाला एक गोष्ट शिकवली गेलेली आहे की “जी गोष्ट तुमची नाही, ती गोष्ट तुमची नाही! त्या गोष्टीला, मालकाच्या परवानगी शिवाय हात लावायचा नाही”

लहानपणापासून आमच्यावर झालेले संस्कार आता रक्तात गेलेले आहेत. त्यामुळे  मला बऱ्याचदा प्रश्न पडतो, की हे या दुसऱ्याच्या अंगणातील फुले तोडून आपल्या घरच्या देवांना वाहणाऱ्या आजी-आजोबांना माहित नसेल का? ज्या फुलांसाठी आपण कोणतेही कष्ट घेतले नाहीत किंवा कमीतकमी त्यांचे मूल्य दिले नाही त्या फुलांना हात लावण्याचा आपल्याला अधिकार आहे का? माझ्या मते नाही! 

मी फेऱ्या मारत होतो. दुसऱ्या फेरीच्या वेळी ते आजोबा तिथून निघून गेलेले होते. पण ते मंदिर.. ते मात्र तिथेच होते. माझ्या डोक्यात विचारांचा गुंता होत होता. अंगण एकाचे, आणि फुले तोडणारा कोणी दुसराच! भक्ती म्हणजे काय? मूल्य म्हणजे काय? फुकट मिळालेल्या गोष्टी वाहिलेल्या देवाला चालतात का? (किंवा देव त्यांचा स्वीकार करत असेल का?)

डोक्यातहा गुंता होताना प्रत्येक फेरीला दिसत होते ते गणपतीच्या मंदिराचे बांधकाम. मंदिर बांधणे हे ठीक आहे पण, मंदिर बांधायचे मूळ कारण काय आहे? मंदिरांचा  इतिहास काय आहे? देवता म्हणजे काय? अध्यात्म, धर्म, समाज, संस्कृती.. बापरे! हा विचारांचा गुंता अधिकच गुंतागुंतीचा होत चालला होता. पण देवाच्या कृपेने या गुंत्यात मला एका धाग्याचे टोक दिसले आणि मी ते लगेच पकडले.. स्वामित्व किंवा मालकी! आणि गुंता हळुहळु सुटत गेला. 

जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीचे मूल्य आपण चुकते करत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचे स्वामित्व आपल्याला मिळत नाही! 

कॉलनीतील मोकळी जागा ही मंडळाच्या मालकीची नाही. खरे तर ती कॉलनीच्या देखील मालकीची नाहीये. ती आमच्याच ओळखीच्या कुटुंबाच्या मालकीची आहे. आता जर ती जागाच मंडळाच्या मालकीची नाही तर त्या जागेवर (कितीही भक्तिभावाने असो) मंदिर बांधणे हे त्या वेलीला लोम्बकळून फुले तोडण्यासारखेच नाही का? अशा बळकावलेल्या जागेवर बांधलेल्या मंदिराने धर्माची आणि समाजाची अशी कोणती सेवा होणार आहे. देव असे दुसऱ्याच्या जागेवर बांधलेल्या मंदिराचा आणि त्या मंदिरात केलेल्या पूजा – प्रार्थनांचा स्वीकार करेल का? माझ्या मते नाही!

देव मग तो कुठलाही असो, अशा दुसऱ्याच्या जागेवर बांधलेल्या इमारतीत केलेल्या प्रार्थनांचा कधीही स्वीकार करणार नाही. 

गुंता पुरता सुटला होता, माझे चालणे संपत आले होते. अर्थात मी काहीच करू शकणार नव्हतो त्यामुळे हा विचार घेऊन घरी आलो. काही दिवसांनी ते मंदिर बांधून तयार होईल. मी रोज त्या मंदिरासमोरून चालत जाईन पण माझे हात नमस्कार करायला जुळून येणार नाहीत कारण मला ठाम विश्वास आहे की या मंदिरात केलेला नमस्कार त्या वेलीवरून ओरबाडून काढलेल्या फुले यांत फारसे अंतर नाही!

मला माहित आहे की दुसऱ्याच्या अंगणातील वेलीवरची फुले तोडणे आणि जागा बळकावणे यात फरक आहे! पण मुद्दा हा नाहीये. मुद्दा हा आहे की जी गोष्ट जणू काही आपल्याच मालकीची असल्यासारखी मिळवलेली (बालकावलेली) असते ती गोष्ट कधी लाभू शकते का? भगवंताने देखील गीतेत अर्जुनाच्या “या मोहाला बळी पाडण्याबाबत” प्रश्नाला दिलेले उत्तर फार सुंदर आहे. 

अर्जुन उवाच
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३-३६ ॥
श्रीभगवानुवाच
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्‌ ॥ ३-३७ ॥

आज जागोजागी देवांच्या आणि धर्माच्या नावावर बळकावलेल्या जागांवर आपापली मंदिरे आणि प्रार्थनालये बांधलेली दिसतात. बरं प्रश्न धर्माचा असल्याने प्रशासन जवळजवळ कानाडोळा करताना दिसते. खरंच या सगळ्या तथाकथित देवालयांमध्ये केलेली प्रार्थना देव ऐकत असेल का? माझ्या मते नाही! 

जाताजाता सहज एक बाब सुचली.. पुण्यातील एक अत्यंत प्रतिष्ठित मंदिर असेच बळकावलेल्या जागेवर बांधलेले आहे. (बरीच असतील पण इतके प्रतिष्ठित हे एकच आहे)

इतर ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *