December 9, 2024
बीज अंकुरे अंकुरे – रसग्रहण आणि भावार्थ

बीज अंकुरे अंकुरे – रसग्रहण आणि भावार्थ

Spread the love

“बीज अंकुरे अंकुरे” कुणाला माहित नसलेला ८० आणि ९० च्या दशकात वाढलेला मराठी माणूस शोधूनच काढावा लागेल. मधुकर पांडुरंग आरकडे यांची ही अप्रतिम कविता! ही कविता मराठी पाठ्यपुस्तकात तर होतीच आणि “गोट्या” नावाच्या मराठी मालिकेचे शीर्षक गीत म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे! अशोक पत्की यांनी या शीर्षक गीताला संगीतबद्ध केलेले आहे. हे गाणे आणि हे शब्द ऐकताच मला त्या काळात गेल्यासारखे वाटते. पण या कवितेचा नेमका अर्थ आत्ता कुठे समजू लागला आहे. लहान मुलांच्या संदर्भात ही कविता असली तरीही, खरे तर “बीज अंकुरे अंकुरे” चे खरे श्रोते पालक आहेत. तसेच या कवितेला समजून घेताना संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आणि मनुस्मृति मधील काही पंक्ती देखील आठवल्या!

बीज अंकुरे अंकुरे कविता मधुकर आरकडे
मधुकर पांडुरंग आरकडे

आधी आपण संपूर्ण कविता पाहू!

बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?

बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या रात्री, चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?

अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवुन रानात, उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली, प्रकाशाचे गीत गात
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?

नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरु
फुलाफळांचा त्यावरी, नाही आला रे बहरु
क्षणभरी विसावेल वाटसरु सावलीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?

मधुकर पांडुरंग आरकडे

या कवितेतील पहिले काही शब्द ऐकताच मला आठवण झाली ती तुकोबांची! ते म्हणतात “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” .. आणि एखादी अवघड गाठ सुटावी तशी ही कविता उलगडत गेली.

उत्तम पीक किंवा उत्तम फळे – फुले हवी असतील तर बियाणे देखील उत्तम असले पाहिजे. पण फक्त पिके, झाडे आणि फुले यांच्या पर्यंतच या अभंगाची सीमा ठेवावी का? नाही! संत मंडळी जेव्हा काही सांगतात तेव्हा त्याचा अंतिम उद्देश समाजाचे प्रबोधन आणि भक्ती असते.

मला विचाराल तर बीज म्हणजे जिथून नवजीवनाची उत्पत्ति होते! म्हणजे आई – वडील. कल्पना करा जेव्हा आपल्याला कोणी दुराचारी आणि दुरात्मा दिसतो तेव्हा आपल्या मनात पहिला विचार हा येतो की याच्या किंवा हिच्या आई वडिलांनी संस्कार दिले वाईट की नाही? आता यात प्रत्येक वेळेस आई वडील जबाबदार असतील असे नाही. पण मूळ गुरू जिथे आई आणि वडील असतात तिथे मुलांना योग्य मार्ग आणि सत्य यांची ओळख करून देण्याची जबाबदारी आई वडिलांची अधिक ठरते! त्यामुळे जर आई वडिलच सत्चरित्र नसतील तर ते आपल्या मुलांवर काय संस्कार करणार!? हेच तुकाराम महाराज म्हणतात. की आई वडील जर योग्य मार्ग चालणारे असतील तरच त्यांची मुले सुसंस्कारी होण्याचा मार्ग प्रशस्त होतो! हे सत्य आहे..

