ग्रेस! नुसते नाव वाचले तरी माणूस हळूहळू आपल्या विश्वातून एका अव्यक्त भावनांच्या राईत प्रयाण करू लागतो. प्रत्येक शब्द जणू एक लोलक आहे ज्याला अनंत पैलू आहेत. रसिक संदर्भांच्या खिडक्यांतून विविध पैलू बघत बघत एका अनंत प्रवासात निघून जातो. कवी ग्रेस यांच्या कविता मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत हे म्हणणं म्हणजे सूर्याला ‘तो बघा सूर्य’ म्हणण्यासारखं आहे. मनाच्या शांत पटलावर अचानक आघात व्हावा आणि शांतता भंग व्हावी तसे “पांढरे हत्ती” मनाला ढवळून जातात. जाता जाता आपल्या खुणा देखील सोडून जातात.
पांढर्या शुभ्र हत्तींचा रानातून कळप निघाला संपूर्ण गर्द शोकाच्या झाडातहि मिसळून गेला त्या गूढ उतरत्या मशिदी पक्ष्यांनी गजबजलेल्या कल्लोळ पिसांचा उडता आभाळ लपेटुन बुडल्या पांढऱ्या शुभ्र हत्तींनी मग डोंगर उचलून धरले अन् तसे काळजाखाली अस्थींचे झुंबर फुटले मावळता रंग पिसाट भयभीत उधळली हरिणे मुद्रेवर अटळ कुणाच्या अश्रूत उतरली किरणे पांढरे शुभ्र हत्ती मग अंधारबनातून गेले ते जिथे थांबले होते ते वृक्ष पांढरे झाले
अनेकांच्या मते कवी ग्रेस यांच्या “संध्याकाळच्या कविता” कविता संग्रहातील “पांढरे हत्ती” ही कविता सामाजिक अस्थिरता, धार्मिक हिंसा आणि माणसा माणसातील द्वेषांबद्दल आहे. कदाचित हे खरे असेलही पण मी जेव्हा ही कविता पुनःपुन्हा वाचली तेव्हा या आजूबाजूला दिसणाऱ्या विश्वाऐवजी, मनातले – कोणालाही न दिसणारे दोलायमान विश्व समोर आले. स्वतःच्या सानिध्यात आत्मिक शांततेचा नैसर्गिक समतोल साधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पण कोणत्याही भयाच्या भयाने ग्रस्त मनाच्या विश्वाचे दर्शन झाले! मन जसे आवाज ऐकू शकते तसेच ते चोरासारख्या आलेल्या भयाचे पदरव देखील ऐकू शकते.
पांढरा हत्ती, म्हणजे केवळ एक प्राणी नव्हे तर निरुपयोगी तसेच गरजेपेक्षा जास्त खर्च करायला लावणारे देखील असतात. असा एक हत्ती सांभाळणं म्हणजे स्वतःचं दिवाळं निघणं आहे.
पांढर्या शुभ्र हत्तींचा
रानातून कळप निघाला
संपूर्ण गर्द शोकाच्या
झाडातहि मिसळून गेला
मला विचाराल तर या कवितेमध्ये पांढरा हत्ती एक असा हिंस्त्र विचार आहे जो मनाच्या रानातून जाताना अगदी समोर दिसत आहे. तो विचार मनातून फिरताना दिसत आहे, विचारांना आणि भावनांना तुडवत जाताना! अशा हत्तींचा म्हणजेच अशा विचारांचा कळप आला तर काय होईल? ही गोष्ट कदाचित तुम्हाला माहित नसेल पण हत्तींचा कळप जिथून जातो तिथून तिथले सगळे गवत जमीनदोस्त झालेले असते, सगळी झुडुपे मोडलेली – वाकलेली असतात. जणू तो भूभागच उध्वस्त झालेला आहे.
मन आपल्या सर्वरंगी विचारांत आत्ममग्न असते, समतोल राखून असते. त्याला सगळ्यात जास्त भीती असते हा समतोल ढळण्याची! अशात जर मनाच्या रानात असे वावटळ निर्माण करणारे विचार जेव्हा त्रयस्थपणे माणसाला दिसतात तेव्हा एका गडद पार्श्वभूमीवर तो कळप मनाचे रान तुडवत जातोय. मनात त्यांचे रंग आणि दुःखाचे रंग एकमेकांत मिसळल्यासारखे दिसत आहेत. म्हणजे आधीच आपले अस्तित्व एखाद्या पताक्याप्रमाणे उभे धरणारी दुःखे, आणि त्यांच्यात मिसळून जाणारे मनाचा समतोल भंग करणारे विचार.
त्या गूढ उतरत्या मशिदी
पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडता
आभाळ लपेटुन बुडल्या
आपल्या विश्वात आत्ममग्नतेत उभे असलेले हे रान. पण या रानात अचानक अशा विचारांची एक मालिका येते ज्याने ही शांतता उध्वस्त होते, संपूर्ण रान भयाने ग्रस्त होतं. त्या विचारांच्या पायांखाली भाव भावनांच्या पाती तुडवल्या जातात. क्षणातच हे शांत बन, हिंस्त्र युद्धानंतर उरलेल्या एखाद्या बीभत्स रणांगणासारखे दिसते. कधी याच बनात मशिदींची शांतता नांदत होती, कल्पनांचे आणि स्वप्नांचे पक्षी स्वच्छंद होत उडत होते. हे हिंस्त्र विचार आपल्या हातात धारदार शस्त्रे घेऊन या मशिदींमध्ये घुसतात आणि चक्क कल्पनांची, आणि स्वप्नांची कत्तल करतात. मागे उरतात फक्त त्या मृत स्वप्नांची पिसे! ते दृश्य अत्यंत करुण असते. अखेर ज्याचे भय होते ते घडलेच. मनाची शांतता या विचारांनी भंग केलीच!
पांढऱ्या शुभ्र हत्तींनी
मग डोंगर उचलून धरले
अन् तसे काळजाखाली
अस्थींचे झुंबर फुटले
आणि एकदा अशा विचारांनी मनाला व्यापले की मन त्यांना काढून टाकू शकत नाही. उलट आपण जितके दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो तितकेच ते विचार कल्लोळ करतात. तसेच काही घडते जेव्हा पांढरे हत्ती संबंध डोंगरांना डोक्यावर घेतात. काळाच्या जिव्हेप्रमाणे लपलपणारी सोंड, पृथ्वीला चीर पडावी असा चित्कार! जिथवर मनश्चक्षु पाहू शकत आहेत तोपर्यंत फक्त भावनांचा आणि विचारांचा चुराडा झालेला.. किती उदासी आहे ही? ही उदासी, ही भग्नता पाहून कुडी देखील आतल्या आत कोसळेल असे वाटते. खरंच अशा वेळी असे वाटते की, एकाएकी मरण तर येणार नाही ना?
मावळता रंग पिसाट
भयभीत उधळली हरिणे
मुद्रेवर अटळ कुणाच्या
अश्रूत उतरली किरणे
या वावटळानंतर सगळीकडे मावळता रंग! जिथे पाहू तिथे अस्त.. फक्त अस्त! जणू आता या मनाच्या विश्वात पुन्हा कधी शुभ, आनंदी आणि शुचि विचारांना कधी अंकुर फुटणार नाहीत. आता इथे दुःख बेभान होऊन पसरेल. जणू वणवा लागल्यानंतर हरिणांनी उधळून जावे! एखाद्या उदास एकट काळोख्या घराला कोणी सोडून जावे. आणि इथे एक भावना अटळ आहे, मरण! हे मनाचे मरण फार दुःखदायी आहे. अशा वेळी आपल्या हातात काय उरते.. मनातल्या मनात रडणे!
पांढरे शुभ्र हत्ती मग
अंधारबनातून गेले
ते जिथे थांबले होते
ते वृक्ष पांढरे झाले
कधी तरी जेव्हा मनाची ही अवस्था करणाऱ्या विचारांच्या जाण्याची वेळ येते. तसेही उध्वस्त आणि भग्न गावात कोणी जास्त वेळ राहत नाही, भले ते गाव त्यांनीच उध्वस्त केले असावे! हा पांढऱ्या हत्तींचा कळप जसा चोर पावलांनी आला तसा शांतपणे अंधाऱ्या भावनांच्या बनातून निघून गेला. मागे फक्त दुःख. हत्तींचा कळप जरी निघून गेला असला तरीही त्यांच्या येऊन गेल्याच्या खुणा बराच वेळ टिकून राहतात. तसेच हे हिंस्त्र आणि भयावह विचार. ते निघून गेले तरीही त्यांनी मनावर जे घाव केले, ज्या ज्या अनुभूती मनाला आल्या त्यांच्या खुणा काही काळ का होईना टिकून राहतात!
बऱ्याचदा असं होतं की काही विचार उदासी घेऊन येतात आणि मनाचा समतोल ढळतो, काही काळ या दुःखात जातो आणि शेवटी उरतात अनुभूतीच्या आणि दुःखाच्या खुणा!