दामाजी नाईक आणि पेशव्यांचे आरमार
केवळ युद्धनौका शत्रुच्या हाती लागू नये म्हणून नौकेसकट अग्निसमाधी घेणारे शूर वीर “दामाजी नाईक”! गोष्ट आहे १७५०-६० च्या आसपासची. पण, माझी खात्री आहे की महाराष्ट्रातल्या जवळजवळ कोणालाच या वीर योद्ध्याचे नाव देखील माहित नसेल. जिथे पेशव्यांबद्दल माहिती नसते तिथे त्यांच्या आरमाराबद्दल माहिती असणे फारच दूर राहिलं! “पेशव्यांचे आरमार” हे शब्द ऐकताच अनेकांच्या भुवया वर गेल्या असतील. दुर्दैवी आहे पण वाचकांच्या माहितीसाठी हे सांगणं क्रमप्राप्त आहे की, पेशव्यांचे देखील आरमार होते आणि त्यांनी देखील इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्द्यांवर आपला चांगलाच वचक बसवला होता. पेशव्यांच्या आरमाराचे प्रमुख हरबाजीराव धुळप होते आणि त्यांचे एक प्रमुख सरदार होते दामाजी नाईक! शूर आणि पराक्रमी दामाजींचा शत्रूच्या गोटात चांगलाच दबदबा होता. त्यांच्याच पराक्रमाची ही हकीकत.
इंग्रजांनी ठाण्याचा किल्ला घेतला. दंगे केले, आसपासचा मुलुख लुटला आणि लोकांना त्रस्त केले. हे समजताच सरसुभा विसाजीपंत यांनी धुळपांना ताबडतोब कारवाई करण्यासाठी पाचारण केले. जानराव धुळप यांच्या नेतृत्वात तातडीने आरमार आपल्या युद्धनौकांबरोबर दरकूच बंदरातून रेवदंड्याच्या दिशेने निघाले. पण हे समजताच इंग्रजांनी आपला मोर्चा गोपाळगडाच्या दिशेने वळवला. गोपाळगडाच्या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यावर स्वर होऊन आपली जहाजे नेण्याचा इंग्रजांचा विचार होता. धुळपांचे आरमार इंग्रजांच्या जहाजांच्या जवळ आले होते. दामाजी नाईक त्यांच्याबरोबरच होते. त्यांच्याकडे त्यावेळी समशेरजंग नावाची युद्धनौका होती. तशा त्यांच्या हाताखाली महादेवपाल, दत्तपाल, फत्तेजंग, नारायणपाल, समशेरजंग आणि सवाई समशेरजंग अशी युद्ध पाले (नौका) किंवा युद्धनौका होत्या.
युद्धप्रसंग
पेशव्यांच्या आरमारातील नौका आणि इंग्रजांच्या नौका आमने सामने होत्या. तेव्हा युद्धनीती अशी ठरली की दामाजी नाईक समशेरजंग आणि आणखीन एक युद्धनौका इंग्रजांच्या आरमारावर चाल करून जाणार आणि महादेवपाल, नारायणपाल या इतर नौका त्यांना कुमक पाठवणार. निर्णय घेताच दामाजी नाईक समशेरजंग आणि दुसरी युद्धनौका घेऊन निघाले. इंग्रजांच्या नौका अगदी जवळ आल्या आणि युद्ध सुरू झाले. पण दुर्दैवाने वारा कमी पडला आणि कुमक पाठवणाऱ्या नौका पुढे जाऊ शकल्या नाहीत. दामाजी नाईक आणि त्यांची युद्धनौका समशेरजंग यांना इंग्रजांच्या नौकांनी वेढले. युद्ध अटीतटीचे सुरू होते. तोफा धडधडत होत्या. दामाजी नाईक डगमगून न जाता धीराने लढा देत होते.
ते शौर्य पाहून इंग्रज देखील चकित झाले. युद्ध तुंबळ झाले पण कुमक नसल्यामुळे दामाजी नाईक यांची पिछेहाट झाली. नौकेवरील दारुगोळा संपला. शीड आणि इतर सामुग्री युद्धात नासधूस होऊन निकामी झाली. ‘घ्या घ्यारे कौल भेटांनां’ करत इंग्रजांनी तह करण्याचा प्रस्ताव ठेवला पण तो मानी आणि निष्ठावान दामाजी नाईक यांनी “न येऊ शरणा । करूं पेशव्यांची नामना । सती होऊन बसलों सरणा” म्हणत झिडकारून लावला. नामना म्हणजे मान झुकणे किंवा झुकायला लावणे. पेशव्यांची मान झुकू नये म्हणून ते वीर मरणाशी दोन हात करायला सज्ज झाले! शेवटी ही उत्तम युद्धनौका शत्रूच्या हाती लागू नये म्हणून नौकेला आग लावली आणि त्या नावेसकट स्वतःही अग्निसमाधी घेतली! केवढा हा त्याग आणि निष्ठा!
दामाजी नाईकांचा पोवाडा
दामाजी नाईक यांच्या या पराक्रमाचे वर्णन खालील “केले दंग समशेरजंग इंगरेजाला । सागरी राहिले छत्र बुडाला किल्ला ॥” पोवाड्यातील कडव्यांत केलेले आहे. पोवाड्याचे रचनाकार कोण आहेत हे सांगणे कठीण आहे. अशा वीरश्रीच्या गाथा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे पोवाड्यांच्या स्वरूपात सांगितल्या जातात.
केले दंग समशेरजंग इंगरेजाला । सागरी राहिले छत्र बुडाला किल्ला ॥धृ॥
घडीवेळ उत्तमा पाहून केली मांडण । धन्य धन्य कारागीर चतुर शाहाण । सरसुभा विसाजीपंत धनी होत जाणा । केलें तयार समशेरजंग वसई ठिकाणा । सांचांत ओतून काढिला जसा नगिना । शोभे वरि बोरदासारिखा अचंबर दाना । तिनकाठया उडवी ध्वज । झाझांत सवाई झाज । नांव समशेर जंग साजे । जैसा सैनामधि हत्ती गर्जे । इहिदे सबईनच्या सालांत गेले गोव्यांला । ते दिवशी समशेरजंग आले विजयदुर्गाला ॥केले दंग०॥ ॥१॥
सुभा झाला धुलपरायाला आरमाराचा । नारायणपाल महादेवपाल दत्तपालाचा । फत्तेजंग समशेरजंग जोडा दोघाचा । अवघ्यामध्ये समशेरजंग बिनीचा । थोर थोर मांडिल्यावर मोठये गोळ्याचा । निवडून सिपाई चढविला भरवशाचा । दारुचा तरास पाण्यांत । फिरंग्याशीं धाक गोव्यांत । सारी पाडाव केली सपाट । कैकांशी पडली धास्त । सवाई समशेर नांव… दामाजी नाईक सरदार तोचि बिनीचा ॥केले दंग०॥ ॥२॥
सन खमस साल येंदाचे फार कठिण । ठाण्याचा किल्ला घेतला इंग्रजानें ॥ पत्र आले धुळपरायासी यावे बेगुन । निघाले बंदरांतून आरमार घेऊन । दरकुच रेवदंडयावर गेले चालुन । कांही दिवस कर्मिले घ्या ऐकुन । बार बार हिंडु लागले । नांवाचे जानराव धुल्ले । चारमास झुजे मारिले असे माही सुध । पाडवा बुधवाराला । गोपाळगडचे बार्यावर इंगरेज पाहिला ॥केले दंग०॥ ॥३॥
सारे पाल जवळ बसून मन्सोबा केला । महादेवपाल नारायणपाल समशेरजंगाला । तुह्यि कोठे एक बाजून घालावा घाला । आम्ही येतावो आतून मदत तुम्हाला । पुढे होऊन समशेर दमानी पडला । न कळे कर्त्यांची कर्णी वारा राहिला । सारे पाल राहिले दूर । ना ऐक भांडयाचा मार । इंग्रेजास मदत ईश्वर । दोन जाजें त्याचि जबर । एकला पाहून समशेर । मारामार करूं लागला गोळ्यावर गोळा । नाही ऐके समशेरजंग खूब भांडला ॥केले दंग०॥ ॥४॥
इंग्रेज पुसे हटकून कोण सर्दार । दामाजी नाइक म्हणे मीच बादुर । कपितान मनी उमजला धनी यावर । म्हणून झडून पडला समशेरावर । दोहीकडे दोनीं जाजे करिती मार । खुब झुजला समशेरजंग तीन पाहार । कांहि केल्या आटोपेना । दंग जाला इंगरेज मना । ‘घ्या घ्यारे कौल भेटांनां’ । ‘लोक म्हणती न येऊ शरणा । करूं पेशव्यांची नामना । सती होऊन बसलों सरणा । ये येरे टोपीवाल्या अडावणीला । आह्यी पेशव्यांचे शिपाइ निमख दाउं तुजला’ ॥केले दंग०॥ ॥५॥
इंगरेजास आला राग झाला सरमिंदा । भरभरून भांडी मारि दोंहिं बोरजा । दांडीचे गोळ फार करितो चेंदा । रेजगिरी सांखळी मारुन उडविला पडदा । मारली थोरली कांठी गावी परबाणसुद्धां । तक्ता फोडून केला जुदाजुदा । लोक भांडले भार शर्तिन । जति हिंदु मुसनमान । दामाजी नाइक धन्य । केलें हलाल धन्याचे अन्न । पाल नेइल वैरी म्हणून । दिल्ही आपल्या हाती अग्र । सवाई समशेर जळू लागला ॥ दामाजी नाईक शर्त करून मेला ॥केले दंग०॥ ॥६॥
किति उडाले दारून जळाले फार । काही उडया टाकुन गेले तक्त्यावर । गेलि वस्त्रें नि पांघुरणें आणिक हातेरे । कसा गिलजा धात (?) पडला एकच कहर । या पेशव्याचे राज्यांत फार अमर । (पर) कोणि जळुन नाही मेला असा सर्दार । झुज झाले मिरया ठिकाणी । काहि गेले रत्नागिरीवरुनि । खुब केले त्या सुभेदारांनी । एकेक शेला दिला पाहुनी । कांही नेले इंग्रेजांनी । आले जखमी लोक खबर कळली लहान थोराला । कसा कहर राज्यावर पडला मोठा गलबला ॥केला दंग०॥ ॥७॥
मोठया पहाटेस दिवस उगवला न राव आले । इंग्रेज पळून गेला असे कळले । आइकोन वर्तमान कष्टी झाले । गेलीं फत्येजंगाची बाजू देवा काय केले । वर्तमान ऐकून तेथून निघाले । गेले विजयदुर्गाचे बंदरामध्ये पोचले । सारे पाल गोदी घालून खाली उतरले । जे रणी राहिले खेत जिवाशी मुकले । किती हेटकारी झाले ठार । घ्या रुपये ढालाभर । राज पेशव्यांचे अंबर । बातनी विजयदुरुगावर । गुरु आत्मागिरि फकीर । दामाजी आमचा मैतर । ख्यालगातो जीर खान खानदेशाला । हालीं वस्ती तळा घोसाळा ठाउक सर्वाला ॥केले दंग०॥ ॥८॥
अशा अपरिचित शूरवीरांच्या गाथा शेअर करून आणखीन लोकांपर्यंत जरूर पोहोचवा!
इतर ऐतिहासिक विषयांवर लिहिलेले ब्लॉग इथे वाचा!