या अनुषंगाने मनुस्मृति मधील काही पंक्ती देखील आठवल्या

सुबीजं चैव सुक्षेत्रे जातं सम्पद्यते यथा ।
तथाऽर्याज् जात आर्यायां सर्वं संस्कारमर्हति ॥

उत्तम जमिनीत जेव्हा उत्तम बीज रुजते तेव्हा ते उत्तम (मोठे) होते! त्याचप्रमाणे आर्य आणि आर्या यांच्या पोटी जन्माला आलेले मूल सुसंस्कारी होण्यास योग्य ठरतो. (आर्य या शब्दाबद्दल कुणाची काय समजूत असेल ती असो पण आर्य चा अर्थ सोपा आहे, आर्य म्हणजे योग्य, सभ्य आणि सत्चरित्र!) सत्चरित्र असणे म्हणजे फार मोठे दिव्य करावे लागते असे नाही! किमान आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये, कुणावर अन्याय होऊ नये आणि कुणा निरपराधाला इजा होऊ नये एवढंच. पण योग्य वेळी सत्याच्या बाजूने लढायची वेळ अली तरी देखील पॉल मागे घेता काम नये!

शेवटी वाघ हा वाघ आणि वाघिणीच्या पोटीच जन्माला येणार ना? शिवाजी महाराज जन्माला आले ते शहाजी राजे आणि जिजाऊंसारख्या आईंच्या पोटीच ना? हेच सार आहे वरील श्लोकाचे!

आणि या कवितेतील पहिली पंक्तीच

“बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?”

ओल्या मातीच्या कुशीत म्हणजे ज्या मातीत बियाणे रुजणार आहे त्या मातीमध्ये ओल असणे गरजेचे आहे. ही ओल फक्त मायेची ओल नाही कारण पुढच्याच पंक्तीत मधुकर आरकडे म्हणतात कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात!? थोडक्यात जिथे ओल म्हणजे योग्य वातावरण नाही, मोठे होण्यासाठी योग्य संस्कार नाही म्हणजे खडकाळ माळरानात, तिथे मूल सुसंस्कारी कसे होईल?

पुढच्या कडव्यात कवी म्हणतात, बीजाला नुसते ओल्या मातीत टाकून चालत नाही. त्याच्याकडे लक्ष ठेवावे लागते. निगराणी करावी लागते, वेळेला माया आणि वेळेला शिक्षा करावी लागते, ज्ञानाचा लख्ख प्रकाश लागतो आणि रात्री उत्तम स्वप्न बघण्याची सवय द्यावी लागते. हे पालकांनी लक्षात ठेवण्याजोगे आहे!

अंकुराचे रोप होणार, रोपाचे झाड होणार हा तर निसर्गाचा नियम आहे. पण मुद्दा झाड होण्याचा नाही, मुद्दा झाड कसे मोठे झाले आहे? हा आहे. ज्या झाडाची मुळे जमिनीत घट्ट नाहीत ते झाड फार काळ टिकत नाही हे सत्य आहे. आपल्या संस्कारांपासून, भाषेपासून, समाजापासून दूर गेलेली व्यक्ती म्हणजे मूळांपासून दूर गेलेले झाड! ते असे किती दिवस तगेल? त्यामुळे आपल्या मुलांना मोठे करताना या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की त्यांना आपल्या संस्कारांबद्दल, स्वभाषेबद्दल, देशाबद्दल आणि समाजाबद्दल आत्मीयता असली पाहिजे! तरच त्या मुलाच्या चारित्र्यात वास्तवाचे वजन येईल.

बीज अंकुरे, म्हणताना पालकांनी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जसे प्रत्येक झाड महावृक्ष किंवा कल्पतरू होऊ शकत नाही तसेच प्रत्येक मूल थोर, महान आणि प्रतिष्ठित होऊ शकत नाही! मग अशा वेळी काय करायचे? याचे उत्तर गीतेत आहे.. आपले कर्म करायचे! कारण जरी एखादी व्यक्ती महान किंवा थोर झाली नाही तरीही जर ती व्यक्ती सत्चरित्र असेल, सभ्य असेल आणि सज्जन असेल तर त्या व्यक्तीच्या सानिध्यात इतर व्यक्तींना देखील आधार मिळतो. आसरा मिळतो. मूळ मुद्दा आपल्या मुलांना उत्तम माणूस बनवणे आहे!

थोडक्यात ही कविता फक्त एका झाडाचे बीजापासून झाडापर्यंतच्या प्रवासाबद्दल नाही तर मनुष्याच्या जन्मापासून त्याचे मोठे होण्यापर्यंतचा प्रवासाबद्दल आहे!


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *