व्हॅलेंटाईन डे, १४ फेब्रुवारी म्हणजेच हा दिवस तरुण (मनाने आणि वयाने दोन्ही) मंडळींचा एक आवडता दिवस. आपल्या प्रियकराला, प्रेयसीला, नवऱ्याला, बायकोला एखादी भेटवस्तू देणे किंवा गुलाबाचे फूल देणे, त्यांच्याबरोबर फिरायला जाणे आणि मजा करणे, एवढंच जवळपास सगळ्यांना माहित आहे. कुणा कुणाला या दिवसामागच्या इतिहासाबद्दल थोडीफार देखील माहिती असते. एकंदरीतच व्हॅलेंटाईन डे हा ताजेपणा, प्रेम आणि उत्साह अशा रंगांनी नटलेला दिवस आहे. पण या उल्हसित करणाऱ्या दिवसामागे एक गंभीर, रक्तरंजित आणि आख्यायिकांनी भरलेला इतिहास आहे हे फार कोणाला माहित नाही.
व्हॅलेंटाईन म्हणजे काय? तो कोण होता? १४ फेब्रुवारीच का? हा दिवस का आणि कधी पासून साजरा केला जातोय? दुसर्या देशांमध्ये हा कसा साजरा केला जायचा? असे अनेक प्रश्न सतत मनात घोंघावायचे. याच प्रश्नांची उत्तरे शोधणारा हा लेख.
सेंट व्हॅलेंटाईन कोण होते?
आख्यायिका १
सुमारे इसवी सन तिसऱ्या शतकात, प्राचीन रोम मध्ये क्लॉडियस द्वितीय नावाचा एक राजा होता. हा क्लॉडियस खूप शूर आणि युद्धकलेत पारंगत होता. त्याचा हा ठाम विश्वास होता की लग्न न झालेले पुरुष अधिक चांगले सैनिक होतात. आजुबाजूच्या राज्यांबरोबर सतत होणाऱ्या युद्धांमध्ये सैनिकांची फार गरज पडे. त्यामुळे सैनिकांची ही कमतरता भरून काढण्यासाठी त्याने एक फर्मान काढला की “कुठल्याही तरुण पुरुषाने विवाह करायचा नाही आणि विवाह केल्यास शिक्षा भोगावी लागेल”. एक प्रकारे माणसाचे मूलभूत हक्क हिरावून घेणारा हा एक अमानवी फर्मान होता.
त्याच काळात ख्रिश्चन धर्म गुरू सेंट व्हॅलेंटाईन देखील रोम मध्ये राहत होते. त्यांना हा फर्मान आवडला नाही. दोन माणसांना (स्त्री-पुरुष) यांना लग्न करण्यास मज्जाव करणारा हा फर्मान त्यांनी धुडकावून लावला. अर्थात राजा आणि व्यवस्थेच्या नकळत त्यांनी ख्रिश्चन धर्मानुसार जोडप्यांचे विवाह करून द्यायला सुरुवात केली. काही दिवसांनी व्यवस्थेला याची माहिती मिळाली. क्लॉडियसने या धर्मगुरूंना पकडले आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली. सेंट व्हॅलेंटाईन यांना १४ फेब्रुवारी २९० साली फाशी देण्यात आली. पुढे जाऊन या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन या दिवशी व्हॅलेन्टाईन्स डे साजरा करण्याचा निर्णय चर्च कडून घेण्यात आला.
आख्यायिका २
अजून एका आख्यायिकेनुसार इसवी सन तिसर्या शतकातील रोम मध्ये ख्रिश्चन धर्म पाळणार्यांचा क्लॉडियस द्वितीय राजाने छळ चालविला होता. (लोकांच्या माहितीसाठी – त्या काळात ख्रिश्चन धर्म नवीन होता आणि रोम मध्ये आधीच एक धर्म पाळला जात होता ज्याला राजाची स्वीकृती होती) क्लॉडियस द्वितीयने ख्रिश्चन धर्म स्विकारणाऱ्यांना कारावासात टाकले. शिक्षा भोगत असलेल्या या लोकांना सेंट व्हॅलेंटाईन छुप्या पद्धतीने सोडवायचे काम करत होते. क्लॉडियस च्या व्यवस्थेला या गोष्टीबद्दल कळाल्यावर त्याने सेंट व्हॅलेंटाईन ला बंदी केले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
सेंट व्हॅलेंटाईन यांचा मृत्यू आणि “ती” चिट्ठी
क्लॉडियस ने व्हॅलेंटाईनला ख्रिश्चन धर्म सोडून त्याचा (प्राचीन रोमन धर्म) स्विकारायला सांगितले. पण, सेंट व्हॅलेंटाईन यांनी ते नाकारले. अटकेत असताना सेंट व्हॅलेंटाईन यांचे एका तरुणीबरोबर प्रेम जमले. आख्यायिकेनुसार ही तरुणी बंदिगृहाच्या अधिकाऱ्याची मुलगी होती. सेंट व्हॅलेंटाईन यांनी त्या तरुणीची दृष्टी पुन्हा प्राप्त करून दिली होती. त्यामुळे ती सेंट व्हॅलेंटाईन यांच्या प्रेमात पडली. सेंट व्हॅलेंटाईन यांना १४ फेब्रुवारी रोजी फाशी द्यायचे ठरले. १४ फेब्रुवारीला फाशीच्या आधी सेंट व्हॅलेंटाईन यांनी या तरुणीला एक चिट्ठी लिहिली ज्यात लिहिले होते “तुझ्या व्हॅलेंटाईन कडून” !
एका आख्यायिकेनुसार क्लॉडियसने अजून एका व्हॅलेंटाईन नावाच्या माणसाला देखील फाशी दिली होती. मात्र तो कोण होता? याबद्दल फार माहिती उपलब्ध नाही.
सेंट व्हॅलेंटाईन्स डे – सण
व्हॅलेंटाईन डे – पूर्वार्ध
सेंट व्हॅलेंटाईन यांना तिसऱ्या शतकात फाशी झाली असली तरी हा सण पाचव्या शतकामध्ये अधिकृतरित्या साजरा केला गेला आणि त्याला सेंट व्हॅलेंटाईन डे असे नावही देण्यात आले.
लुपरकॅलिया
(आजच्या श्लील-अश्लील यांच्या संकल्पनांनुसार काही जणांना हा सण अश्लील वाटू शकतो! त्यामुळे आपल्या जबाबदारीवर वाचा)
प्राचीन रोम मध्ये साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या मध्ये एक सण साजरा केला जात असे. त्याचे नाव लुपरकॅलिया. आख्यायिकांनुसार हा सण इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून साजरा केला जात होता. एक प्रकारे रोमन लोकांचा हा वसंतोत्सव होता.
एका आख्यायिकेनुसार लुपरकॅलिया हा वसंतोत्सव आधी सध्याच्या इटलीतील मेंढपाळांनी साजरा करण्यास सुरुवात केली. लुपरकस हा मेंढ्यांचा संरक्षक देव मानला जात असे. त्याचे अनुयायी मेंढ्यांच्या कातड्याचे कपडे वापरत. लुपरकस च्या नावे असलेल्या एका जंगलात अनेक गुहा होत्या त्या गुहांमध्ये हे अनुयायी राहत असत.
या सणादरम्यान ते दोन मेंढ्या आणि एक कुत्रा यांचा बळी देत असत. लुपरकस मेंढ्याचा देव होता म्हणून मेंढ्या आणि कुत्रा मेंढ्यांचे संरक्षण करतो म्हणून कुत्रा यांचा बळी! या बळी दिलेल्या प्राण्यांची कातडी पांघरून हे अनुयायी गावात फिरत आणि कातड्याच्याच चाबकाने लोकांना मारत असत. विशेषतः मूल नसणाऱ्या स्त्रियांचा असा समज होता की या मारामुळे त्यांची प्रजनन क्षमता वाढेल आणि त्यांच्यामध्ये मूल नसण्याच्या लज्जेतून मुक्तता मिळेल.
सांकेतिक संदर्भांनी हा सण प्रजनन क्षमतेची देवता लुपरकस ला समर्पित होता. सण असूनही हा बळी देण्याचा, हिंसक, उन्मादक, नग्न आणि यौनिकदृष्ट्या उत्तेजक असा सण होता.
काही आख्यायिकांनुसार तरुण एका लाकडी खोक्यातून एखाद्या तरुणीच्या नावाच्या चिठ्या बाहेर काढत आणि तो तरुण आणि ती तरुणी वर्षभर एकत्र राहत असत. या सणादरम्यान लग्नाशिवाय यौन संबंधांना उत्तेजन दिले जात असे. यातच काही जण लग्न देखील करायचे. या सणादरम्यान सगळे नग्न असत. कधीकधी अनुयायी नग्न तरुणींच्या अंगावर देखील चाबकाने मारत असत. एका अर्थी स्वतःतील वाईट विचार, प्रजनन क्षमतेचा अभाव यांच्यावरचा उपाय म्हणून या सणाकडे पहिले जात असे. एकूणच नग्नता आणि यौन संबंध यांनी भरलेला हा सण होता. (आजच्या मुल्यांनुसर हे चुकीचे वाटते पण ही त्या काळातील परंपरा होती). असा हा उत्तेजक आणि हिंसक लुपरकॅलिया सण!
व्हॅलेंटाईन डे – उत्तरार्ध
साधारणपणे इसवी सन पाचव्या शतकात चर्चने या प्राचीन सणावर आळा घालण्यासाठी आणि ख्रिश्चन धर्माचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी या सणावर बंदी घातली. त्या काळापर्यंत स्थानिक रोमन धर्म मोडकळीस येत होता आणि ख्रिश्चन धर्म वाढत होता. ख्रिश्चन पोप गेलॅसियस यांनी या सणावर अ-ख्रिश्चन सांगत बंदी घातली आणि १४ फेब्रुवारी हा दिवस, सेंट व्हॅलेंटाईन यांना समर्पित म्हणून “व्हॅलेंटाईन डे” असा साजरा करायचा आदेश दिला. हा दिवस निवडण्यामागे सेंट व्हॅलेंटाईन यांच्या फाशीचा दिवस आहे हे अगदीच उघड आहे!
सेंट व्हॅलेंटाईन्स डे आणि प्रेम
इसवी सन पाचव्या शतकापासून जरी सेंट व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात असला तरीही साधारणपणे १३ व्या अथवा १४ व्या शतकापर्यंत या सणाची ख्याती प्रेमी युगुलांचा सण म्हणून ख्याती झालेली नव्हती. चिठ्ठया पाठवल्या जात नव्हत्या आणि आजच्या सारखे रूप तर अजिबात नव्हते.
सेंट व्हॅलेंटाईन डे आणि प्रेम यांचं नक्की नातं कधी जोडलं गेलं हे इतिहासाच्या दृष्टीने सांगणं कठीण आहे. पण, या दिवसाला प्रेमाबरोबर जोडणारा सगळ्यात जुना दुवा इसवी सन १३८१-८२ मध्ये दरम्यान सापडतो. लेखक-कवी जेफरी चाऊसर याने त्याच्या “लव्ह बर्ड्स” या कवितेत लिहिले आहे की
“हा सेंट व्हॅलेंटाईनचा दिवस
जेव्हा पक्षी आपला जोडीदार निवडायला इथे येतात”
ही वाक्ये त्याने इंग्लड चा राजा रिचर्ड द्वितीय आणि त्याची बायको ऍन् यांच्या साखरपुड्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी लिहिलेली होती. तेव्हापासून व्हॅलेंटाईन दे आणि प्रेम यांचं नातं अधोरेखित झालं.
सगळ्यात जुनी व्हॅलेंटाईन चिट्ठी इसवी सन १४१५ मध्ये फ्रांस मधील ओर्लिन्स च्या चार्ल्स नावाच्या सरदाराने आपल्या बायकोला कारागृहातून लिहिली असे म्हणतात. ही चिठ्ठी अजूनही उपलब्ध आहे. पुढे इंग्लंडचा राजा हेन्री पंचम याने देखील अशीच व्हॅलेंटाईन चिठ्ठी लिहिल्याचे उल्लेख आहेत.
शेक्सपियर आणि तत्कालीन नाटककार आणि लेखकांनी देखील व्हॅलेंटाईन डे, व्हॅलेंटाईन यांचे प्रेम आणि त्यांची चिठ्ठी यांचा आपल्या कथा आणि नाटकांमधून वापर करण्यास सुरुवात केली. ज्यांमुळे हा दिवस प्रेमाचे प्रतीक म्हणून लोकप्रिय होत गेला तसेच प्रियकर किंवा प्रेयसीला ही प्रेमाची चिठ्ठी पाठवायची सुरुवात झाली. युरोपभर आणि अमेरिकेत लोक हातानी लिहिलेली चिठ्ठी पाठवत असत.
पण याला व्यापक स्वरूप इसवी सन १९ व्या शतकात प्राप्त झाले. औद्योगिकरणाच्या दरम्यान व्हॅलेंटाईन चिठ्ठ्या देखील छापल्या जाऊ लागल्या. वेगवेगळ्या प्रकारच्या आकारांच्या आणि रंगांच्या आकर्षक चिठ्ठ्यांनी हातानी लिहिलेल्या चिठ्ठ्यांची जागा घेतली आणि होता त्याचे आजचे रूप प्राप्त झाले.
आज व्हॅलेंटाईन डे हा, छापील पोस्ट कार्ड पाठवण्याच्या बाबतीत जगातील दुसरा मोठा सण आहे (पहिला ख्रिसमस). एका अभ्यासानुसार जवळजवळ ८५% कार्ड स्त्रिया पाठवतात.
आणखी रोचक इतिहास आणि आख्यायिका वाचण्यासाठी इथे क्लीक करा!